उत्तर व पश्चिम सरहद्दीवर चीन व भारत या दोन शत्रुराष्ट्रांच्या जोडीला आता पूर्णपणे पाकिस्तानच्या तालावर नाचणारे तालिबानी अफगाणिस्तान हे नवे तिसरे शत्रुराष्ट्र तयार झाले आहे. तालिबान ही अमेरिका - पाकिस्तान ह्या सोविएत युनियनविरोधी दांपत्याची अमंगळ प्रसुती होती. आता हा अफगाणिस्तानात घट्ट पाय रोवून बसलेला तालिबानी भस्मासुर अमेरिकन ‘मोहिनी’ची पर्वा करणार नाही. जगभरचे मुस्लिम जेहाद्दी मोठ्या संख्येने आता अफगाणिस्तानात आपला तळ ठोकतील.
अफगाणिस्तानातील अल- क्वेदाचा पूर्ण बीमोड झालेला नाही. सिरीया व इराकमधील आयसीस म्हणजे ‘दयेश’ ह्या तथाकथित ‘इस्लामिक कालीफेत’चे राज्यकर्ते आता आपल्या बिळांतून बाहेर येऊन काबुलमधील तालिबानी राजवटीशी हातमिळवणी करून सर्व विश्व इस्लाममय करण्याच्या भयावह व क्रूर योजना आखणार आहे. भारतात गेल्या 20 वर्षांत अमेरिका व नाटोंच्या लष्कराचे गुपचूप सहाय्य घेऊन भारतविरोधी तालिबान्यांचा कमांडो पथके पाठवून बाहेरच्या बाहेर काटा काढणे शक्य आहे. पण बोटचेप्या धोरणामुळे आज भारताच्या परराष्ट्रनीतीचा संपूर्ण पाडाव अफगाणिस्तानात झालेला दिसतो.
हे कट्टर हिंदुद्वेष्टे शीख, बौध्द, जैन व एकूणच मुस्लिमेत्तर द्वेष्टे तालिबानी मुल्ला मौलवी - हिंदुस्तानची नावनिशाणी अफगाणिस्तानातून पाकिस्तानच्या सतत चिथावणीमुळे पुसून काढतील. भारताने अब्जावधी रुपये खर्च करून प्रचंड प्रकल्प गेल्या २० वर्षांत उभारले. अनेक प्रकल्प अपुरे आहेत. चाबाहार बंदरातून थेट कंदाहार- काबुलपर्यंत नवा महामार्ग, रेल्वेमार्ग तयार करण्याच्या, मध्ये आशियातून अफगाणिस्तानमार्गे नैसर्गिक वायु आयात करण्याच्या भारताच्या सर्व महत्त्वाकांक्षी योजना आज तालिबान्यांनी धुळीला मिळवल्या आहेत. भारतीयांना कळायला हवे की तालिबानी ही पाकिस्तानची बाहुली आहे.
अप्रत्यक्षपणे आज संपूर्ण अफगाणिस्तानच पाकिस्तानची जहाँगीर, सवतासुभा बनले आहे. ह्या नव्या शत्रुराष्ट्रामुळे भारतासमोर वर्ष - दोन वर्षांत भयानक पेचप्रसंग उभे राहणार आहेत. भारताने ‘इस्लामिक एमिरेटस आॅफ अफगाणिस्तान’ला मान्यता देवो वा ना देवो,अफूच्या व्यापारावर बक्कळ पैसा गैरमार्गाने, आंतरराष्ट्रीय दंडक झुगारून कमावणाऱ्या तालिबानी मुल्लांनी त्याची काडीचीही पर्वा नाही. एकदा अफगाणिस्तानात त्यांचे बस्तान बसले की ते फक्त संपूर्ण जग इस्लाममय करण्याचीच स्वप्ने पहातील. थेटपणे ते कोणत्याही भारतविरोधी कारवायात भाग घेणार नाहीत. पण पूर्णपणे पाकिस्तानकडून आलेल्या सूचनांप्रमाणे आधी ते काश्मिर खोऱ्यात प्रचंड हाहाःकार माजवण्याचा प्रयत्न करतील.
