

Train Fight Video: सोशल मीडियाच्या जगात जर तुम्ही सक्रीय असाल, तर तुमच्या फीडवर दिल्ली किंवा मुंबई मेट्रोमधील विविध प्रकारचे व्हिडिओ नक्कीच आले असतील. कधी कोणी मेट्रोमध्ये डान्स करताना दिसतं, तर कधी अश्लील चाळे किंवा कुणाचे तरी टोकाचे वाद व्हायरल होतात. खरं तर, सोशल मीडियावर मेट्रोमधील मारामारीचे व्हिडिओ सर्वात जास्त चर्चेत असतात.
मात्र, अशा प्रकारचा 'राडा' फक्त मेट्रोपुरता मर्यादित राहिला नसून आता तो भारतीय रेल्वेच्या जनरल आणि इंटरसिटी कोचपर्यंत पोहोचला आहे. सध्या इंटरनेटवर एक असाच व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये धावत्या इंटरसिटी ट्रेनमध्ये काही तरुणांनी एकमेकांचे कपडे फाडेपर्यंत मारामारी केल्याचे दिसत आहे.
सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका रेल्वे कोचच्या दरवाजाजवळ अनेक तरुण उभे असल्याचे दिसत आहे. सुरुवातीला शाब्दिक चकमक सुरु होते आणि त्याचे रुपांतर पाहता पाहता तुफान हाणामारीत होते. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, दोन वेगवेगळ्या गटांमध्ये ही लढाई सुरु आहे. एका बाजूला दोन तरुण एकमेकांना भिडले आहेत, तर दुसरीकडे एका मुलाला दोन तरुण मिळून बेदम चोप देत आहेत. हाणामारी इतकी तीव्र आहे की, आजूबाजूच्या प्रवाशांना काय करावे हे सुचत नाहीये. काही वेळानंतर हे सर्व तरुण एकाच जागी गोळा होतात आणि एकमेकांवर लाथाबुक्क्यांचा वर्षाव करु लागतात.
या हाणामारीदरम्यान रेल्वे कोचमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. व्हिडिओमध्ये दोन मुली स्वतःचा बचाव करण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. या दोन मुलींनी हाणामारी सुरु असलेल्या ठिकाणापासून लांब राहण्यासाठी आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी धक्काबुक्की करत कोचच्या आत जाण्याचा प्रयत्न केला. मारामारी करणारे तरुण इतके बेभान झाले होते की, त्यांना आजूबाजूला लहान मुले किंवा महिला आहेत याचेही भान राहिले नव्हते.
हा व्हिडिओ 'X' वर @gharkekalesh नावाच्या लोकप्रिय हँडलवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे नमूद करण्यात आले की, "यूपीमध्ये अमेठीजवळ वाराणसी-लखनऊ इंटरसिटी ट्रेनच्या आत प्रवाशांमध्ये (Passengers) मोठा राडा." ही घटना ट्रेन अमेठीच्या आसपास असताना घडल्याचे सांगितले जात आहे. बातमी मिळेपर्यंत हा व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला असून तो वेगाने शेअर केला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.