ग्रीष्मातल्या अनाहूत संध्याकाळी...
The Evening ग्रीष्मातल्या संध्याकाळी कधी कधी फारच लांबतात. अगदी नको तितक्या! अशावेळी त्यांचे काय करावे काही समजत नाही. कालचीही संध्याकाळ अशीच; काळाच्या सगळ्या सीमा - परिसीमा ओढून - ताणून दिवसाच्या रिकाम्या फटीत घुसवल्यासारखी! आणि ती इतकी गच्च बसलेली की कितीही असह्य झाली तरी तिला उचलून दूर भिरकावता येत नाही.
पापणी लवून उघडेस्तोवर ढगांच्या भुऱ्या कडा अजून काजळलेल्या दिसत. पण दिवस काही केल्या केल्या उतरायचे नाव घेईना. डोक्यातली कुठलीतरी एक शीर खोलवर सणकत होती. मी डोळे मिटून घेतले.
कातरवेळ जवळ येऊ लागली तशी तशी दवबिंदूंच्या पावलांनी कुण्या काळची वेदना आत पाझरू लागली. अन् पुन्हा भान येईपर्यंत सारा देह अदृश्य जखमांनी कसा चिंब झालेला होता. तुळशीच्या पारावर लावलेली वात आपल्या हृदयाच्या गतीने फडफडू लागली अन् त्या क्षणी आपले दुःख, आपण दिलेले दुःख, आपल्याला मिळालेले दुःख, आपण मिळवलेले दुःख, या कुडीपलीकडे आपण पाहिलेले दुःख, आपण अनुभवलेले दुःख, आपण दुसऱ्यासोबत वाटून घेतलेले दुःख रंध्रारंध्रातून स्रवू लागले.
क्षण दोन क्षण वेदनेत गेले अन् लक्षात आले की दुःख किती खरे आणि शाश्वत आहे! एका आकाशाइतकी सार्वत्रिक, सार्वकालिक आणि मूलभूत हक्कासारखी कोणालाही सहज मिळणारी गोष्ट दुसरी कोणती असेल तर ती दुःखच होय! म्हणून तर परमेश्वराला प्राप्त करून घेणाऱ्या समर्थांनाही विचारावेसे वाटले, ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे?’
समर्थांची आणि ‘जहॉं में ऐसा कौन है के जिसको ग़म मिला नहीं’ म्हणणाऱ्या साहिरांची जातकुळी मला एकच वाटते. दुःखाइतकी स्वस्त गोष्ट जगात दुसरी कुठलीच नाही. किंबहुना, दुःखाइतके शक्तिशाली जगात काहीच नाही.
दुःखाबरोबरची प्रत्येक लढाई माणूस हरतोच. हरल्यावर त्याचा स्वीकार करून त्याच्याशी जुळवून घेत, जगण्याचे नवे मार्ग शोधत आपण जगायला शिकतो इतकेच! पण दुःखाला हरवण्याची ताकद आपल्यात नाही. त्यामुळेच कदाचित मावळत्या सांजेला ग्रेस गुणगुणत असतील, ‘स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दुःख कुणाचे?’
आपल्याला जितके दुःख नको असते त्यापेक्षा कैकपटीने जास्त दुःखाला आपण हवे असतो. आणि या दुःखाचे ओझे घेऊनच आपण जन्मभर जगत राहतो. ‘जीने के लिये दर्द संभालने होंगे’ असे म्हणता म्हणता किती वेदना सांभाळून आपण जगत राहतो याची कल्पनाही करवत नाही.
याच वेदनांचे ओझे असह्य होऊन ग्रेस पुढे म्हणाले असतील, ‘हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे, मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते’. अशाच एखाद्या ग्रीष्मातल्या सायंकाळी हे वेदनांचे ओझे मानेवर झेलत उंबऱ्यावर फडफडणाऱ्या वातीला आपल्या हातांनी आवरून घेत असताना ग्रेस तिच्या आठवणींनी व्याकूळ झाले असतील.
‘ती’ म्हणजेही वेदनाच. ती प्रतिकूल असेल किंवा अनुकूल असेल, पण वेदनाच! आणि तीही भूतकाळातली. काय गंमत आहे ना! आपली वेदना कमी करायला आपण पुन्हा वेदनेचा म्हणजेच भूतकाळाचा आधार शोधत असतो. या विश्वाच्या पसाऱ्यात अनाहूत येऊन पडलेल्या आणि जगण्यासाठी गटांगळ्या खाणाऱ्या आपल्यासारख्या क्षुद्र जिवाला भूतकाळाचाच काय तो आधार!
कधी कधी मला वाटते माणसाच्या आयुष्यात दोनच शाश्वत गोष्टी आहेत. पहिली म्हणजे ‘दुःख’ आणि दुसरी ‘भूतकाळ’. दुःखाइतकाच माणसाच्या आयुष्यातला भूतकाळही शाश्वत आहे. तो नित्य आहे. चिरंतन आहे. वाईट असो वा गोड असो, हवाहवासा वाटणारा आहे.
गाढ झोपेतही चटका लागला तर अंग आवळून घेण्याचे भान आपल्याला असते, तसेच भूतकाळाविषयीचे माणसाचे भान सदैव जागरूक असते. आपण सतत भूतकाळातच जगत असतो. किंबहुना त्याही पुढे जाऊन मी असे म्हणेन की माणूस म्हणजेच भूतकाळ असतो!
‘पूर्वपुण्य ज्याचे मिळे सुख त्याला, कुणी राव होई कुणी रंक झाला’ असे कोण्या कवीने म्हणून ठेवलंयच! म्हणजे हा जन्मदेखील आपल्या वर्तमानावर चालत नाही. कोण म्हणेल, कष्टाने या जन्मात काहीही मिळवता येते. पण हे वाक्य किती पोकळ आहे याची जाण प्रत्येकाला आहे.
दिवसरात्र मजुरी करून हमालाला दिवसाला हजार रुपये मिळत नाहीत आणि काहीजण मात्र बापाच्या इस्टेटीवर बसल्या ठिकाणी तासाला लाखो रुपये कमावतात. हा जन्मसुद्धा ‘पूर्वजन्म कृतं कर्म’चेच फळ आहे. मग आपण वर्तमानात जगतो असे तरी कसे म्हणावे बरे!
मला वाटते, काळाला तीन परिमाणे नसतातच मुळी! काळाचे परिमाण एकच, ‘भूतकाळ’. आपण सतत भूतकाळातच जगत असतो. अगदी जन्माला आल्यापासून मरेपर्यंत! वर्तमान नुसता भ्रम आहे;
सकाळी सकाळी जमिनीवर अंगावर उतरणाऱ्या शिळ्या सूर्यकिरणांसारखा. दुःख आणि भूतकाळ हेच काय ते सत्य! ना वर्तमानाचा भरवसा, ना भविष्याचा! सुख तर मृगजळासाठीचा समानार्थी शब्दच. ग्रीष्मातल्या लांबलेल्या संध्याकाळी हे असलेच सावट घेऊन येतात आणि मिटलेल्या मंजिऱ्यांमधून हळुवार गुंजत राहतात ‘भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते.’
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.