

नवी दिल्ली: देशातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. ८ वा वेतन आयोग लागू करण्याच्या हालचालींना वेग आला असून, यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत. सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ डिसेंबर २०२५ मध्ये संपत असून, त्यानंतर जानेवारी २०२६ पासून ८ वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ वा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून प्रभावी मानला जाईल. जरी सरकार या आयोगाच्या शिफारसी लागू करण्यास थोडा उशीर झाला, तरी कर्मचाऱ्यांना मागील कालावधीचे एरिअर (थकीत रक्कम) मिळण्याची दाट शक्यता आहे. जर हा आयोग २०२७ च्या शेवटी लागू झाला, तर कर्मचाऱ्यांना तब्बल २४ महिन्यांचे एरिअर मिळू शकते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल.
कर्मचारी संघटनांनी ८ व्या वेतन आयोगासमोर आपल्या प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 'फिटमेंट फॅक्टर'. कर्मचाऱ्यांनी १.९२ ते ३.८३ पर्यंत फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. जर सरकारने ही मागणी मान्य केली, तर कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात (Basic Salary) मोठी वाढ होणार आहे. सध्याच्या १८,००० रुपये किमान वेतनावरून ते ५२,००० रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, एकूण पगारात साधारण ३ पटीने वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केवळ मूळ पगारात वाढच नाही, तर कर्मचारी संघटनांनी प्रवास भत्ता (Travel Allowance) आणि घरभाडे भत्ता (HRA) यांसारख्या विविध भत्त्यांमध्येही सुधारणा करण्याची मागणी केली आहे. सध्या ८ वा वेतन आयोग देशाच्या विविध भागांत जाऊन कर्मचाऱ्यांच्या गरजांचा अभ्यास करत आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयोगाकडून आपला अहवाल सरकारकडे सादर केला जाईल. त्यानंतर सरकार यावर सविस्तर चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहे.
थोडक्यात सांगायचे तर, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा आणि सुविधेचा मार्ग मोकळा होताना दिसत असून, आगामी काळात त्यांना मोठा आर्थिक लाभ मिळण्याची चिन्हे आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.