
IND vs PAK, Abhishek Bachchan: आशिया कप 2025 चा फायनल सामना भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये होणार आहे. या स्पर्धेत हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमने-सामने येत आहेत. रविवार हा (28 सप्टेंबर) हायहोल्टेज सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर रंगणार आहे. तत्पूर्वी, माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. क्रिकेट टॉक शोमध्ये बोलत असताना त्याच्याकडून अशी एक गंमतशीर चूक झाली, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
सामन्याच्या रणनितीवर चर्चा करत असताना पाकिस्तानच्या एका क्रिकेट टॉक शोमध्ये शोएब अख्तर याच्याकडून मोठी गफलत झाली. आशिया कप फायनलमध्ये पाकिस्तानच्या विजयाच्या संभाव्यतेवर बोलत असताना, अख्तर म्हणाला, "जर पाकिस्तानने अभिषेक बच्चनला लवकर आऊट केले, तर काय होईल?"
अख्तरच्या तोंडून चुकून आलेल्या या नावामुळे शोचे होस्ट आणि सहकारी पॅनेलिस्ट हसू लागले आणि त्यांनी तातडीने त्यात सुधारणा केली. अख्तरला भारतीय संघाचा युवा स्टार सलामीवीर अभिषेक शर्मा याच्याबद्दल बोलायचे होते, पण उत्साहाच्या भरात त्याच्याकडून बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन याचे नाव घेतले गेले. या गंभीर चर्चेत काही क्षणांसाठी हास्य-विनोदाचे वातावरण निर्माण झाले.
शोएब अख्तरची ही जीभ घसरण्याची घटना इतकी व्हायरल झाली की, खुद्द अभिनेता अभिषेक बच्चन यालाही यावर प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरला नाही. ज्युनिअर बच्चनने 'एक्स' वर एक पोस्ट करत लिहिले, "सर मला तुमचा आदर आहे, पण मला नाही वाटत की ते हे करु शकतील...! आणि हो, मी क्रिकेट खेळण्यात इतका चांगला नाहीये."
अभिषेक बच्चनच्या या मजेशीर पोस्टमुळे हा व्हिडिओ अधिकच चर्चेत आला. या विनोदी घटनेमुळे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या उत्साहात आणखी भर पडली आहे. आता क्रिकेटप्रेमींना मैदानातील कामगिरीची उत्सुकता लागली आहे.
दरम्यान, या स्पर्धेत सुपर-4 सामन्यामध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पाकिस्तानला हरवून विजेतेपद पटकावण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल. दुसरीकडे, सलमान आगाच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने मागील दोन पराभवांचा हिशोब चुकता करण्याची तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांमध्ये काटे की टक्कर होण्याची शक्यता क्रिकेटप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.