Religious Controversy : तिरस्काराची मंदिरे उभारून आपण शांतता निर्माण करू शकू का?

पुढच्या काही वर्षांत धार्मिक प्रवृत्तींना अधिकच उत्तेजन मिळून उत्तर भारताप्रमाणेच गोव्यातही दंगली पेटू शकतात, अशा प्रकारचाच गोवा आम्हा सर्वांना भविष्यात पुढे न्यायचा आहे काय?
Religious Controversy
Religious ControversyDainik Gomantak
Published on
Updated on

स्वातंत्र्य दिनाचा तिरंगा हवेत उंच माथे करून फडकत होता. त्याचवेळी माझ्या हातात गोव्यातील हिंदुत्व व धार्मिक ध्रुवीकरण हे संशोधन-पत्र आले. आपल्याला लोकशाहीवादी बनायचे होते. त्याचसाठी स्वातंत्र्याचा अट्टहास केला होता, भारताला गुलामीतून मुक्त होऊन नवीन समाज घडवायचा होता, त्यासाठी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांची प्राणांची बाजी लावली आणि स्वातंत्र्यानंतरही एक बलवान देश जो सर्वांचे हित संरक्षण करेल आणि अत्यंत प्रगतिशील समाज घडवेल यासाठी कष्ट उपसले.

Religious Controversy
Shravan Somwar 2023 : श्रावण सोमवारी अशी करा पूजा, जाणून घ्या शुभ वेळ आणि पद्धत

महात्मा गांधींच्या चळवळीचे उद्दिष्ट प्रेम, सद्भावना या तत्त्वांच्या जोरावर अहिंसा व कटुतेवर विजय मिळविण्याचे होते. त्याचसाठी त्यांनी धर्मनिरपेक्षतेला सर्वधर्मसमभावाचे तत्त्व जोडले होते. त्यात सर्व धर्म, जाती व जागतिक मानवतावादी मूल्यांची कदर करण्याचे तत्त्व देशात उभे केले. महात्मा गांधींना जेव्हा त्यांचा धर्म कोणता, असे विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी हिंदू धर्म असा जबाब कधीच दिला नाही. सर्व धर्मांमध्ये माणुसकीलाच प्राधान्य देण्यात आल्याचे ते प्रतिपादन करीत.

त्यामुळेच आपल्या लोकशाहीप्रधान समाजात राक्षसी हव्यास बाळगणारी धर्मांधता निर्माण होऊन देशात भीती आणि असंतोषाची लाट निर्माण होते, तेव्हा स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतर आपण कोणत्या मार्गाने पुढे जात आहोत, असा विचार कोणाही विचारी माणसाला करावाच लागतो. आपल्याला प्रगतिशील समाज घडवायचा होता, सामर्थ्यशाली देशात आर्थिक उन्नती गाठायची होती, परंतु समानता आणि सौहार्द हीच तत्त्वे त्या प्रगतीच्या मुळाशी असायला हवी होती.

आपला राष्ट्रवाद हा वंशवादाचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी तर नव्हताच व जातीय भावनांना खतपाणी घालून लोकांमध्ये राग, द्वेष आणि तिरस्कार उत्पन्न करण्यासाठी तर त्या मार्गाने आपल्याला जायचेच नव्हते. दुर्दैवाने राजकीय सत्तेच्या आकांक्षेने विविध समाजामध्ये दरी निर्माण केली जात आहे. लोकांच्या ओळखी, अस्तित्व आणि उपजाती यामध्ये भेदभाव निर्माण करण्याचे एक कारस्थान सुरू आहे.

मानवतेवर हा फारच मोठा आघात मानला पाहिजे. एका बाजूला मणिपूर जळते आहे, तर दुसऱ्या बाजूला दिल्ली, हरयाणामध्ये दोन समाजांमध्ये हिंसक चकमकी सुरू आहेत. हरयाणामध्ये परिस्थिती गंभीर होत चालली आहे.

दुसऱ्या समाजांवर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन करून तिरस्काराची मोहीमच सुरू करण्यात आली आहे. पोलिस स्वस्थ बसून आहेत, सरकारी स्तब्धतेवरही प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. किंबहुना सरकारलाच असे विभाजन आणि धार्मिक ध्रुवीकरण तर नको ना, असा प्रश्‍न देशातील विचारवंतांना पडला आहे.

