Pre-Monsoon in Goa: प्रतीक्षा ‘मिरगा’च्या पावसाची

साधारणपणे सूर्य जेव्हा 7 ते 8 जूनला मृगशीर्षात प्रवेश करतो त्यावेळी मान्सूनच्या पावसाचे आगमन होते.
Pre-Monsoon in Goa
Pre-Monsoon in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

राजेंद्र पां. केरक

Pre-Monsoon in Goa: भारतीय लोकमानसाने आकाशात सत्तावीस नक्षत्रे असल्याची संकल्पना केलेली आहे. सूर्य वर्षभर सत्तावीस नक्षत्रांतून प्रवास करतो, असे पूर्वापार मत आहे. या सत्तावीस नक्षत्रांतून पावसाळी मौसमाची नऊ नक्षत्रे मानली गेली आहेत.

मृगशीर्ष, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा-फाल्गुनी, उत्तरा-फाल्गुनी आणि हस्त अशा नऊ नक्षत्रांत पर्जन्यवृष्टी झाली नाही तर जमिनीत पेरलेले वाया गेले, अशी शेतकऱ्यांची धारणा होते. त्यामुळे बिरबलाने सत्ताविसातून नऊ वजा केले तर उत्तर शून्य असे दिले.

अकबराने त्याविषयीचे स्पष्टीकरण विचारताच बिरबलाने नऊ नक्षत्रांत पर्जन्यवृष्टी झाली नाही तर पीक पाणी मिळणे मुश्कील होऊन माणसाचे जीवन शून्यवत होते असे सांगितले. खरे तर पावसाची सुरुवात रोहिणी नक्षत्रापासून होत असली तरी मृग नक्षत्रात सूर्याचा प्रवेश झाला म्हणजेच मान्सूनच्या पर्जन्यवृष्टीला प्रारंभ झाल्याचे मानले जाते.

साधारणपणे सूर्य जेव्हा ७ ते ८ जूनला मृगशीर्षात प्रवेश करतो त्यावेळी मान्सूनच्या पावसाचे आगमन होत असते. त्यामुळे मृगनक्षत्रात जेव्हा पर्जन्यवृष्टी होते तेव्हा गोव्याचे लोकमानस ‘मिरगा’चा पाऊस सुरू झाला असे म्हणत मान्सूनचे हार्दिक स्वागत करते.

पूर्वी मान्सूनचा पाऊस सुरू झाला म्हणजे नदीकाठी वसलेल्या गावांचा मुख्य शहरांशी असलेला संपर्क पुलाच्या अभावी तुटायचा आणि त्यामुळे ग्रामीण भागातले लोक मान्सूनातल्या पावसाळी चार महिन्यांसाठी सहजासहजी गावाकडे उपलब्ध होत नसलेल्या जीवनावश्यक गोष्टींची साठवणूक करायचे.

पावसापूर्वी गोव्यात मुख्य चर्चच्या आवारात जी पुरुमेताची फेस्ते भरली जायची तेथे विक्रीला उपलब्ध असलेली मीठ, मिरची, सुकी मासळी.... आदींची खरेदी केली जायची. पुरुमेताच्या फेस्ताच्या बाजारात पावसाळ्यातल्या चार महिन्यांसाठी लागणाऱ्या जीवनावश्यक गोष्टींची जमवाजमव करण्याची लगबग पाहायला मिळायची.

आज घरे बंगल्यात रूपांतर होऊन नळे, कौलारू घरे झपाट्याने बदलली आहेत आणि सिमेंट -कॉंक्रिटात बांधकाम करण्यात आलेले आहे. त्यामुळे घराच्या छपराची शाकारणी अपवादात्मक पाहायला मिळते. परंतु असे असले तरी मुसळधार पर्जन्यवृष्टीपासून त्रास होऊ नये म्हणून पूर्वतयारी केली जात असते.

