अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूल (Kabul) येथून 168 प्रवाशांना घेऊन हवाई दलाचे C-17 ग्लोबमास्टर गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर दाखल झाले. या प्रवाशांमध्ये भारतीय नागरिकांसह 24 अफगाण शीख सुद्धा आहेत. विशेष म्हणजे या लोकांमध्ये सिनेटर अनारकली आणि नरेंद्र सिंह खालसा या दोन अफगाणिस्तानच्या खासदारांचा देखील समावेश आहे. अनारकली तालिबानच्या विरोधात आवाज उठवताना दिसता आहेत. बहुतेक प्रवासी म्हणतात की, ते कदाचित आता काबूलला कधीच परत येणार नाहीत.
भारतात आलेल्या शीख धर्मीय खासदाराने तिथल्या परिस्थितीबद्दल बोलताना सांगितले की, लोकांना गुरुद्वारामध्ये आठ दिवस कैदेत ठेवण्यात आले होते. तालिबान तेथील लोकांना शोधून काढते आहे. त्यांनी सांगितले की जेव्हा लोक विमानतळावर थांबले होते, तेव्हा तालिबानने लोकांना तेथुन दुसरीकडे नेले, मात्र नंतर सोडून दिले. ही भयावह परिस्थिती सांगताना नरेंद्र सिंग खालसा यांना आश्रू अनावर झाले होते.
काबूलहून परतलेल्या एका तरुणाने सांगितले की, तो एका स्टील प्लांटमध्ये काम करत होता, तिथे निर्माण झालेल्या परिस्थितीतून बाहेर पडल्यानंतर आपल्या मातृभूमीच्या मातीवर पाऊल टाकल्यावर त्याने सुटकेचा श्वास घेतला. त्याला पुन्हा कधीही अफगाणिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
पत्नी आणि मुलासह भारतात आलेल्या एका अफगाणी तरुणाने सांगितले की, आमच्या सारख्या हजारो लोकांना अफगाणिस्तानामधून बाहेर पडायचे आहे. त्यांचा तालिबानवर विश्वास नाही. अफगाणिस्तानात त्यांना त्यांचे भविष्य सुरक्षित वाटत नाही. भारतातील उपजीविकेच्या प्रश्नावर तो तरुण म्हणाला की, भारताशी आमचे खूप जुने संबंध आहेत. इंशाअल्लाह आम्ही आपली आणि कुटुंबाची काळजी घेऊ.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.