Changed Weather And Rainfall गोव्यात पाऊस लांबलाय यात तथ्य आहे. अशी प्रतीक्षा मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधी अनुभवलेली नाही. पाऊस अगदी ठरलेल्या पाहुण्यांसारखा ७ जूनला दाखल व्हायचा. पुढची चार महिने अक्षरशः हैदोस घालायचा. घामाने निथळणाऱ्या गोवेकरांना सुरुवातीला हायसे वाटण्याचा अवकाश त्यानंतर त्याचा जीव तो मेटाकुटीला आणायचा.
गेल्या तीन-चार वर्षांत मात्र पावसाने आपला पोत बदलला. तो आता अनाहुत पाहुण्यासारखा मे महिन्यातच अवतीर्ण होऊ लागला. हवामान खाते म्हणायचे हा पावसाळा नाही, हा मॉन्सूनपूर्व पाऊस.
तुमचा नेहमीचा पाहुणा- जो नंतर चार महिने पाहुणचार झोडणार आहे, तो ठरल्याप्रमाणे ७ जूनलाच दाखल होणार. मात्र, पावसाने ही वारी यंदा बदलली.
यंदा पावसाळ्याने सर्वांच्या तोंडचे पाणी पळविले. प्री-मॉन्सून पाऊस नाही आणि ७ जूननंतर संपूर्ण एक आठवडाही लोटला. पावसाने तोंड लपविले, ते लपविलेच.
मी अनेक वर्षे सातत्याने तापमानवाढीवर लिहितो आहे. शास्त्रज्ञांनी वातावरण बदलावर नेमके बोट ठेवले. आता पावसाळ्याचे काही खरे नाही. कारण तापमान वाढ पाऊस बेभरवशाचा असणार, तो कधीही येईल व धो-धो बरसेल.
जो पाऊस चार महिने कमी-अधिक बरसत आपली नजाकत दाखवत असे, तो आता अवघ्या काही दिवसांत रुद्रावतार धारण करेल. म्हणजे जो पाऊस १२० दिवस बरसत असे, तो अवघ्या काही वीस-तीस दिवसांत तुम्हाला झोडपून काढेल. तुम्ही वेळीच सावध व्हा.
कारण दुबईला पाऊस पडत नाही. तेथे सलग दोन तास पाऊस पडला, तर त्रेधातिरपीट उडते. कारण पावसाचे पाणी वाहून जाण्याची तेथे व्यवस्थाच नाही. कोणी तसा विचारच केलेला नाही. त्यामुळे तेथे पाऊस पडला म्हणजे बुडती. आपल्याकडे वेगळे घडत नाही.
दिल्लीत आता तीन तास पाऊस पडतो. अशा पावसाचा कोणी अंदाज केलेला नाही. त्यामुळे दिल्ली बुडू लागली आहे. गोव्यात आणि केरळात पावसाचा अंदाज आम्ही जसा केलाय तसा आता घडणार नाही. पाऊस अवघ्या काही काळात असा दणादण बरसेल की दैवी कोप झाल्याचा भास आपणाला होईल.
केरळेने असा प्रलय गेल्या वर्षी भोगलाय. असे आक्रीत तेथे पहिल्यांदा घडलेय. कारण अशा पर्जन्यवृष्टीची कोणी कल्पनाच केलेली नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे शास्त्रज्ञांच्या इशाऱ्याकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले. अनेक धरणे बांधली. डोंगरांचे निर्दालन केले. पश्चिम घाट उद्ध्वस्त करून टाकले.
त्यामुळे डोंगरावर राखले जाणारे पाणी एकदम खाली घसरले. नैसर्गिक ढाली आपण उद्ध्वस्त केल्या. पणजी दरवर्षी का बुडते? कारण आपण आल्तिनो डोंगर कापून टाकला. अमर्याद बांधकामास मंजुरी दिली. पणजी शहराची क्षमता लक्षात घेतली नाही. पाणी वाहत जाण्याचे मार्ग अडविले. स्मार्ट सिटीनेही या नैसर्गिकतेकडे दुर्लक्ष करून या ‘बुढ्ढी’ पणजीच्या चेहऱ्यावर लेप चढविण्याचे काम केले आहे.
