"बांधिला सैलसा बुचडा मानेवरी,माळिला सुरंगी गजरा गं त्यावरी..मोकळ्या बटा या रुळती भाळावरी, केसावरती लहर उठविली फिरवून हळू कंगवा, आई मला नेसव शालू नवा…" अशा शब्दात कविश्रेष्ठ ग. दि. माडगुळकर यौवना, तिच्या केसांच्या बटा, शालू आणि सुरंगीचे फुल यामधल्या नात्याचा मोहक कशिदा विणतात. अशा या मादक गंधाच्या सुरंगीचे गजरे हौसेने आपणही खरेदी केले असतील. पण हीच सुरंगी आणि तिचा सुगंध गोव्यातील (Goa) काही घरांची अर्थव्यवस्थाही चालवते. देशात आता या झाडांचे कलमात रूपांतर करून व्यावसायिक लागवडीसाठी प्रयत्न सुरू झाले असले तरी सध्या तरी सुरंगी ठराविक भागांचीच मक्तेदारी आहे. वेणीत माळण्यासाठी, देवाला वाहण्यासाठी सुरंगीच्या फुलांचे विशेष महत्त्व असते,. शिवाय या फुलांचा वापर सौंदर्य प्रसाधने, आयुर्वेदिक औषधे, सुगंधी द्रव्ये, रंग आदींसाठीही केला जातो. गोव्यात या फुलांची सुरंगीची आवकच मर्यादित आसल्याने या फुलांची बाजारपेठही (Market) कमी झाली आहे.
यंदाच्या विपरित हवामानामुळेही मोसम जवळ आला असला तरी झाडांवर अजून कळ्यांचा बहर आलेला नाही. सुरंगी एक लक्षवेधी वृक्ष आहे. गोव्यात (Goa) हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या क्षेत्रात सुरंगीचे वृक्ष आढळतात. यातले बरेचसे वृक्ष दोन-तीन पिढ्यांपूर्वीचे आहेत. सुरंगीचे झाड साधारण आंब्याच्या झाडासारखेच मोठे असते. ते 70 -80 वर्षे जगते. जानेवारी मध्यापासून मार्चपर्यंत साधारण ते दोन बहरात फुलते. याच्या खोडालाच कळ्या येतात. सकाळी दिसू लागणाऱ्या कळ्या नऊ-दहा वाजेपर्यंत फुलतात. परागकण मोठ्या प्रमाणात असणाऱ्या सुरंगीच्या पिवळसर पांढऱ्या फुलांचा (Flowers) सुगंध आसमंतात दरवळतो. झाड बहरायच्या वयात आल्यानंतर किमान दोन पिढ्यांच्या आयुष्यात त्याचा सुगंध दरवळत राहतो. एका मोठ्या झाडापासून दरवर्षी साधारण 30 ते 35 किलो सुरंगी मिळते. फुलांचा खरा हंगाम वर्षाला केवळ पंधरा दिवसांचा असतो. यासाठी झाडाची कोणतीही काळजी घ्यावी लागत नाही.
अवघ्या पंधरा-वीस दिवसांचा मोसम असला तरी त्यासाठीची मेहनत तितकीच मोठी आहे. सुरंगीचे झाडाच्या पसरलेल्या फांद्यांना फुले येतात. सकाळी दिसणारे कळे दहा वाजेपर्यंत फुलतात. त्याआधी कळे काढावे लागतात. झाडाच्या फांद्या कमकुवत असतात. या झाडावर चढणेही अनुभवी आणि कसब असलेल्यांनाच शक्य होते. फुले छोट्या फांद्यांच्या खोडाला असल्याने ती काढणे कठीण असते. यासाठी झाडाला (Tree) दोऱ्या बांधून ती काढावी लागतात. अगदी भल्या पहाटे या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होते. ज्यांना कळे काढणे शक्य नाही, ते झाडाभोवती शेणाचा सडा काढून किंवा खाली मोठे कापड पसरून त्यात फुले गोळा करतात. काही ठिकाणी सुरंगीची झाडे आंब्याप्रमाणे खंडाने देण्याचीही प्रथा आहे.
सुरंगीचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदे खूप आहेत. हा जंगली वृक्ष असल्याने वातावरणातील बदलांचा तो मुकाबला करू शकतो. याची विशेष देखभाल घ्यावी लागत असल्याने खते व इतर खर्च होत नाही. डॉ. पराग हळदणकर सारखे शास्त्रज्ञ म्हणतात, सुरंगी हे संरक्षित करण्याची गरज असलेले झाड आहे. ते (पश्चिम घाटातील) सर्वच भागात होत नाही. जो लागवड योग्य भाग आहे तेथे प्रत्येक कुटुंबाने आपल्या परसबागेत दोन झाडे लावली तरी हा वृक्ष संरक्षित होईल व त्या कुटुंबाला यातून उत्पन्नही मिळेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.