संगीत क्षेत्रात वावरणारे आणि संगीत शिक्षक असलेले शास्त्रीय गायक रुपेश गांवस यांच्या ‘षड्ज’ या कोंकणी पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 9 जानेवारी रोजी केरी-सत्तरी येथे झाले.या पुस्तकांच्या लेखांची सुरुवात दैनिकांच्या पुरवणीतल्या ‘सदर’ लेखनाने झाली. सदर लेखन म्हटले की त्याची मर्यादाही एका परीने ठरलेली असते. फार तर ते सहा महिने, वर्षभर चालेल असाच कयास गृहीत धरलेला असतो. त्यात हे सदर ‘संगीत’ (Music) या विषयावर आधारलेले, म्हणजे ही मर्यादा अधिकच गृहीत धरणे झाले. पण रूपेश गांवसचे हे सदर वर्तमानपत्रातून चार वर्षे चालले.
एक वाचनीय आणि गोमंतकीय शास्त्रीय संगीताचा आवाका स्पष्ट करणारे ते सदर ठरले. सदर शास्त्रीय संगीत कलाकारांबद्दल जरी असल तरी त्यात क्लिष्टता नव्हती. अगदी साध्या-सोप्या आणि ओघवत्या भाषेत रूपेश गांवसने त्याच्या संगीतविषयक रसस्वादाची मांडणी रूपेशने अभ्यासूपणे केली होती. शिवाय हे सारे लेख शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात काम केलेल्या बुजूर्ग कलाकारांवर (Artist)असल्यामुळे त्यांच्या प्रतिभेचे मर्म एका विचक्षण वृत्तीच्या शास्त्रीय गायक कलाकारांकडून समजून घेण्याचा आनंदही या लेखांनी वाचकाना दिला. रुपेश गांवसने यातल्या काही कलाकारांच्या मैफीली प्रत्यक्ष अनुभवल्या होत्या रुपेश म्हणतो, ‘ ह्या मैफीली प्रत्यक्ष अनुभवतानाचा आनंदच आपण या लेखातून मांडण्याचा प्रयत्न करत होतो.
पं. तुळशीदास बोरकर, गानसरस्वती किशोरीताई आमोणकर, पं. रामदास कामत अशांचा प्रत्यक्ष सहवासही रुपेशला लाभला. त्या सहवासाचे चीजही रुपेशने आपल्या लेखांद्वारे केले. त्या व्यतिरिक्त पूर्व-पिढीतील शास्त्रीय संगीत क्षेत्रामधले दिग्गज पं. श्रीधर पार्सेकर, केशवराव भोळे, डॉ.रोहिणी भाटे, गजाननराव वाटवे अशां बद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. या कलाकारांविषयीही थोडक्यात रूपेशने या लेखांमधून करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय योगराज बोरकर, मिलिंद रायकर, पं. तुळशीदास नावेलकर, या समकालिकांच्या सांगीतिक योगदानाबद्दल रुपेशने आपल्या लेखांमधून सांगितले आहे.
रुपेश आपल्या लेखांमधून या संगीतकारांच्या योगदानाबद्दल लिहिताना, त्यांच्या कलाविष्काराने होणाऱ्या आपल्या आनंदाचीही चिकित्सा करतो. उदाहरणार्थ आपल्या एका लेखात एके ठिकाणी तो लिहितो, ‘मी अनेक तयार गायकांचे ऐकले आहे, पण अभिषेकबुवांचे गाणे माझ्या ह्रदयात घर करून का राहते? या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी बुवांचे ध्वनिमुद्रित गाणे (Song) मी खूपदा ऐकले. शेवटी असे कळून आले की बुध्दिचातुर्य आणि तयारी म्हणजे गाणे नव्हे जेव्हा ‘भाव’ ह्या घटकांची गाण्यात भर पडते तेव्हाच ते समोर बसलेल्यांच्या ह्रदयापर्यन्त पोहोचते. अभिषेकीबुवांना ती दृष्टी मिळाली होती.’ अशातऱ्हेने गाण्यातून आपल्याला मिळालेल्या प्रासादिक आनंदाची चिकित्सा रूपेश आपल्या लेखांमधून करतो आणि वाचकांनाही बौद्धीक आनंद देतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.