गोवा: उत्तर गोव्यातले समुद्रकिनारे या दिवसात इतके गजबजलेले आहे की ‘समुद्राकाठी एखादी शांत सैर करावी’ वगैरे विचारांना तिथे थाराच राहिलेला नाही. दक्षिण गोव्यातले समुद्रकिनारे मात्र त्यामानाने (अर्थात कोलवा किनाऱ्याचा अपवाद वगळता) शांत आहेत. वेळसांव ते बेतुलपर्यंत लांबलचक पसरलेल्या समुद्रकिनाऱ्यावर अजून अशा काही जागा आहेत, जिथे समुद्राच्या लाटांचा आणि वाऱ्याचा आवाज, मानवी आवाजाच्या हस्तक्षेपाविना आपण ऐकू शकतो. पण आपले अस्सल रूप पूर्वीइतकेच देखणे राखण्यात यशस्वी ठरलेले लहान लहान किनारे, गोव्याच्या पार दक्षिणेकडे अजूनही काही आहेत.
कोला समुद्रकिनाऱ्यावर जायला पक्का रस्ता नसणे ही कोला समुद्रकिनाऱ्यासाठी एखादे वरदान असल्यासारखी गोष्ट आहे. आडवळणाला असल्यामुळे हा किनारा मानवी गर्दीला अस्पर्शित राहिला आहे. कडेला असलेल्या डोंगरमाथ्यावरून या किनाऱ्याची रेघ फारच सुंदर दिसते. तिथे असलेल्या गोड्या पाण्याच्या झऱ्यामुळे या किनाऱ्याची महती अधिकच वाढते
काणकोणच्या जवळ असलेल्या आणि पर्यटकांचे आकर्षण असणारा पाळोले समुद्रकिनारा आणि पाटणेचा शांत शुभ्र किनारा यामध्ये वसलेली आहे, एक इवलीशी किनारी जागा- कोलम! या किनाऱ्यावर अजूनही पारंपरिक मच्छिमारांची वस्ती आहे आणि अजूनही ती मानवी नीरवता आहे जी तिथल्या लाटांना आणि माडांच्या झावळ्यामधून वाहणाऱ्या वाऱ्याच्या आवाजाला आपसात संवाद करायला मोकळीक देते. हा इवलासा किनारा अरबी सागराच्या कुशीतले एक देखणे रत्न आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.