त्याहून चांगले उदाहरण, गेल्या वर्षी पुरात गटांगळ्या घातलेल्या सत्तरीचे द्यावे लागेल. सत्तरी हा जंगल भाग, परंतु तेथे कोणी पुराचा विचार झोपेत तरी केला असेल, परंतु आमच्या पथकाने गेल्या वर्षी तेथे पडझड झालेली घरे पाहिली. अनेक घरे कोसळली होती. वृक्ष उन्मळून पडले होते व गावचा चिखल झाला होता.
नदीने रौद्र स्वरूप धारण केले होते, याचे कारण होते, डोंगराची झालेली कत्तल. नदीवरील बांध व नैसर्गिक निचरा व्यवस्थेची झालेली हेळसांड, यावर्षीही वादळाचे व त्यातून उद्भवणारी हानी पुन्हा होणार नाही, असे नाही.
कारण जंगलांना लागलेल्या मानवनिर्मित आगी, स्थानिकांनी बागायतींसाठी जंगलांवर केलेले आक्रमण या आगीचे कारण असल्याचे तज्ज्ञ सांगू लागलेत. त्यामुळे डोंगरामध्ये असलेली पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणखी लोप पावली तर नवल नाही.
हवामान तज्ज्ञ सांगतात, मॉन्सूनचे दर्शन उशिराने होईल. परंतु पावसाचे प्रमाण मात्र तेवढेच असेल. याचा अर्थ असा आहे की पाऊस ठराविक चार महिनेच कोसळणार नाही, तर पहिल्या काही दिवसांतच तो एकूण सरासरी पूर्ण करणार आहे.
म्हणजे वादळी वारे आणि अतिवृष्टीचा धोका आहे. १४० इंच पाऊस अवघ्या काही दिवसांत दणादण कोसळणार आहे. पणजी बुडणारच आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. रस्ते खचू शकतात. अरबी समुद्राचे पाणी जमिनीवर घुसण्याचा धोका आहे आणि सत्तरी? याचा अर्थ संपूर्ण गोव्याला यंदा महापुराचा धोका आहे. अरबी समुद्राने आपल्याला चारी बाजूला ओढल्याने संकटाची तीव्रता आणखीनच वाढलीय.
पाऊस का पडतो? त्याचे प्रमाण निश्चित कसे होते?
हवामान तज्ज्ञ पावसाचे गणित आता महासागराच्या तापमानावरून निश्चित करू लागलेत. तेथे निर्माण होणारे जॅट स्ट्रीम्स म्हणजेच वाऱ्याचे विलक्षण वेगाचे प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहू लागतात. जॅट प्रवाह हे अति वेगवान असून, ते आडवे-तिडवे वाहू शकतात. मध्येच एकत्र येतात किंवा वेगवेगळ्या दिशेने फिरू शकतात. मग वादळे का निर्माण होतात? पावसाळा का लांबतो?
समुद्र सपाटीवर तयार होणाऱ्या वादळांमुळे पृष्ठभागाचे तापमान वाढते व भूभाग आणि सागराच्या तापमानातील फरक कमी होतो. जमीन व समुद्राचा पृष्ठभाग दाब वारे व जॅट स्ट्रीम्स तसेच पश्चिमेकडील समुद्री चक्रीवादळ यामुळे पावसावर परिणाम होतो.
यंदा पाऊस लांबण्याचे मुख्य कारण बिपॉरजॉय गोव्याला टाळून ते सध्या गुजरातचे सौराष्ट्र, कच्छमध्ये धुमाकूळ घालतेय. पण त्यामुळे गोव्यातला पाऊस लांबलाय त्यात तथ्य आहे. बिपॉरजॉय हा बंगाली शब्द, बांगलादेशात त्याचा अर्थ आहे ः संकट, संहार! आळीपाळीने वादळाचे नामकरण करण्याची संधी देशांना मिळते, त्यातून हे बंगाली नाव.