केनिथ बो निल्सन, जिगिषा भट्टाचार्य व सोलानो दा सिल्वा या तिघा संशोधकांनी गोव्यातील हिंदुत्वाची आक्रमकता व धार्मिक ध्रुवीकरण या संदर्भात केलेल्या संशोधनात देशभर चाललेल्या हिंसक घटनांची सावली गोव्यावरही पडली असल्याचा निष्कर्ष काढला आहे. या लेखात त्याच अनुषंगाने आपल्याला काही अनुमाने काढायची आहेत.

गोव्यातील हिंदुत्ववादी नेते सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्याविरोधात केलेली काही विधाने निश्‍चितच ख्रिस्ती समाजाच्या भावना दुखावणारी होती. त्यांनी वसाहतवादी पोर्तुगालला त्याहीपेक्षा त्या काळातील ख्रिस्ती चर्चधर्म संस्थेच्या धर्मांतर व जुलमी राजवटीला सेंट झेव्हियर हेच जबाबदार होते, असे वक्तव्य करून या अराष्ट्रीय व्यक्तीचे उदात्तीकरण ख्रिस्ती समाज करीत आहेत, ते गोव्याचे तारणहार कसे होऊ शकतात,

असा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यानंतर फादर बोलमेक्स परेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात काही बेताल वक्तव्ये केली. त्यांचे विधान वेलिंगकरांना काहीसे उत्तरच होते. छत्रपती शिवाजी महाराज हे शूर योद्धे आणि कर्तृत्ववान प्रशासक म्हणून थोर होतेच, परंतु त्यांना देव म्हणून पुजायचे का, याचा आपल्या हिंदू भावांनी विचार करायला हवा, असे चर्चच्या व्यासपीठावरून म्हणाले. अनेका बुद्धिवाद्यांना परेरांच्या वक्तव्यात आक्षेपार्ह काही वाटले नाही, परंतु ख्रिस्ती धर्मगुरूने हे विधान चर्चच्या व्यासपीठावरून करणे आणि त्यातही हिंदूंना उद्देशून आवाहन करणे कितपत उचित आहे, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला.

वस्तुतः छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक ठिकाणी मंदिरे आहेत. गोव्यातही त्यांनी सप्तकोटेश्‍वराच्या उद्ध्वस्त देवस्थानाची प्रतिष्ठापना केली. तेथील शिवलिंगाचा वापर विहिरीतून पाणी काढण्यासाठी, पायाला उंचवटा म्हणून केला जात असे. हिंदू समाजामध्ये नीतिधैर्य निर्माण करण्यासाठी महाराजांची ती कृती निश्‍चितच गौरवण्याजोगी होती. त्यामुळे या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा कोणी आणून बसविली असती, तर तिला कोणी आक्षेप घेतला नसता. परंतु गोव्यात तसे घडले नाही.

शिवाय छत्रपती शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज राजसत्ता यांच्यामध्ये अनेक करारनामे झाले आहेत. परंतु त्यावरून शिवाजी महाराजांचे गोव्यातील त्यांचे श्रद्धास्थान डळमळीत होत नाही. तरीही फादर बोलमेक्स परेरा यांच्या विधानांची शिवप्रेमींनी ज्या आक्रमकतेने दखल घेतली, तेवढी वेलिंगकरांच्या वक्तव्याची ख्रिस्ती समाजातील जहालवाद्यांनी चिंता केली नाही. परंतु फादर बोलमेक्स परेरा यांनी केलेले जाहीर विधान म्हापसा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेशी आता जोडले जातेय.

ज्यांनी हा प्रकार केला त्यांना जमावानेच पकडून दिले असले तरी त्यांच्या मालमत्तेवर हल्ला झाला. तेथे एक मंत्री धावून गेला, परंतु हा प्रकार या तिघा आरोपींनी दारूच्या नशेत केल्याचे आता उघडकीस आले आहे. या पार्श्‍वभूमीवर वेलिंगकरांचे वक्तव्य आणि फादर बोलमेक्स परेरा यांची मल्लिनाथी हे दोन्ही प्रकार जातीय ध्रुवीकरणाचेच भाग होते, असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो.

