
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत घेतला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट होती. हल्ल्यानंतर देशातील विरोधी पक्षांनीही एकत्र येत पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यासाठी मोदी सरकारला पाठिंबा दिला होता. तर एआयएमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही जाहीर सभांमधून पाकड्यांचा समाचार घेतला होता. यातच आता, ओवेसी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधला. पाकिस्तान दहशतवाद्यांना स्पॉन्सर करतो, असे म्हणत ओवेसी पाकिस्तानवर बरसले. शनिवारी (16 मे) ओवेसी यांनी एक मुलाखत दिली, ज्यामध्ये त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले.
मुलाखतीदरम्यान ओवेसी म्हणाले की, पाकिस्तान मानवतेसाठी खतरनाक बनला. पाकिस्तान दहशतवाद्यांना स्पॉन्सर करतो. दहशतवाद्यांना ट्रेन करुन तो भारताविरोधात (India) जिहाद करण्यासाठी पाठवतो. मोहम्मद झिया-उल-हक यांच्या काळापासून ते कंधार विमान अपहरण, 26/11 मुंबई हल्ला, संसदेवरील हल्ला, उरी, पठाणकोट, रियासी आणि आताचा पहलगामचा दहशतवादी हल्ला या सगळ्यामध्ये पाकिस्तानची स्पष्ट भूमिका दिसते.
ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानची सेना आणि आयएसआय भारताला सातत्याने अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आले आहेत. 1947 मध्ये पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरमध्ये मुजाहिदीन पाठवून हौदोस घातला होता. तेव्हापासून पाकिस्तान भारताविरोधात नापाक कारवाया करत आहे.
पाकिस्तान (Pakistan) स्वतःला इस्लामिक देश म्हणून सादर करत असण्यावरुनही ओवेसी यांनी मुलाखतीदरम्यान निशाणा साधला. ओवेसी म्हणाले की, भारतात सुमारे 20 कोटी मुस्लिम राहतात. पाकिस्तानचा हा दावा मूर्खपणाचा आहे.
मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरही ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली. ओवेसी म्हणाले की, कर्नल सोफिया ही देशाची बेटी आहे. ती आपल्या सशस्त्र दलाचा एक भाग आहे. धर्माच्या आधारावर द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने शाह यांनी वक्तव्य केले. भाजपने त्यांना पक्षातून बडतर्फ करुन तुरुंगात पाठवावे. यामुळे जगामध्ये संदेश जाईल की भारत कोणत्याही प्रकारचा धार्मिक द्वेष सहन करत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.