राजधानी दिल्ली तसेच चंदीगढ, लखनौच्या, जयपूरच्या दिशेने प्रशिक्षित आत्मघातकी हल्लेखोर पाठवले जातील. जम्मू व काश्मिरमध्ये ‘इस्लामिक स्टेट’ स्थापन करण्याची तालिबान्यांची जुनी योजना आहे, कारण अविभक्त भारतीय काश्मीरच्या सीमा अफगाणिस्तानला भिडल्या आहेत. सर्व शस्त्रास्त्र, रसदपुरवठा थेट तालिबान्यांकडून होत असल्याने पाकिस्तानला फारसे काही करावे लागणार नाही. भारतीय लष्कराची तालिबानी पुरस्कृत घुसखोरांना तोंड देताना कोंडी झाल्याचे शत्रुराष्ट्र चीनच्या चांगलेच पथ्यावर पडणार आहे व पुन्हा आक्रमण करून चिनी लाल सेना लडाखचे लचके तोडायचा संभव आहे. भारतीय विमान प्रवाशांचा धोका आता अपहरणाच्या भीतीमुळे पुन्हा वाढणार आहे. अशा अपहरणाला तालिबानी प्रोत्साहन देतील.
भारताला तालिबान्यांविरुध्द घोषित वा अघोषित युध्द पुकारणे अशक्य असले तरी हवाई दलाचा वापर करून आपल्या मध्य आशियातील तळांवरून उड्डाणे करून मागच्यामागे त्यांना हाणण्याची योजना आखता येईल. बालाकोटपेक्षा अफगाणिस्तान फार दूर नाही व गुजरातच्या वायुदळाच्या विमानतळावरून झेपावल्यास पाकिस्तानची हवाई सीमा टाळून भारतीय हवाई दल तालिबान्यांना वाट्टेल तेव्हा, वाट्टेल तिथे धडा शिकवण्यास समर्थ आहे व असा प्रताप जोपर्यंत भारत एक सार्वभौम व स्वाभिमानी राष्ट्र म्हणून दाखवत नाही तोपर्यंत आपण दातओठ खात व हात चोळीत बसू.
आतापासूनच भारताने सध्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद हाती असताना तालिबानी राजवटीला सणकून दम भरला पाहिजे- जर तुम्ही भारतात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ढवळाढवळ केली, तुमच्या देशातील मुस्लिमेतरांना सतावलेत तर आम्ही हवाई दलातर्फे कारवाई करण्याचा हक्क राखून ठेवू. आता या तालिबानी राजवटीमुळे भारताला बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यसैनिकांना गुप्त मदत देण्याचा मार्ग आपोआप खुला झाला आहे. इराण हे शिया वंशप्रमुख इस्लामी राष्ट्र असल्याने सुन्नी, वहाबी कडव्या तालिबान्यांचे त्यांच्याशी फारसे पटत नाही म्हणून जिथे शक्य आहे तिथे भारताने इराणची मदत घेऊन तालिबान्यांना धडा शिकवायला हवा.
सिरीयात ‘इस्लामिक कालीफेत’ आल्यावर काफीर भारतात इस्लामिक सत्ता आणण्याची व या नव्या 21 व्या शतकातील इस्लामी धर्मसत्तेच्या सीमा थेट बांगलादेश पर्यंत भिडवण्याच्या योजना तयार झाल्या होत्या. आता त्या सिरीया वा इराकऐवजी काबुलहून कार्यान्वित केल्या जातील. भारतापेक्षा बांगलादेशला तालिबानी दहशतवादी घुसखोरी करण्याची भीती जास्त आहे. येणारा काळ भारतासाठी आता तीन शत्रू- पाकिस्तान, चीन, तालिबानी अफगाणिस्तान यामुळे फार धोक्याचा ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.