गोव्यातला पारंपारिक 'चोरोत्सव'

या दिवशी सर्वप्रथम गावच्या प्रमुख गावकऱ्यांच्या हस्ते सकाळी मंदिरात पूजा होते.
चोरोत्सव
चोरोत्सवDainik Gomantak

गोवा: साकोर्डा भागातील तांबडीसुर्ल, धारगे, कारेमळ, मातकण व तयडे गावात काल शुक्रवारी पारंपरिक रितीरिवाजानुसार ‘चोरोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला. हा गावच्या शिमगोत्सवाचा भाग होता. तयडे ग्रामस्थांचे जागृत आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सातेरी ब्राह्मणी केळबाय मंदिराच्या प्रांगणात होळी साजरी करण्याची परंपरा फार जुनी आहे आणि ग्रामस्थांनी तिचा वारसा अखंडपणे जोपासला आहे.

हा चोरोत्सव भक्तिभावाने व निष्ठेने साजरा केला जातो. या दिवशी सर्वप्रथम गावच्या प्रमुख गावकऱ्यांच्या हस्ते सकाळी मंदिरात पूजा होते. त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात आम्रपर्णाने मुलांना सजवले जाते. त्यानंतर सारे मुख्य कुलदेवतेला नमन करून आशीर्वाद घेण्यासाठी वाजत गाजत मांडावर येतात व कुलदेवतेला शरण जातात. आम्रपर्णाने अलंकृत केलेल्या चोरांना वाजत गाजत टाळांच्या निनादात घराघरांत वर्षपध्दतीप्रमाणे फिरवतात. यावेळी चोरांच्या हातात स्वरक्षणासाठी काठी असते.

चोरोत्सव
नदीच्या पात्रात 'तिस-यां'ची वाढ व्हायला हवी

कुटुंबातील ज्येष्ठ सुवासिनींकडून चोरांचे चरण पाण्याने धुऊन पुसले जातात. त्यांच्या कपाळाला गंधाचा तिळा लावून त्याना पुष्प अर्पण केले जाते व तेल लावले जाते. पंचारतीने चोरांची ओवाळणी केल्यावर, घरप्रमुख श्रीफळ वाढवून त्याना नमस्कार करतो. अर्धा नारळ, तेल व ऐपतीप्रमाणे रक्कम दान केली जाते.

चोरांच्या साक्षीने यावेळी मुख्य गावकराकडून, कुटुंबाला सुख, शांती, धनप्राप्ती, ऐश्वर्य प्राप्त व्हावे व त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून गाऱ्हाणे घातले जाते. अजूनही या विधींवर ग्रामस्थांची अपार श्रध्दा आहे. गावातील सर्व घरांत चोरांना फिरवून झाल्यावर मांडावर सामूहिक भोजनाचा कार्यक्रम होतो. संध्याकाळी चोरांचे स्नान आटोपल्यावर चोरांसह ग्रामस्थ मंडळी मांडावर जमा होतात. पुन्हा नमन घातले जाते व अशातऱ्हेने शिमगोत्सवाची सांगता होते.

चोरोत्सव
जागो ग्राहक जागो...

या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य ‘गौरीचा बाळ’ हा कार्यक्रम आहे. स्वच्छ वस्रात श्रीफळ ठेवून व दागिन्यांनी कलश सजवून, घरोघरी जाऊन गावातील मुलीं गौरी बाळाचे गीत गातात. याप्रसंगी कलशाची मनोभावे पूजा केली जाते. गौरीच्या बाळाला केळी, खोबरे, गूळ आदी नैवेद्य म्हणून अर्पण करण्यात येतो. त्याशिवाय ‘फुलोत्सव’ हा कार्यक्रम सहाव्या दिवशी अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात येतो.

या फुलोत्सवात होमकुंड, करवली, घोडेमोडणी, रणमाले, जती, सकारती अशा अनेक प्रकारच्या सांस्कृतिक कलांचे सादरीकरण होते. पूर्वीच्या काळात ‘रणमाले’ पहाटेपर्यंत चालायचे. गेल्या काही वर्षापासून रणमाले सादर झाल्यानंतर दशावतारी नाटक सादर करण्यात येते. तांबडीसुर्ल, कारेमळ, धारगे व मातकण या गावचे ‘न्हावण’ पाचव्या दिवशी तर तयडे गावचे ‘पंचामृत न्हावण’ सातव्या दिवशी होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com