
निसर्गातील पशुपक्ष्यांशी आपले जिवांचं मैत्र असते. पहाटेला कोंबड्याने बांग दिली की उजाडायचे आणि चिवचिवाट करत चिमण्या भेटीला यायच्या. हे क्षणचित्र काही वर्षांपूर्वीचे. आता गावांची ही झपाट्याने शहरे होऊ लागली आहेत आणि निसर्गातील पशुपक्षी आपल्यापासून दुरावले जाऊ लागले आहेत.
चिमणी (हाऊस स्पॅरो) हा एक पक्षी आपल्या नित्य परिचयाचा. आपल्याभोवती चिंवचिंव करत दाणे टिपणारा हा इटुकला-पिटुकला पक्षी! जितका धीट आणि चपळ तितकाच भित्रापण. चाहूल लागली की भुर्रकन उडून जायचा. आपल्या बाळाला कडेवर घेऊन त्याला घास भरवताना एक घास माऊला जातो तसाच चिऊलापण जातो.
मराठी बडबडगीतांत चिऊताई असतेच. ‘कावळ्याचं घर होतं शेणाचं आणि चिऊताईच घर होतं मेणाचं’ या बालकथेतून चिमणी आपल्याला पहिल्यांदा भेटली होती. आठवते? घराच्या वळचणीला घरासमोरच्या एखाद्या छोट्या-छोट्या झाडांवर चिमणी बिनधास्तपणे घरटे बांधायची. त्यात आपला चिमणा संसार थाटून पिल्लाला पिल्लांना जन्म द्यायची. घराबाहेर वाळत घातलेले धान्य टिपायची.
‘घर चिमणी’ आणि ‘रान चिमणी’ असे चिमण्यांचे दोन प्रकार आहेत. शेतात बी पेरलं की ते टिपायला रान-चिमण्यांची भिरी, भिर भिर शेतात उतरायची. त्यांना हाकलण्यासाठी गोफण फिरायची. रानचिमण्यांना ‘शेरकी’ असं ग्रामीण नाव आहे. चिमणीच्या मानेजवळ एक पिवळा ठिपका असतो. या चिमणीला ‘पीतकंठी’ असेही म्हणतात. तिचं शास्त्रीय नाव ‘सिफोनिया’. ‘चटक’, वार्तिका’,ग्रहनीड’ ही तिची संस्कृत नावे.
सर्वत्र आणि सर्वदूर आढळणारा हा पक्षी हिमालयाच्या दोन हजार मीटर उंचीपर्यंत आढळून येतो त्याचे सरासरी जीवनमान सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत असते असे संशोधनामध्ये सिद्ध झाले आहे. त्याला माणसांचा सहवास आवडतो पण स्पर्श आवडत नाही. एखाद्या चिमणीला माणसांचा स्पर्श झाल्यास त्याच्यावर इतर चिमण्यांकडून बहिष्कार टाकला जातो.
उंदीर, चिमणी, हे अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी करतात या उद्देशाने चीन सरकारने त्यांच्यावर 1978 मध्ये कडक उपाय योजले. एक चिमणी वर्षाला साडेचार किलो धान्य खाऊन फस्त करते म्हणून चीनने चिमणीला उपद्रवी पक्षी म्हणून घोषित करून त्यांची हत्या करण्याचा कठोर निर्णय घेतला. याचा परिणाम म्हणून एक एक अब्ज चिमण्या आणि दीड अब्ज उंदीर मारले गेले.
चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत चालली आहे. पक्षीप्रेमींच्या निरीक्षणावरून चिमण्यांचे सरासरी प्रमाण 2015 मध्ये 33.33 टक्के होते. 2016 मध्ये 32.99 टक्के होते, 2017 मध्ये 26.05 टक्के, 2018 मध्ये ते 22.13 टक्क्यांवर आले. कीटकभक्षी असलेल्या चिमणीसारख्या पक्ष्यांची संख्या कमी होणे हे मानवासाठी धोकादायक असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.
-नारायण महाले
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.