रायगडावरील सिंहासनाची व्यवस्था

सिंहासन म्हणजे तेरा फूट लांब व बारा फूट रुंद असा ओटा, आणि तख्त म्हणजे त्या ओट्यावरील राजाने स्वतः बसावयाचे आसन.
Shivaji Maharaj
Shivaji Maharaj Dainik Gomantak
Published on
Updated on

सर्वेश बोरकर

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही इतिहासातील सर्वांत महत्त्वाची आणि गौरवशाली घटना. शिवछत्रपतींच्या तख्ताची म्हणजे सिंहासनाची जागा ही रायगडावरील सर्वांत महत्त्वाची आणि पूजनीय जागा.

दिनांक ६ जून १६७४ रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर झाले. पुढे इ.स. १६८९मध्ये रायगड मोगलांच्या ताब्यात गेला. नंतर १७३३मध्ये रायगड श्रीपंतराव पंतप्रतिनिधींच्या करवीर छत्रपती शाहू महाराजांकडे आला. तेव्हापासून रायगडावरील सिंहासनाची व्यवस्था चालू झाली.

शत्रूने स्वारी केल्यावर, त्याचे संरक्षण करण्याची जबाबदारी पेशव्यांची होती; पण कारभारी नेमणे, तालुक्याचे जमाखर्च पाहणे वगैरे गोष्टींबाबत पेशव्यांस अधिकार नव्हता. छत्रपती शाहू महाराजांनी या तालुक्याचा कारभार यशवंत महादेव यांकडे दिला होता.

छत्रपतींची राजधानी रायगडाहून हलल्यामुळे रायगडाचे राजकीय महत्त्व कमी झाले होते. मात्र तरीही रायगडाची व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे ठेवलेली होती. शिवकालीन दप्तरातील अनेक तत्कालीन कागदपत्रे याची पुष्टी देतात.

या कागदपत्रांत शिवछत्रपतींच्या सिंहासनाची व्यवस्था आढळते. इ.स.१७७३मध्ये पेशव्यांनी सिंहासनाबाबत काही गोष्टी आणि रिवाज कायमचे ठरवून टाकले. सिंहासनास चार खांब होते. सिंहासन गजनी, किनखाप, ताफता अशा बहुमूल्य कापडाने आच्छादिले जात असे.

१६ मार्च १७७३ रोजीचा सिंहासनाच्या कापडाच्या खर्चाचा हिशेब उपलब्ध आहे. एकूण १,६०८ रुपयांचे कापड २२८ रु. गजनी, २२० रु. ताफता, ८१२ रु. किनखाप, १६ रु. खारवे आणि ३३२ रु.ची मखमल अशा प्रकारे खर्ची पडले. सिंहासनाच्या बैठकीचा भाग व तलाव्याचा भाग यांस कापडण्यासाठी हा खर्च पडला.

Shivaji Maharaj
ST Reservation: राजकीय आरक्षणासाठी आता जाग आली?

खर्चास सरकारी मंजुरी मिळत असे. त्यानंतर बारा वर्षांनी हा सगळा वस्त्रसंभार जीर्ण झाल्यामुळे इ.स. १७८६-८७ मध्ये पुन्हा याच स्वरूपाचा खर्च झाला. नंतर १९ एप्रिल १७९७ रोजी पुन्हा सिंहासनाचा गलेफ तयार केला. यावेळी सिंहासनाच्या खांबास लाल मखमल वापरली होती. इ.स. १७९७ मध्ये सिंहासनास २,७३८ रुपयांचे कापड खर्ची पडले.

त्या कापडाचा तपशील असा, १,३९८ रु.चे किनखाप, ५३८ रु. गजनी, २०८ रु. ताफता, २५ रु. खारवा व ५७० रु.ची मखमल. हे कापड किती लांबीरुंदीचे लागले हेही गजवार दिले असल्यामुळे त्यावरून सिंहासनाची लांबीरुंदी अजमावता येते आणि ती आज सिंहासन म्हणून असलेल्या स्थलाच्या मोजमापाशी जुळते.

कागदपत्रांत सिंहासनाच्या कापडाची लांबी ५ गज ४ तसू (अदमासे १५ फूट २ इंच) व रुंदी ४ गज ४ तसू (अदमासे १२ फूट) दिलेली आहे. प्रत्यक्षात सिंहासनाच्या चौथऱ्याची लांबी १३ फूट व रुंदी १२ फूट आहे. अर्थात कागदांतील कापड अधिक आहे. पण ते सिंहासनावर घालायचे कापड आहे त्यामुळे ते साहजिकच सिंहासनापेक्षा मोठेच असणार. यामुळे सिंहासनाच्या चौथऱ्याची स्थाननिश्चिती होते.