महाराजांवरील उद्गारानंतर शिवप्रेमींनी केलेले आंदोलन, सांकवाळ येथील चर्चवर- ते लक्ष्मी नृसिंहाचे देऊळ असल्याचा सतत दावा करून तेथे काही हिंदू घटकांनी केलेली पूजा व अलीकडेच बोरी येथे इस्कॉनचे देऊळ उभारण्यासाठी डोंगरावर चाललेली जंगलतोड व तिला असलेला स्थानिकांचा विरोध, या जरी तुरळक वाटत असल्या तरी अलीकडच्या काळातील अशांतता माजवणाऱ्या धार्मिक घटना आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात राज्यात अशांतता माजवणाऱ्या घटनांची दखल घेतली. लोकांनी शांतता पाळावी, संयम राखावा व शांततापूर्ण गोव्यात सौहार्द बिघडू देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. परंतु वेलिंगकरांच्या विधानासंदर्भातील धार्मिक अशांततेचा वेध घेणाऱ्या संशोधकांनी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीही केलेले याचसंदर्भातील आवाहन किती प्रभावी आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.

अशांतता निर्माण करणाऱ्या घटकांपर्यंत मुख्यमंत्र्यांचे हे आवाहन योग्य संदर्भात पोहोचते का? कारण संशोधकांच्या मते, सावंत यांनी निवडणुकीच्या काळात केलेल्या काही वक्तव्यांमुळे हिंदूंचे ध्रुवीकरण होण्यास मदत झाली. राज्याची संस्कृती ज्या देवळांमुळे टिकली त्यांचा नाश पोर्तुगिजांनी केला, त्याच जुलमी वसाहतवादी प्रवृत्तींनी मोडून टाकलेली देवळे पुन्हा उभारण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. अभ्यासकांच्या मते हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याच्या भाजपच्या विस्तृत डावपेचाचीच ही गोव्यातील आवृत्ती आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांसदर्भात गोव्यात अलीकडच्या काळात खूपच जागृती झाली आहे. कळंगुट येथे कोणतीही परवानगी न घेता एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणून बसविण्यात आला. या पुतळ्याला विरोध करणाऱ्या सरपंचांना माफी मागावी लागली, परंतु त्यानंतर ख्रिस्ती पाठिंबा मिळताच ते आपल्या मूळ पदावर आले.

फादर बोलमेक्स परेरा यांनाही माफी मागायला लावू नये, यामागे अनेक ख्रिस्ती प्रवृत्ती उभ्या होत्याच, त्यांनाही ख्रिस्ती ध्रुवीकरणात रस आहे. अनेक ख्रिस्ती आमदार भाजपमध्ये गेले आणि त्यातील काहीजण तर भगवी वस्त्रे परिधान करून सोवळेपणाने हिंदू देवतांची पूजा करतानाची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यापासून या प्रवृत्तीचे पित्त खवळले आहे. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत ख्रिस्ती चर्च काही ठोस भूमिका घेऊ इच्छिते, यात तथ्य आहे.

सप्तकोटेश्‍वर देवस्थानात मागेपुढे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा उभी करण्याचाही प्रयत्न होऊ शकतो, स्थानिक देवस्थान समितीने विरोध केला तरी काही प्रवृत्ती सध्याच्या वातावरणाचा लाभ उठवून अशी भूमिका घेऊ शकतात.

ही उत्तेजना गोव्यात मोठ्या प्रमाणात आलेल्या महाराष्ट्रीय तरुणांकडूनही मिळते आहे. गोव्यात अलीकडच्या वर्षात वेर्णा व इतर औद्योगिक वसाहतीमध्ये महाराष्ट्राच्या सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणात युवक आले.

या वसाहतींमध्ये एकेकाळी गोव्यातील ग्रामीण युवतींचे प्राबल्य होते. परंतु अलीकडच्या काळात त्यांची जागा सीमेपलीकडील तरुणींनी घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात एक हाक दिली तर दोन हजार युवक आम्ही सहज उभे करू, असा दावा परवा नार्वे येथील एका स्थानिक नेत्याने केला.

