Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळाची रचना कशी होती माहितीये का?

प्राचीन तसेच आधुनिक काळातही पायदळ हे सैन्याचा कणा मानले जाते. पायदळ हासुद्धा मराठ्यांच्या सैन्याचा महत्त्वपूर्ण भाग होता.
History Of Goa
History Of GoaDainik Gomantak

सर्वेश बोरकर

प्राचीन तसेच आधुनिक काळातही पायदळ हे सैन्याचा कणा मानले जाते. पायदळ हासुद्धा मराठ्यांच्या सैन्याचा महत्त्वपूर्ण भाग होता. मराठा सैन्यात पायदळाला मुख्य स्थान प्राप्त झाले होते. पायदळाची गतिशीलता घोडदळापेक्षा निश्चित कमी होती, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी पायदळाकडे तेवढेच बारीक लक्ष दिले.

History Of Goa
Anandacha Chowk : ...म्हणून, पोर्तुगीज वसाहतीच्या काळात या भागाला 'आनंदाचा चौक' असे नाव देण्यात आले

पर्वतमय भागांत पायदळ जास्त उपयोगी पडत असे, तसेच किल्ल्यांच्या वा लष्करी ठाण्यांच्या रक्षणासाठी हजारो पायदळ सैनिकांची गरज भासत असे. युद्धात संख्येने सर्वांत जास्त असणारे पायदळ हातघाईच्या लढाईत पारंगत असते. इतर सैन्याच्या मानाने युद्धात पायदळाची हानी जास्त होते. पायदळ सैनिकांची भरती मुख्यत: मावळे, शेतकरी आणि इतरही काही लोकांमधून करण्यात येत असे.

स्वतः शिवाजी महाराजांतर्फे सैन्यभरती होत असे. प्रत्येक किल्ल्यात पायदळाच्या तुकड्या सज्ज असत. किल्लेदार शिपायांची हत्यारे स्वत:ची असत व दारूगोळा सरकारातून मिळे. पायदळात दहा माणसांचा दाहिजा (समूह) असे व हवालदार, जुमलेदार, एक हजारी, पंच हजारी, सरनोबत असे अधिकारी असत, सर्वांत लहान तुकडी १० सैनिकांची असे.

पायदळाची रचना अशी होती : १० सैनिकांवर - १ नाईक, ५ नाईकांवर - १ हवालदार, ३ हवालदारांवर - १ जुमलेदार, १० जुमलेदरांवर - १ हजारी, ७ हजारींवर - सेनापती (सरनौबत), मराठा सैन्याच्या पायदळत सुमारे १०,००० सैनिक होते.

पायदळातील जुमलेदारास १० होन प्रतिवर्षी मिळत, तर सबनिसास ४० होन मिळत असत. हजारीस ५०० होन किंवा १२५ रुपये दरमहिना प्राप्ती होत असे. १०० सैनिकांच्या अधिकाऱ्यास ३ ते ९ रुपये दरमहा मिळत असत.

पायदळाचे मुख्य कार्य पर्वतीय आणि दुर्गम भागातील शत्रूशी लढण्याचे असे. सोबत त्यांना घोडेस्वरांचेसुद्धा रक्षण करावे लागे. पायदळात ठिकठिकाणाहून गोळा केलेले अनेक नवशिके लोक होते. त्यांना युद्धाचे शिक्षण देण्याकरिता त्यांना मोकळ्या शेतात तीन महिने तळ ठोकावा लागे, वेळ पडल्यास घोडेस्वारी, युद्धकलेचे सर्व डाव कसे खेळावेत आणि लढाई कशी करावी, याविषयी शिक्षण काळजीपूर्वक दिले जात असे. सैन्य वर्षातील आठ महिने मुलूखगिरीवर जाई व चार महिने छावणीस असे.

History Of Goa
Religious Controversy : तिरस्काराची मंदिरे उभारून आपण शांतता निर्माण करू शकू का?

सैन्याची शिस्त कडक असे. आणलेली लूट सरकारात भरावी लागे, तसेच मुलूखगिरीवर असताना स्त्रियांना नेण्यास मज्जाव होता. धार्मिक स्थाने, स्त्रिया, मुलेबाळे यांना किंवा प्रजेला उपद्रव दिल्यास कडक शासन केले जाई.

मराठा पायदळात पाच प्रकारचे भाले वापरात होते, इटा व बर्च्छा (फेकण्याचे) हातातला भाला, सांग किंवा संग (लांब सरळ टोकदार फाळाचा) व फाळाचे टोक बाकदार चोचीसारखे असलेला भाला. पायदळातील सैनिक तलवारीसोबत ढाल वापरत असत, पायदळातील सैनिकांकडे संगिनीसुद्धा असत. राजांनी सैन्यात एक शिस्त निर्माण केली.

सैन्यासंबंधी निरनिराळ्या तजविजींवर शिवरायांचे बारकाईने लक्ष असे, त्याचप्रमाणे आपल्या सैन्याकडून रयतेला यत्किंचितही उपद्रव होऊ नये म्हणून ते खूप दक्ष असत. राज्याभिषेकाच्या थोडे आधी म्हणजे १६७४मध्ये शिवरायांनी चिपळूण येथील अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘मोघल मुलकात आले त्याहूनही अधिक तुम्ही रयतेस काडीचाही आजार द्यावयाची गरज नाही’.

पत्रामध्ये लष्करी छावणीमध्ये शिस्त कशी हवी हेसुद्धा राजे लिहितात. चोख शिस्त असलेल्या सैन्याला प्रशिक्षणदेखील तितकेच महत्त्वाचे असते. त्यासाठी आवश्यक आयुधे, शस्त्रे आणि इतर सामग्री वेळेवर उपलब्ध करणेसुद्धा महत्त्वाचे असते. या बाबतसुद्धा शिवरायांनी एक धोरण अंगीकारले होते. वेळप्रसंगी परकीय सत्तांकडून दारूगोळा आणि शस्त्रे ते घेत असत. पायदळाचे सरनौबत म्हणून इ. स १६४३ दरम्यान नूरखान बेग आणि नंतर येसाजी कंक यांची नेमणूक इ. स १६५८ दरम्यान पायदळ सरनौबत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती.

येसाजी कंक राजगड नजीकच्या भुतोंडे गावचे सर पाटीलकी असणारे घराणे. सरनौबत येसाजी कंक म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचे बाल सवंगडी. या सवंगड्याने आपल्या जीवासरशी वेळोवेळी अगदी अखेरपर्यंत स्वराज्याची साथ दिली. जवळजवळ ३० वर्षे येसाजी पायदळाचे सरनौबत होते. अफजल प्रकरण, ७०चा वादळी पराक्रम, भागानगर भेट इत्यादी ठिकाणी याचे भरपूर उल्लेख आहेत.

येसाजी कंक यांचे पुत्र कृष्णाजी कंक हे शंभूकालात गोव्यात फोंड्याच्या लढाईत गोळा लागून धारातीर्थी पडले. पायदळाचे सरनौबत येसाजी कंक यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिलेल्या ८ दिवसांच्या लढाईमुळे छत्रपती संभाजी महाराज यांना वेळेत फोंडा गाठता आले व गोव्याचा फोंडा किल्ला सुरक्षित राहिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com