
Free LPG Connections: मोदी सरकारने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’ (PMUY) अंतर्गत 25 लाख अतिरिक्त एलपीजी कनेक्शन जारी करण्यास मंजुरी दिली आहे. या विस्तारामुळे देशभरात पीएमयूवाय कनेक्शनची एकूण संख्या 10.58 कोटी पेक्षा जास्त होणार आहे. सरकारने या कनेक्शनसाठी एकूण 676 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे.
सरकारकडून सांगण्यात आले की, 25 लाख मोफत कनेक्शन देण्यासाठी प्रति कनेक्शन 2,050 च्या दराने 512.5 कोटी रुपये खर्च केले जातील. तसेच, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरवर 300 ची सबसिडी देण्यासाठी 160 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय, प्रकल्प व्यवस्थापन, माहिती आणि शिक्षण, आणि प्रशासकीय खर्चासाठी 3.5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सोमवारी (22 सप्टेंबर) या निर्णयाची घोषणा करताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी या निर्णयाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, “नवरात्रीच्या सुरुवातीला उज्ज्वला योजनेअंतर्गत 25 लाख मोफत एलपीजी (LPG) कनेक्शन देण्याचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महिलांप्रती देवी दुर्गेप्रमाणे आदर आणि सन्मानाची वचनबद्धता दर्शवतो. हा निर्णय आपल्या माता आणि भगिनींच्या सन्मान आणि सबलीकरणाचा संकल्प अधिक मजबूत करतो.”
पुरी यांनी ‘उज्ज्वला’ योजनेला भारतातील (India) सर्वात प्रभावी सामाजिक कल्याण योजनांपैकी एक म्हणून संबोधले. ते म्हणाले, "या योजनेने घराघरात क्रांती घडवली आहे, महिलांचे आरोग्य सुरक्षित केले आहे आणि देशभरातील कुटुंबांचे भविष्य उज्ज्वल केले आहे."
मे 2016 मध्ये सुरु झालेली पीएमयूवाय योजना सुरुवातीला 8 कोटी मोफत एलपीजी कनेक्शन देण्याच्या उद्दिष्टाने सुरु करण्यात आली होती, जे उद्दिष्ट सप्टेंबर 2019 मध्ये साध्य झाले. त्यानंतर, उर्वरित गरीब कुटुंबांना कव्हर करण्यासाठी ऑगस्ट 2021 मध्ये ‘उज्ज्वला 2.0’ लाँच करण्यात आली, ज्याचे उद्दिष्ट जानेवारी 2022 पर्यंत 1 कोटी अतिरिक्त कनेक्शन देण्याचे होते.
यानंतर, सरकारने उज्ज्वला 2.0 अंतर्गत 60 लाख अतिरिक्त कनेक्शनना मंजुरी दिली, जे डिसेंबर 2022 पर्यंत देण्यात आले. त्यानंतर जुलै 2024 पर्यंत आणखी 75 लाख कनेक्शन जारी करण्यात आले. जुलै 2025 पर्यंत देशभरात 10.33 कोटींहून अधिक पीएमयूवाय कनेक्शन देण्यात आले आहेत, ज्यामुळे ही योजना जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या स्वच्छ ऊर्जा उपक्रमांपैकी एक बनली आहे. या योजनेमुळे महिलांना (Womens) लाकूड आणि गोवऱ्या जाळण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळाली आणि त्यांच्या आरोग्याच्या समस्याही कमी झाल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय महिलांच्या जीवनात एक मोठा सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.