राजकीय संशोधकांच्या त्रयीने गोव्यातील परिस्थितीवर केलेले भाष्य सरकारच्या अनास्था किंवा ‘मिलीभगत’वर नेमकेपणाने बोट ठेवते. मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात जरी मवाळ हिंदुत्ववाद चालविला तरीही ख्रिस्ती मतांसाठी त्यांनी ‘मिशन सालसेत’ चा प्रयोग केला. शिवाय ख्रिस्ती धर्म संस्थेशी संघर्ष होईल, अशा भूमिकेची कधी जाहीर वाच्यता केली नाही,

उलट त्यांच्या काळात चर्च धर्म संस्थेला आपले अनेक जमीनविषयक प्रश्‍न सोडविता आले. परंतु सध्या मुख्यमंत्री आपल्या कथित विभाजनवादी वक्तव्याने दोन धर्मीयांमध्ये तेढ वाढवीत आहेत. शिवाय ज्ञानव्यापी मशिदीच्या प्रश्‍नावर हिंदूंच्या बाजूने निकाल लागला तर गोव्यातही काही प्रवृत्ती जुन्या चर्चसंदर्भात दावे करू लागतील, अशी येथे एक सुप्त भीती आहे. संशोधक त्रयीने सादर केलेला अभ्यास जरी वेलिंगकरांच्या २०२२मधील वक्तव्यावर आधारित असला तरी त्यानंतर गोव्यातील विविध घटनांनाही त्यांचे निष्कर्ष लागू होतात.

वेलिंगकरांनी सेंट फ्रान्सिस झेवियरना ‘गोंयचो सायब’ म्हणायला हरकत घेताना विष्णूचे अवतार असलेले परशुराम हेच गोव्याचे खरे तारणहार- म्हणजेच निर्माते, तेच खरे विधाते असल्याचा दावा केला होता. वास्तविक गोव्यातील बहुजन समाजाला ब्राह्मण्य सबलीकरणाचे प्रतीक असलेला परशुराम कसा मान्य होऊ शकतो, हाच खरा प्रश्‍न आहे. अजूनही देशात अनेक ठिकाणी वर्णव्यवस्थेचा विरोध करून ब्राह्मणांच्या मक्तेदारीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा परशुरामाची आठवण ब्राह्मणांना होत आली आहे.

त्या दृष्टीने आपल्या पुराणकथांमध्ये ब्राह्मण प्राबल्याचे प्रतीक म्हणूनच परशुरामांना उभे करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातही बीएसपी व समाजवादी पक्षाने ब्राह्मण मतदारांना लुभावण्यासाठी परशुरामांच्या प्रतिमेचा वापर केला होता. परंतु गोव्यात वेगळ्या संदर्भात परशुरामांचे नाव घेतले जाते. सारस्वत ब्राह्मण आपली परंपरा परशुरामांपासून सांगत असले तरी बहुजनांमध्येही गोव्याचा तोच निर्माता असल्याचा समज आहे.

समुद्र हटवून येथील खारट नापीक जमीन शेतीयुक्त सुपीक बनविण्यासाठी परशुरामांनी चमत्कार केला, अशी आख्यायिका आहे. वेलिंगकर जर आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघात नसले तरी ते वारंवार सनातनी प्रवृत्ती व त्यांचाच भाग असलेल्या हिंदू जागृती गटांच्या व्यासपीठांवर सतत दिसतात. ते भाजपच्या व्यासपीठावर नसले तरी त्यांच्या एकूण चळवळीची रचना देशभर चालू असलेल्या हिंदू ऐक्याचाच पुरस्कार करणारी आहे.

महत्त्वाचे म्हणजे भाषा सुरक्षा मंचची स्थापना व त्यानंतरचे आंदोलन यामुळे वेलिंगकरांना आपला नेता मानणारे घटक आज कोकणी चळवळीतही आहेत. त्यामुळे वेलिंगकरांना सध्या हिंदू ऐक्याबाहेरही मानणारा घटक आहे, त्यामुळे संघात नसूनही त्यांचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट संघ नेत्यांपेक्षाही अधिक चांगली प्रसिद्धी मिळविण्यात ते यशस्वी ठरले आहेत व परशुराम- सेंट झेव्हियर वादामुळे ते गोव्यातील हिंदुत्ववादी कार्यक्रमाचे प्रमुख नेते बनले आहेत. त्यांचे सनातनी प्रवृत्तींबरोबरचे संबंध दृढ होत गेल्याने गोव्यातील हिंदू आक्रमकतेला सध्या अधिकच धार चढली आहे, हे नाकबूल करता येणार नाही.