वादळाची चाहूल लागल्याबरोबरच त्याचे बारसे केले जाते. ते वाढू अथवा तेथेच त्याचा शेवट होवो, जन्मभर त्याला ते नाव चिकटते. हिंदी महासागरातील देशातील समुद्रीवादळांना या उपखंडातील देशांना नावे देण्याची संधी मिळत असते. ही पद्धत २००० सालापासून सुरू झाली आहे.
आश्चर्याचा भाग असा की अरबी समुद्रात वादळे निर्माण होण्याचा हा प्रकार तसा खूप अलीकडचा. यापूर्वी ही बदनामीकारक उपाधी भारताच्या उत्तरेकडच्या महासागरांना लाभली होती.
परंतु गेल्या २० वर्षांत ही वादळे अरबी समुद्राकडे सरकली असून, त्याचे प्रमुख कारण हे तापमान वाढ हेच आहे. २०५० पर्यंत या वादळांचे स्वरूप आणखी तीव्र रुद्रावतार धारण करतील, असे अनुमान व्यक्त झाले आहे.
गेल्या ५० वर्षांत जागतिक महासागराचे तापमान ९० टक्क्यांनी वाढण्याचे कारण, उष्णतेत झालेली भयावह वाढ हेच आहे आणि हा सर्व उद्रेक मानवाने स्वतःच्या हाताने घडवून आणलेला आहे. माणूस पर्यावरणाच्या विध्वंसात घालत असलेली भर विशेषतः मानवाने आपल्या सुखासाठी उष्णतेत टाकलेली भर, हा महासागर शोषून घेत आला आहे.
त्यामुळेच समुद्रपातळी वाढ, हिमपर्वतांचे वितळणे, समुद्र वादळे अशा आपत्तींमध्ये भर पडली असून, अरबी समुद्रही आता पूर्वीसारखा शांत राहिलेला नाही. या एकेकाळी ‘प्रशांत’ मानल्या गेलेल्या महासागराचे तापमान अक्षरशः दुप्पट वाढले असल्याचा अनुमान शास्त्रज्ञांनी काढला आहे.
गेल्या २० वर्षांत अरबी समुद्रातील वादळांचे प्रमाण ५२ टक्क्यांनी वाढले असून, या वादळांचा वेग ११८ ते १४५ किलो मीटर प्रति तास असा आहे. त्यामुळे वादळाची तीव्रता आणि मानवी जीवनाचा घास घेण्याची क्षमता आपल्या लक्षात येऊ शकेल.
विध्वंसक वादळे कशी आकार घेतात, या वादळांमुळे पर्जन्यवृष्टीचा वेग कमी-अधिक होत जाणे व वातावरण बदलाच्या परिणामातून पावसाचे एकदम कोसळणे, हे टप्पे आता शास्त्रज्ञांच्याही लक्षात आले आहेत. त्यामुळे भारतीय संशोधक आता अरबी समुद्राच्या विविध पैलूंचा नेमकेपणाने वेध घेण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.
अरबी समुद्राच्या काठाने वसलेली राज्ये अजूनही या संकटाबद्दल अनभिज्ञ आहेत. आपल्या अर्थव्यवस्थेचा आढावा घेताना किंवा पर्यटनविषयक योजना आखताना कधीही आपल्या नियोजनकर्त्यांनी वातावरण बदलाचा उल्लेख केलाय, असे घडलेले नाही.
वातावरण बदलामुळे गोवा तसेच आसपासच्या परिसरांना तीव्र संकटांचा सामना सतत करावा लागणार आहे. त्यामुळे आपली सरकारेच नव्हे तर पर्यटनउद्योग, गोव्यातील विद्यापीठ व एनआयओसारख्या संस्था व पर्यावरणवादी यांना आता अधिक सजग बनावे लागेल.
