World Sexual Health Day: डिजिटल जगातील लैंगिक आरोग्य

लैंगिकतेकडे आणि लैंगिक संबंधाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहायला हवे
World Sexual Health Day
World Sexual Health DayDainik Gomantak
Published on
Updated on

4 सप्टेंबर हा दिवस जागतिक लैंगिक आरोग्य दिन (World Sexual Health Day) म्हणून साजरा केला जातो. जगभरातील लोकांमध्ये लैंगिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक लैंगिक आरोग्य दिन साजरा केला जातो. 2010 पासून जगभर लैंगिक आरोग्य दिन साजरा करण्यासाठी जागतिक लैंगिक आरोग्य संघटना प्रयत्नशील असून वेगवेगळ्या थीमचा वापर करून लैंगिक आरोग्याबाबत विविध कार्यक्रम जगभर आयोजित केले जातात. ‘डिजिटल जगातील लैंगिक आरोग्य’ ही यावर्षीच्या लैंगिक आरोग्य दिनाची थीम आहे. भारतातही जागतिक लैंगिक आरोग्य संघटना, कौन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अ‍ॅण्ड पेरेंटहूड इंटरनॅशनल या संघटनांच्या वतीने देशभर विविध लैंगिक आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केले जातात.

आपल्या शारीरिक आरोग्याबाबत सर्वजण जागरूक असतात; मात्र ही जागरूकता मानसिक व लैंगिक आरोग्याबाबत दिसून येत नाही. थोडासा ताप आला, तर आपण त्वरित डॉक्टरांना भेटून औषधोपचार सुरू करतो. परंतु आपणास काही मानसिक त्रास जाणवत असेल किंवा काही लैंगिक समस्या असतील तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेण्याबाबत तत्परता दाखवत नाही. औषधोपचाराच्या अभावामुळे मानसिक किंवा लैंगिक समस्यांची तीव्रता वाढून गंभीर मनोविकार किंवा लैंगिक आजार निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपणास शारीरिक समस्यांबरोबरच मानसिक किंवा लैंगिक आजाराची लक्षणे जाणवत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

World Sexual Health Day
OLD GOAN HOUSES: गोवेकरांनी जपला गोव्यातील जुन्या घरांचा वारसा

भारतात लैंगिक आरोग्याबाबत बोलायला अजूनही लोक संकोचतात. भारतातील अनेक घरांमध्ये ‘सेक्स’ हा विषय निषिद्ध समजला जात असल्याने या विषयावर चर्चा करायला बंदीच आहे. या विषयावर खुलेपणाने चर्चा होत नसल्याने तरुण मुलांमुलींमध्ये लैंगिकतेविषयी गैरसमज वाढू लागतात. मात्र आधुनिक डिजिटल युगात घराघरात वैचारिक परिवर्तन दिसू लागले आहे. तरुण पिढीने लैंगिक विषयावर बोलायला सुरवात केली आहे.

विशेषतः डिजिटल, सोशल मीडियात लैंगिकतेविषयी जागृती निर्माण करण्यासाठी या विषयावर चर्चा, विचारमंथन होऊ लागले आहे. याच विषयावर जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 4 सप्टेंबर रोजी जागतिक लैंगिक आरोग्य दिन साजरा केला जातो. लैंगिक आरोग्याचे महत्त्व ध्यानात घेऊन लैंगिकतेकडे आणि लैंगिक संबंधाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहायला हवे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे मत आहे. त्यामुळे पती-पत्नीमध्ये आनंददायक व सुरक्षित लैगिंक संबंध प्रस्थापित होऊन लैंगिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत होते. प्रत्येक स्त्री - पुरूषांना लैंगिक इच्छा असते आणि हे मानवी जीवनातील एक नेहमीचा भाग आहे, हे सामाजिकदृष्ट्या स्वीकारायला हवे. लोकांना लैंगिक इच्छा असली, तरी सुरक्षित लैंगिक संबंधांना प्राधान्य द्यायला हवे. जोडीदाराबरोबर केलेल्या असुरक्षित लैंगिक संबंधामुळे अनेक लैंगिक संक्रमित आजार होण्याची शक्यता असते. तसेच एड्ससारखा आजारही असुरक्षित लैंगिक संबंधामुळेच पसरण्याची अधिक श्‍क्यता असते.

World Sexual Health Day
...तर गोमंतकीय मुलींचे खूनच होतील

असुरक्षित संबंधांमुळे मुलींमध्ये नको असलेले गर्भारपण लादले जाऊ शकते. त्यामुळे हे टाळण्यासाठी प्रत्येक लैंगिक संबंधाच्यावेळी निरोधचा वापर करायला हवा. निरोधाशिवाय स्त्रियांनी इतर गर्भनिरोधकांचा वापर करावा. त्यामुळे नको असलेली गर्भधारणा टळू शकते. तसेच तुम्हाला गर्भधारणा हवी असेल तर तुमच्या जोडीदाराबरोबर योग्य पद्धतीने कुटुंबनियोजन करायला हवे. लैंगिक आरोग्य चांगले असेल तर तुम्ही आणि तुमचा जोडीदार सुरक्षित राहू शकतो. भारतीय शिक्षण व्यवस्थेत अजून तरी लैंगिक शिक्षण दिले जात नाही. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच लैंगिक शिक्षण मिळाल्यास वैवाहिक जीवनात त्यांचे लैंगिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देण्याबाबतचा निर्णय केंद्रशासन स्तरावर प्रलंबित असला तरी शासन याबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना शाळेमध्येच लैंगिक शिक्षण मिळू शकेल. लैंगिकतेविषयी मुलांबरोबर बोलताना पालकांनी टाळाटाळ करू नये. तुम्ही तुमची लैंगिक इच्छा लपवून ठेवल्यास तुम्हाला नैराश्य येऊ शकते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील लैंगिकता ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, म्हणूनच ते निषिद्ध नाही. लैंगिकतेविषयी बोलताना किंवा त्याबद्दल काही प्रश्‍न विचारताना कोणीही संकोच बाळगू नये.

कोविड या आजाराने गेल्या वर्षभरापासून जगभर थैमान घातलेले आहे. कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बंदिस्त जीवन जगणाऱ्या लोकांच्या मानसिक आरोग्याबरोबरच लैंगिक आरोग्यावरही परिणाम झालेला आहे. कोविडमुळे लोकांची कामेच्छा लक्षणीय स्वरूपात कमी झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पती-पत्नींच्या लैंगिक संबंधांचे प्रमाणही घटलेले आहे; याउलट हस्तमैथुनाचे प्रमाण बऱ्यापैकी वाढल्याचे दिसून आले आहे. कोविडमुळे पुरूषांच्या लैंगिक समस्यांमध्ये वाढ झाली आहे. इंटरनेट डेटा स्वस्त झाल्याने इंटरनेटचा वापरही लक्षणीय प्रमाणात वाढला आहे. पतीपत्नींनी समाजमाध्यमांचा अतिवापर टाळून एकमेकांना पुरेसा वेळ दिल्यास पतीपत्नींचे नातेसंबंध सुदृढ राहण्यास निश्‍चितच मदत होईल.

- डॉ. राजसिंह सावंत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com