Religious Controversy
Goa Investment News: नवीन गुंतवणुकदारांची गोव्याकडे पाठ; गतवर्षीच्या तुलनेत गुंतवणूक आकर्षित करण्यात राज्य मागे

गोव्यातील या अलीकडच्या घटनांमुळे भाजपचा हिंदुत्ववादी कार्यक्रम या प्रमुख पक्षांसह इतर अनेक संस्था निकराने पुढे नेऊ लागल्या आहेत, असा निष्कर्ष संशोधक त्रयीने काढला आहे. भाजपच्या पठडीबाहेरचे परंतु त्याच विचारसरणीला जोडलेले अनेक घटक भाजपच्या राजवटीत अधिक सक्रिय बनले, तर नवल नाही. त्यासाठी या संशोधक त्रयीने उत्तर भारतातील हिंस्र गोमाता संरक्षक गटांचे उदाहरण दिले आहे. हे घटक भाजप किंवा आरएसएसशी जोडलेले नसतीलही, परंतु हिंदू राष्ट्राच्या भावनेला खतपाणी घालणारीच त्यांची कृत्ये चालतात.

गोव्यातही सनातनी प्रवृत्तींनी हिंसक कारवाया केल्या तरी त्यांना भाजप सरकारचा पाठिंबा मिळाला होता. शिवाय गेल्या काही वर्षांत फोंडा येथे अखिल भारतीय हिंदू राष्ट्र संमेलने सातत्याने घेतली जातात. तेथे तर जाज्वल्य हिंदुत्ववादाचा सतत पुरस्कार केला जातो. वेलिंगकरांनी प्रक्षोभक विधाने केली तेव्हाही सरकारने त्यांच्याकडे डोळेझाक केली. किंबहुना सावंत यांच्या भूमिकेमुळेच तसे प्रक्षोभक विधान करायला धजावले की काय, असा सवाल संशोधक त्रयीने केला आहे. ज्ञानव्यापी मशीद वादासंदर्भातही गोव्यातील उद्ध्वस्त देवळांचे पुनर्निर्माण करण्यासंदर्भात सावंत यांचे विधान गांभीर्याने घेतले गेले.

संघाच्या ऑर्गनाइझर या मुखपत्रातही सावंत यांचे विधान ठळकपणे प्रसिद्ध झाले, त्यात गोव्यातील हिंदू संस्कृती व देवालये जी पोर्तुगिजांच्या काळात उद्ध्वस्त करण्यात आली, त्यांची पुन्हा उभारणी व्हावी, यावर या मुलाखतीत सावंत यांनी भर दिला होता. या वातावरणात गोव्यातील अधिकृत राष्ट्रीय हिंदुत्व व येथील वेगवेगळ्या हिंदू प्रवृत्ती यांच्यामधील सीमारेषा पुसट होत गेली. अलीकडच्या काळातील महत्त्वाची घटना म्हणजे वेलिंगकर व गोव्यात बंदी घालण्यात आलेले श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालीक यांची भेट. त्यानंतर याच काळात बजरंग दलाची झालेली वाढ शिवाय ‘करणी सेना’ या एका नव्या संघटनेचा जन्म चिंताजनक आहे. लक्षणीय आहे. कळंगुट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापनेपासूनच्या अलीकडच्या घटनांमध्ये याच प्रवृत्तींचा सहभाग असल्याचे आढळून आले आहे.

संशोधक त्रयीने देशभरातील घटनांमुळे गोव्यातील अल्पसंख्याकांवर कसा परिणाम होत गेला, याचेही विवेचन केले आहे. देशभर हिंदू ऐक्याच्या आक्रमकतेमुळे मुस्लीम व अलीकडच्या काळात ख्रिस्ती समुदायालाही लक्ष्य बनविण्यात आले. ख्रिस्ती धर्म परंपरांना आव्हान देत अनेक ठिकाणी चर्चेस व धर्मगुरूंवर हल्ले करण्यात आले. गोव्यात अनेक मतदारसंघांत ख्रिस्ती मते निवडणुकीचा कल पलटवत असतात. परंतु मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत ख्रिश्‍चनांच्या या प्राबल्यांना आव्हान देण्याचेच त्यांचे मनसुबे आहेत, असे या संशोधक त्रयीला वाटते.

