Goa Election 2022: मुख्‍यमंत्र्यांसाठी निवडणूक प्रतिष्‍ठेची

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी मंतदारसंघाकडे संपूर्ण गोवा राज्याचे लक्ष भाजपचा प्रचार सुरू; इतर पक्षांकडून मतदारांच्‍या गाठीभेटी
Goa Election 2022: मुख्‍यमंत्र्यांसाठी निवडणूक प्रतिष्‍ठेची
Goa Election 2022: मुख्‍यमंत्र्यांसाठी निवडणूक प्रतिष्‍ठेचीDainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: साखळी मतदारसंघ हा मुख्यमंत्र्यांचा असल्याने या निवडणुकीत सर्वांची नजर या मतदारसंघावर खिळून राहणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या कार्यकर्त्यांतर्फे या मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला असून, इतर कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला अद्याप प्रारंभ झालेला नाही. तरी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे इच्छुक उमेदवार धर्मेश सगलानी, प्रताप गावस, प्रवीण ब्लेगन, खेमलो सावंत, महादेव खांडेकर यांनी आपापला वैयक्तिक प्रचार सुरू केला आहे.आम आदमी पक्षाने या निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भूमिका घेऊन युवा कार्यकर्ते मनोजकुमार घाडी यांची उमेदवारी निश्चित केली आहे. त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तृणमूल काँग्रेसही निवडणुकीत उतरणार आहे.

भाजपची सत्ता असल्याने व आमदार मुख्यमंत्री असल्याने मतदारसंघात सध्यातरी भाजपचा बराच जोश दिसून येत आहे. मुख्यमंत्री बनल्यामुळे निश्चितच प्रमोद सावंत यांना या मतदारसंघात अधिक मजबूत बनण्यास मदत झाली. परंतु, दुसऱ्या बाजूने विरोधकही तेवढेच प्रबळ बनत आहेत. मागच्या वेळी झालेली चूक सुधारून यावेळी कुणालाही काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यास एकजुटीने काम करून विजय खेचून आणण्याचा निर्धार काँग्रेस कार्यकर्ते व्यक्त करताना आढळून येतात.

मुख्‍यमंत्र्यांची हॅट्‌ट्रिक?

यंदाची निवडणूक ही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गोव्याची निवडणूक होत असल्याने साखळीबरोबर संपूर्ण गोव्यातील निवडणुकीत त्यांना लक्ष घालावे लागणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मतदारसंघातील लोकांच्या अपेक्षा बऱ्याच वाढल्या होत्या. त्या पूर्ण करण्यात ते यशस्वी ठरले काय? याचा निकालही या निवडणुकीत मतदार देणार आहेत. या मतदारसंघातून (पूर्वीचा पाळी मतदारसंघ) पहिले आमदार अच्युत उसगावकर हे सलग तीन वेळा निवडून आले होते. नंतर एकाही आमदाराला तसे यश आले नाही. त्यामुळे प्रमोद सावंत हॅट्‌ट्रिक करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

बालेकिल्ला भाजपकडे

हा मतदारसंघ नेहमीच काँग्रेस विरोधी विचारसरणीचा राहिला आहे. मगोपचा बालेकिल्ला समजला जाणारा हा मतदारसंघ नंतर भाजपने बळकावला. भाजपसाठी हा मतदारसंघ सुरक्षित मानला गेला आहे. काँग्रेसला ‘विविधा परिवारा’चे संस्थापक स्व. गुरुदास गावस यांच्यामुळे काही काळ येथे यश लाभले. धर्मेश सगलानी यांनी नंतर जोमाने कार्य केले. साखळी पालिका त्यांनी एकहाती दोन वेळा भाजप सरकारच्या व भाजप आमदाराच्या विरोधात निवडून आणली. गोव्यात भाजपचे सरकार व आमदार साडेनऊ वर्षे, पण सगलानी गटाची साखळी पालिका गेली नऊ वर्षे (मध्यंतरीचे आठ महिने वगळता) कार्यरत आहे. इतर सगळ्या सात पंचायती भाजप आमदार व सरकारकडे, पण साखळी पालिकेने आमदार व सरकारला नेहमी हुलकावणी दिली आहे.

Dainik Gomantak

काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

काँग्रेसने मागच्या निवडणुकीत तत्कालीन नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांना उमेदवारी दिली होती. त्यांना प्रचारासाठी केवळ तेराच दिवस मिळाले, तरीही सत्ताधारी भाजप उमेदवाराविरोधात त्यांनी कडवी झुंज दिली होती. पराभवानंतरही त्यांनी दिलेली आश्वासने स्वतः पदरमोड करून पूर्ण केली. मुख्यमंत्र्यांचा पराभव करण्यासाठी आपल्यालाच तीन महिने अगोदर उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. माजी आमदार प्रताप गावस यांचे म्हणणे आहे, की या मतदारसंघात आपले कनिष्ठ बंधू स्व. गुरुदास गावस यांनी संघर्ष करून पक्षाचे काम वाढवले. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर आपण या भागाचे आमदार बनलो. नंतर बंडखोरीमुळे आपल्याला पराभव पत्करावा लागला. पुन्हा एकदा आपल्याला उमेदवारी द्यावी, असा दावा गावस यांनी केला आहे. माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण ब्लेगन यांनीही उमेदवारीसाठी दावा केला आहे. प्रवीण ब्लेगन हे पूर्वाश्रमीचे भाजपचे, पण नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच बरोबर खेमलो सावंत, महादेव खांडेकर, सुनीता वेरेकर यांनीही आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी दावा केला आहे.

विरोधक एकवटणार?

हा मतदारसंघ मुख्यमंत्र्यांचा असल्याने सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एकच उमेदवार द्यावा, असे मत मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले आहे. म्हणूनच त्यांनी आपला उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही. तसे झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एक मजबूत शक्ती निर्माण केली जाऊ शकते. पण अजूनतरी कोणी या प्रस्तावावर विचार केलेला नाही.

‘आप’चे संभाव्य उमेदवार

युवा कार्यकर्ते शिक्षक मनोजकुमार घाडी यांनी नुकताच आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला. ‘आप’चे ते संभाव्य उमेदवार असणार आहेत. मतदारसंघात काही प्रतिष्ठित नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन पक्षाची ध्येय धोरणे, दिल्लीतील कामांची पद्धत याची लोकांना माहिती देण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.

त्‍यांच्‍या भूमिकेकडे लक्ष

पाळी मतदारसंघाच्या माजी जिल्हा पंचायत सदस्य शुभेच्छा शांबा ऊर्फ महेश गावस यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. भाजपची सत्ता असतानाही शुभेच्छा यांनी मगोप व काँग्रेसच्या सहकार्याने भाजप पुरस्कृत उमेदवाराचा पराभव केला होता.

‘ती’ मते कुणाला?

दोन लोकसभा व दोन विधानसभा निवडणुकीत साखळीतील सुमारे 3800 मते लक्षवेधी ठरलेली आहेत. 2008 च्या पोटनिवडणुकीत भाजपने माजी मंत्री डॉ. सुरेश आमोणकर यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला व 3800 मते मिळवली. 2017 मध्ये डॉ. सुरेश आमोणकर यांनी पुन्हा एकदा 3800 मते घेतली. आता ही मते कोणाकडे वळणार, यावरही बरेच काही अवलंबून आहे.

- चंद्रशेखर देसाई

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com