Shivaji Maharaj
कुशल चेंबर संगीतकार - चेल्सी आणि क्लोई

’सिंहासन’ आणि ‘तख्त’ या दोन वेगवेगळ्या संज्ञा. सिंहासन म्हणजे तेरा फूट लांब व बारा फूट रुंद असा ओटा, आणि तख्त म्हणजे त्या ओट्यावरील राजाने स्वतः बसावयाचे आसन. या आसनावर शेला आणि गलेफ अशी दोन प्रकारची वस्त्रे घातली जायची. गलेफांतही दोन प्रकार होते.

सिंहासनावर चौखांबी मंडप होता. या मंडपाच्या खांबांना खारव्याचे अस्तर असलेल्या मखमलीचे वेष्टन असे व त्याचे माप नऊ गज म्हणजे २५ फूट होते.

या सिंहासनाच्या मंडपास छत म्हणजे झालर असलेला चांदवा लावलेला होता. हा चांदवा किनखापी, तर झालर ताफत्याची असायची. या किनखापी चांदव्यास गजनीचे अस्तर असे.

रोज संध्याकाळी सरकारी माणसे सिंहासनाजवळ जमून सिंहासनास मुजरा घालीत असत व तेथे दिवटी लावीत असत. येथे रात्री सतत दिवटी असे. गडावरच्या इतर काही ठिकाणांप्रमाणेच तख्ताजवळही रात्रभर दिवा जळत असावयाचा, असा शिरस्ताच (नियम) होता.

तख्ताजवळ मशालेस पोत म्हणूनही खर्च पडला आहे. या सिंहासनाची दररोज पूजा होत असे. त्याचा ‘तख्त पुजारी’ म्हणून ‘महाराजांचे तख्ताचे पूजेस फरास’ असा निर्देश आला आहे.

Shivaji Maharaj
I compete naturally: नैसर्गिक शरीरस्वास्थ्याचा यथोचित पुरस्कार

सिंहासनाच्या व्यवस्थेचा आणखी एक विशेष म्हणजे सिंहासनासमोर दरवर्षी कीर्तन होत असे. हे कीर्तन करण्याचे काम बिरवाडीच्या योगी घराण्याकडे वंशपरंपरागत होते. या कीर्तनकारांस जमीन इनाम दिली होती. हे कीर्तन प्रतिवर्षी निरनिराळ्या तिथींस होत असे.

उदाहरणार्थ, जन्माष्टमीचा उत्सव सिंहासनाजवळ होई. इ.स. १७७८ मध्ये या उत्सवास १५ रु. खर्च आला. या उत्सवास गोरेगावकर हरिदास बोलावीत. त्यास ५ रु. बिदागी मिळे.

सिंहासनाजवळ केवळ सिंहासनाचाच म्हणून नगारखाना इ.स. १७९७पासून नाना फडणिसांनी सुरू केला. यासंबंधीचा उल्लेख: ‘रा. बालाजी जनार्दन फडणीस माहाडास आले, ते तेथून किल्ला पाहण्यास आले ते समई शिवाजी महाराजांचे तख्ताजवळ नगारखाना ठेवावयाची परवानगी सांगितली त्यावरून सन सवा तिसैनापासून ठेविला’.

Shivaji Maharaj
Panjim Smart city: तरुण पणजी

सन सवा तिसैन म्हणजे शके १७१८, इ.स. १७९७. या नगारखान्याच्या खर्चाची वार्षिक नेमणूक १,३०० रु. असे. नाना फडणिसांनी सिंहासनासमोर नगारखाना ठेवण्याची जी खास व कायमची व्यवस्था केली.

तिचे स्वरूप पुढीलप्रमाणे - २ सुर्णाजी, १ तुतारजी, २ कर्णाजी, २ दमामजी, १ डफगर, १ झांजवाला, २ घड्याळजी, ३ नगारजी व पेलेदार, १ नगारे करणार इतकी माणसे कायम नेमली. इ.स. १८०७-०८ मध्ये त्यांचे वार्षिक वेतन १,२०० रुपये इतके होते.

तख्तापुढे सिंहासनाचा म्हणून स्वतंत्र चौघडा होता व तो ठरावीक वेळी गर्जत असे. तख्तापुढे दरवर्षी एक बकरे बळी म्हणून दिले जाई. सिंहासनाजवळ राजहुडा होता व तेथे स्वतंत्र पहारा असे.

सिंहासनाच्या चौथऱ्याची जपणूक एखाद्या दैवताप्रमाणे होत असे. अशा प्रकारे एखाद्या जागृत व तेजस्वी देवस्थानाप्रमाणे रायगडावरील शिवछत्रपतींच्या राजसिंहासनाची व्यवस्था उत्तर पेशवाईत ठेवली गेली होती.

टीप : हा लेख अभ्यासक श्री. प्रणव कुलकर्णी यांच्या मूळ संशोधनावर व माहितीवर आधारित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com