देशाच्या अनेक राज्यांमध्ये भाजपने कट्टर हिंदुत्ववादाची कास धरली. अनेक ठिकाणी अल्पसंख्याकांना उमेदवारीही देण्यात आली नाही. परंतु गोव्यात २०२२च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे एक तृतीयांश उमेदवार ख्रिस्ती होते. तरीही संशोधक त्रयी म्हणते, संघ परिवाराने या ख्रिस्ती मतदारसंघात अधिकृत भाजप उमेदवारांविरुद्ध हिंदूंनी एकजूट करावी, यासाठी छुपेपणाने प्रयत्न चालविले होते. पक्षाची परंपरागत हिंदू मते बिगर ख्रिस्ती उमेदवारांना मिळावीत, यासाठी संघ परिवाराने प्रयत्न केले. त्यामुळे कित्येक भाजप पुरस्कृत ख्रिस्ती उमेदवार एकतर हरले किंवा अत्यंत कमी मतांच्या फरकाने विजयी झाले.

संशोधक त्रयींच्या मते गोव्यात राजकीय व धार्मिक ध्रुवीकरण प्रकर्षाने जाणवू लागले आहे. २०२२च्या विधानसभा निवडणुकीत केवळ १३ टक्के ख्रिस्ती मते भाजपला मिळाली आहेत. त्यापूर्वीच्या निवडणुकीत भाजपला १९ टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत ख्रिस्ती मते भाजपविरोधी इतर पक्षांच्या पदरात पडली. दक्षिण गोव्यात तर १४ पैकी केवळ एकच ख्रिस्ती मत भाजपकडे सरकले. या संशोधक त्रयीने लोकनीती-सीएसडीएसच्या सर्वेक्षणाचा अहवाल उद्धृत करून म्हटले आहे ः

गोव्यातील भावना सध्या धार्मिकदृष्ट्या विभागल्या गेल्या आहेत. केवळ ख्रिस्ती मतदारांपुरत्याच नव्हे तर मुस्लिमांच्याही. गेल्या दहा वर्षांत ही मतविभागणी अधिकच प्रकर्षाने सामोरे येत आहे. शिवाय सेंट फ्रान्सिस झेवियर विरुद्ध भगवान परशुराम वादामुळे दोन्ही समाजांतील तीव्र भावनांना खतपाणीच मिळाले. मी शुक्रवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची मुलाखत घेतली त्यात नेमकेपणाने त्यांना ध्रुवीकरणाचा प्रश्‍न विचारला होता. ते कठोरपणे धर्मांधता मोडून काढण्याचे बोलले, परंतु मग वेलिंगकरांच्या वक्तव्याची सरकारने कितपत दखल घेतली? ‘करणी सेने’ने सांकवाळ येथे केलेल्या उचापतीनंतरही कोणालाही अटक कशी झाली नाही, हे प्रश्‍न उपस्थित होतात.

येथे मुद्दा आहे तो तिरस्काराची मंदिरे उभारून आपण शांततेचे निर्माण करू शकू का? सद्‍भाव आणि बंधुत्व ही तत्त्वे तिरस्काराच्या ज्वाळेतून कशी रुजू शकतील?

गोव्यात राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग म्हणून एका बाजूला हिंदू भावनांना प्रक्षोभित केले जात असताना ख्रिस्ती समाजातही कटुता वाढविणाऱ्या प्रवृत्ती प्रबळ होत आहेत. त्यामुळे पुढच्या काही वर्षांत धार्मिक प्रवृत्तींना अधिकच उत्तेजन मिळून उत्तर भारताप्रमाणेच गोव्यातही दंगली पेटू शकतात, अशा प्रकारचाच गोवा आम्हा सर्वांना भविष्यात पुढे न्यायचा आहे काय?

(संशोधक त्रयींचा परिचय ः केनिथ बो निलसन ः हे नॉर्वेच्या ओसले विद्यापीठात अध्यापन करतात, ते भारतीय राजकारणावरचे तज्ज्ञ आहेत, शिवाय भारतातील लढे, लोहखनिज खाणी व हिंदू राजकारणाचे अभ्यासक आहेत.

जिगिषा भट्टाचार्य या केंब्रिज विद्यापीठाच्या स्कॉलर असून संस्कृती, महिला प्रश्‍न व राजकारणाच्या जाणकार मानल्या जातात.

सोलोनो दा सिल्वा हे बिट्‍स पिलानीचे (गोवा) स्कॉलर असून मानवशास्र आणि समाजशास्त्राचे जाणकार आहेत.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com