Goa Election: मतदारसंघावर वर्चस्‍व मिळेल का?

मतदारसंघाच्‍या हितासाठी निर्णय; खंदे समर्थकांनी साथ सोडल्‍याने पेचप्रसंग
मतदारसंघावर वर्चस्‍व मिळेल का?
मतदारसंघावर वर्चस्‍व मिळेल का?Dainik Gomantak

कुठ्ठाळी: कुठ्ठाळी मतदारसंघात भाजप पुन्हा विजय मिळवील का, हा कळीचा मुद्दा बनलेला आहे. आमदार एलिना साल्ढाणा यांनी आपल्या मतदारसंघाच्या हितासाठी अनेकदा स्वपक्षाच्या सरकारी पंगा घेतला आहे. त्यातच त्यांचे काही खंदे समर्थक साथ सोडून दुसऱ्या पक्षात गेले आहेत. अशा स्थितीत भाजपसमोर हा मतदारसंघ राखून ठेवण्याचे आव्हान उभे आहे.

Dainik Gomantak

कुठ्ठाळी मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण, भाजपच्या आमदार श्रीमती एलिना साल्ढाणा यांनी येथून दोनवेळा विजय संपादन केला आहे. सध्या त्या आमदार असल्या तरी पहिल्यावेळी त्या वनमंत्री म्हणून कार्यरत होत्या. मंत्री व आमदार या नात्याने त्यांनी केलेली विकासकामे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. तरीपण यंदाच्या निवडणुकीत त्यांना भाजपची उमेदवारी मिळेल की नाही, याबाबत सध्या मतदारसंघात चर्चा सुरू आहे. तरी आमदार साल्ढाणा यांना आपण केलेल्या विकासकामांमुळे पक्ष आपल्यालाच उमेदवारी देईल, अशी त्यांना खात्री आहे.

पूर्वी कुठ्ठाळी मतदारसंघ हा क्षेत्रफळाने मोठा होता. मतदारसंघ फेररचनेनंतर त्यातील बराचसा भाग दाबोळी मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला. त्या मतदारसंघाचे सध्या पंचायत मंत्री माविन गुदिन्हो प्रतिनिधित्व करीत आहेत. जे पूर्वाश्रमीचे कुठ्ठाळीचे माजी आमदार होते. त्यांची अजूनही या मतदारसंघावर बऱ्यापैकी पकड आहे.

Dainik Gomantak

ख्रिस्ती मतदारांचे प्राबल्य

कुठ्ठाळी मतदारसंघात एकूण 30 671 मतदार असून येथे ख्रिस्ती मतदारांचे प्राबल्य आहे. 2012 मध्ये दाबोळीचे काँग्रेस आमदार माविन गुदिन्हो यांचा पाठिंबा असूनही कुठ्ठाळीचे काँग्रेस उमेदवार तथा सरपंच कायतान झेवियर हे विशेष काही करू शकले नव्हते. तर कुठ्ठाळीच्या भाजप कार्यकर्त्यांनी तत्कालीन आमदार माथानी साल्ढाणा यांना7424 मतांनी विजयी केले होते. त्यानंतर आमदार एलिना साल्ढाणा बिनविरोध निवड झाली होती. त्‍यानंतर एलिना दुसऱ्यांदा 5666 मते मिळवून विजयी झाल्या.

खंदे समर्थक ‘आप’मध्‍ये

आमदार श्रीमती एलिना साल्ढाणा यांची खंदे समर्थक तथा कुठ्ठाळी भाजप मंडळाचे माजी अध्यक्ष जॉयल फर्नांडिस यांनी काही महिन्यांपूर्वी ‘आप’मध्ये प्रवेश केल्याने आम आदमी पक्षाच्यावतीने तेसुद्धा उमेदवार म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.तसेच सांकवाळ पंचायतीचे विद्यमान पंच तथा दक्षिण गोव्याचे भाजप जिल्हा अध्यक्ष तुळशीदास नाईक हे सुद्धा भाजप उमेदवारीचे दावेदार आहेत. ते पक्षाशी एकनिष्ठ आहेत. मतदारसंघात तळागाळातील कार्यकर्त्यांना एकत्रित करून भाजप मतदारांची संख्या वाढविण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावलेली आहे.

रमाकांत बोरकरही इच्छुक

सांकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर हेसुद्धा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. मात्र, उमेदवारीबाबत ‘बॉस’ निर्णय घेतील, असे सांगतात. सध्या माविन गुदिन्हो यांच्याशी त्यांची जवळीक असल्याने माविन जे काही ठरवतील, त्यानुसार ते पवित्रा घेणार आहेत.

नेली रॉड्रिगीसही सज्ज

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्ष नेली रॉड्रिगीस यासुद्धा निवडणुकीसाठी इच्छुक असून त्यांचे कार्यही सुरू आहे. गेल्यावेळी त्या गोवा विकास पार्टीच्या उमेदवार होत्या आणि त्यांना 3380 मते मिळाली होती. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युती झाल्यास कुठ्ठाळी मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला आल्यास नेली या राष्ट्रवादीच्या उमेदवार असतील. युती झाल्यास या ठिकाणी विजयाची शक्यता अधिक आहे.

मतदारसंघावर वर्चस्‍व मिळेल का?
Goa Election: सांगेत तिरंगी चुरशीची लढत शक्‍य

काँग्रेसचे अनेक दावेदार

गेल्या महिन्यात ‘आप’मधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले ओलांसियो सिमोईश तसेच सांकवाळचे माजी जिल्हा पंचायत सदस्य वसंत गोपी नाईक हेही काँग्रेस उमेदवारीचे दावेदार आहेत. या मतदारसंघात निवडणूक जवळ येईल, तसे इच्छुक वाढणार असल्याने यावेळी निवडणूक चुरशीची होणार आहे.

आंतोनियो वाझ रिंगणात

कुठ्ठाळीचे विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य तथा माजी सरपंच व एसटी समाजाचे नेते आंतोनिओ वाझ यांचे कुठ्ठाळी मतदारसंघात तळागळातील जनतेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. त्यांच्याकडे सुमारे पाच साडेपाच हजार मते आहेत. 2017 मध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती आणि अवघ्या काही मतांनी पराभूत झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com