Pre-Monsoon in Goa
शिवकर्णिका चित्रकला प्रदर्शन

रस्ते, पूल आदी पायाभूत साधनसुविधेमुळे गावे शहराशी जोडली गेली आहेत. त्यामुळे, जीवनावश्यक गोष्टींची साठवणूक पावसासाठी करण्याची गरज पूर्वीसारखी राहिलेली नाही आणि त्यामुळे मृगनक्षत्राचा प्रारंभ नव्या पिढीसाठी शेतीअभावी नोंद घेण्यासारखा अपवादात्मक राहिला आहे.

पूर्वी जेव्हा गोवा कृषिप्रधान होता तेव्हा पावसाळी शेतीची पूर्वतयारी वैशाखाच्या उत्तरार्धात सुरू व्हायची आणि मग सूर्य मृग नक्षत्रात कधी प्रवेश करतो याची शेतकरी मोठ्या उत्सुकतेने प्रतीक्षा करायचे.

मृग नक्षत्रात सूर्याचा प्रवेश झाला म्हणजे मृगाची पर्जन्यवृष्टी सुरू होईल म्हणून कष्टकऱ्यांच्या जीवनात आनंदाला उधाण यायचे. मृगनक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पाऊस झाला तर शुभसंकेत मानला जायचा आणि शेतीच्या कामाला नवी ऊर्जा आणि गती लाभायची.

Pre-Monsoon in Goa
World Bicycle Day: मिशन लाईफ

आकाशातल्या तारकांच्या रचनेतून हरिणाचे चार पाय, त्याच्या पोटात शिरलेला बाण आणि जवळ असलेला व्याध दृष्टीस पडत असल्याकारणाने त्याला मृगशीर्ष नक्षत्र असे नाव लाभले. आकाशात तारकांची ही वैशिष्ट्यपूर्ण रचना पावसाळी मौसमात दृष्टीस पडत नाही. मार्गशीर्षातल्या निरभ्र आकाशात मृगशीर्ष नक्षत्राचे दर्शन घडते.

त्यामुळे जून महिन्यात सूर्याचा प्रवेश मृग नक्षत्रात आला म्हणजे गोवा-कोकणातले कष्टकरी ‘मिरगा’च्या पावसाचे स्वागत करण्यासाठी सिद्ध होतात. ते गावठी कोंबड्याचा बळी देऊन मसालेदार ‘सागोती’ करून तिचा वड्याबरोबर आस्वाद घेतात.

गोव्यातल्या हिंदूंत जसे मिरगाच्या पावसाचे आगमन देवाची कृपा मानून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते, त्याचप्रमाणे ख्रिस्ती समाजात ही पवित्र क्रॉससमोर मेणबत्या पेटवून आणि फुले अर्पण करून मिरगाचे स्वागत केले जाते.

मृग नक्षत्रातल्या पर्जन्यवृष्टीचे वर्णन करताना कविवर्य ग. दि. माडगुळकर यांनी ‘माउलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार’ असे जे म्हटलेले आहे त्याची प्रचिती पूर्वी प्रकर्षाने यायची. मृगातल्या पावसाचे टपोरे थेंब जेव्हा तापलेल्या धरणीवरती पडतात, तेव्हा मातीतला सुगंध संवेदनशील व्यक्तिमत्त्वाला मोहवून टाकतो.

Pre-Monsoon in Goa
गोमंतकीय साहित्य आणि स्त्री

मृगातल्या पावसाच्या आगमनाची वर्दी देण्यासाठी जसा पावश्या पक्षी आपल्या कुंजनातून कष्टकऱ्यांना ‘पेरते व्हा’ चा संदेश देतो. त्याचप्रमाणे या नक्षत्रात येणाऱ्या पावसाची जणू काही पूर्वसूचना देण्यासाठी मृगाच्या किड्याचे आगमन होते.

रेशमी लाल रंगाचा हा किडा इंग्रजीत ‘रेड वेलवेट माइट’ म्हणून परिचित असून त्याला असलेल्या आठ पायांमुळे हा छोटेखानी किडा लक्ष वेधून घेतो. पूर्वी भुसभुशीत मातीची समृद्धी असलेली जमीन सिमेंट कॉंक्रीट आणि डांबरापासून मुक्त होती. शेतकरी जुन्या काळी सेंद्रिय खताचा वापर करून अन्न धान्याची पिकवायचे.

रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर होत नसल्याकारणाने वर्षभर सुप्तावस्थेत असणारा हा किडा मृग नक्षत्राच्या काळात मादीला आकर्षित करण्यासाठी येतो आणि त्याच्या प्रजननास प्रारंभ होतो.

अल्पायुषी असणाऱ्या या किड्याच्या नराचे आगमन मादीशी समागम करण्यासाठी होत असले तरी लोकमानसाने त्यांचा संबंध मान्सूनच्या पावसाशी जोडून त्याला ‘मृगाचा किडा’ असे नाव दिलेले आहे. त्याची हळद कुंकू अर्पण करून पूजा करण्याला पूर्वी प्राधान्य दिले होते.

मृगाच्या किड्याचे जीवनचक्र मातीशी जोडलेले होते आणि त्यामुळे कुजलेल्या पानांचे बारीक कण केरकचऱ्यात आढळणारे सूक्ष्मजीव भक्षण करून तो गुजराण करायचा. मृगाचा किडा आकाराने छोटेखानी असला तरी माती परिसंस्थेचे आरोग्य संतुलित ठेवण्यात महत्त्वाचे योगदान तो द्यायचा.

Pre-Monsoon in Goa
Gomantak Editorial: पायाभूत शिक्षणाचा पाया कितपत घट्ट?

मृगातल्या पावसाच्या आगमनानंतर परिसरात आमूलाग्र बदल घडतो आणि हवेत गारवा निर्माण होऊन सूर्यप्रकाशाची तीव्रता संपते तेव्हा पंधरवड्यात मृगाचा किडा गायब होऊ लागतो. पर्जन्यवृष्टी सुरू झाल्यावर हिरव्या जंगलातली झाडे लुकलुकणाऱ्या काजव्याच्या प्रकाशात प्रकाशमान होतात तेव्हा विलोभनीय दिसतात.

मृगाच्या पावसात कोणी वडा सागोतीचा तर कुठे काजुबिया भाजून, त्यातल्या गरांचा आस्वाद घेतो. पाऊस मुसळधार कोसळू लागल्यावर शेतात घुसणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर मासे प्रवेश करतात आणि अशा माशांना पकडून त्याचे आंबट तिखट करून नाचण्याच्या भाकरीसमवेत आस्वाद घेण्यात मत्स्याहारी धन्यता मानतात.

पूर्वी मान्सूनात कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्यावरती कष्टकऱ्यांच्या भातशेतीत ‘सुफलाम’तेचा आविष्कार व्हायचा. मान्सूनचा पाऊस थेंबाथेंबातून धरित्रीच्या गात्रागात्रांत सृजनत्वाची पेरणी करायचा आणि त्यामुळे अल्पावधीतच ग्रीष्मात लुप्त झालेली तृणपाती हिरवळीच्या वैभवाचा साज परिधान करतात.

टाकळा, कुरडसारख्या रानभाज्या तरारून येतात. मृगशीर्ष ते हस्तापर्यंत जी नऊ नक्षत्रे आहेत. त्या कालखंडात आपल्याकडे पर्जन्यवृष्टी होत असल्याकारणाने प्रत्येक नक्षत्राविषयी कष्टकरी समाजात लोकसंकेत निर्माण झालेले आहे.

आद्रा नक्षत्रात प्रचंड पाऊस कोसळून सर्वत्र चिखल झालेला असतो. आणि त्यामुळे ‘आदो करता गादो’ अशी म्हण रूढ झालेली आहे. तर ‘हस्त दुनियेचा राजा’, असा उल्लेख करण्यात आलेला आहे. मृगाच्या पावसाविषयी कष्टकरी लोकमानसात विविध संकेत रूढ असल्याने त्याच्या आगमनाची उत्कंठा लागलेली असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com