शास्रज्ञांनी अनेकदा स्पष्टपणे नोंदविले आहे, ‘वादळे व विलक्षण वेगाने वाहणारे वारे, यामुळे अतिवृष्टी होईलच. शिवाय महापूर निर्माण होईल. समुद्राचे पाणी उसळेल व ते भूभागाचा घास घेऊ शकेल. त्यामुळे आपल्याला तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
सर्वात आधी आपण धोक्याचा अंदाज घेणारे नकाशे तयार केले पाहिजेत. वादळ कोठे धक्का देऊ शकते आणि समुद्र पातळी कोणत्या बाजूला वाढू शकते, याचा आपण तातडीने अंदाज घेऊन काही उपाय विलक्षण वेगाने घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.’
संकट आपल्याकडे चौहूबाजूने घोंगावण्याचे कारण, आपली धोकादायक पर्यावरणनीती हेच आहे. आधीच खाण व्यवसायामुळे आपण जंगलतोड केली आहे. आता स्थानिक माणूस अति हव्यासामुळे सत्तरीच्या डोंगरावर अतिक्रमण करू लागला आहे.
गेल्या पाच वर्षांत सत्तरीतील अनेक वाघांना मारून टाकण्याचा प्रकार घडला. त्याचवेळी सरकारने सावध होऊन या प्रश्नाच्या खोलात जाण्याची आवश्यकता निर्माण झाली होती, तसे घडले नाही. उलट स्थानिक नेतृत्वाने एकगठ्ठा मतासाठी स्थानिकांचीच बाजू उचलून धरली.
वनाधिकाऱ्यांना प्रवेशबंदी असे फलक अजूनही सत्तरीच्या जंगलात लागलेले आहेत. स्थानिक समाजाने जंगलामध्ये केलेली घुसखोरी हा सतत चिंतेचा विषय मानला गेला पाहिजे. सत्तरीचा प्रश्न विचारात घेतला जातो, तेव्हा नेहमीच वाघ की माणूस? हा प्रश्न पुढे येतो.
वास्तविक वाघ हवा आणि माणूसही, हे तत्त्व सरकारच्या डोक्यात अद्यापि शिरलेले नाही. माणसाने जंगलावर कुरघोडी केली, त्यामुळेच तेथील वाघ संकटात सापडले.
सत्तरीचे एक राखणदार राजेंद्र केरकर यांनीच दाखवून दिले आहे की, १९९९ पासून सत्तरीतील अभयारण्य क्षेत्रात स्थानिकांनी जंगलतोड करून बागायतींची लागवड सुरू केली. स्थानिक नेतृत्वाच्या दबावामुळे वनखात्याचे हात बांधले गेले. त्याचाच फायदा घेऊन गेल्या दहा वर्षांत तेथे जंगलावर थेट अतिक्रमणे करण्यात आली आहेत.
काही महिन्यांपूर्वी तर स्थानिकांचे धाडस एवढे वाढले की त्यांनी जंगलांना आगी लावून दिल्या. तरीही अद्यापि कोणाविरुद्ध कारवाई झलेली नाही. वास्तविक हा प्रश्न स्थानिकांच्या रोजीरोटी एवढा मर्यादित नाही. त्यात अतिहव्यास आहे आणि बकासुरी प्रवृत्तीमुळेच स्थानिक लोक जंगलांचे शोषण करू लागले आहेत.
म्हादई अभयारण्यात लागलेल्या आगीतूनच प्रेरणा घेऊन नेत्रावळी, खोतिगाव, महावीर अभयारण्य आणि मोले राष्ट्रीय उद्यानातील आगींच्या प्रकारांत वाढ झाली. वास्तविक या लोकांनी संपूर्ण सत्तरी तालुक्यालाच महापुराच्या काठावर आणून उभे केले आहे.
हे लोक अतिहव्यासामुळे केवळ स्वतःचाच स्वार्थ साधत नाहीत, तर सत्तरीच्या विनाशाचे कारस्थान त्यातून रचले जात आहे. एका बाजूला झाडे कापल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची जंगलाची नैसर्गिक क्षमता नष्ट झाली. तर दुसऱ्या बाजूला तापमानवृद्धी त्यांनी अधिक गहिरे केले आहे.
पुन्हा तापमानवाढीमुळे आपल्या भागातील उष्णतावाढ तीव्र होणार आहे. महासागरातील उष्णतेत आम्ही भर घालणार आहोत, शिवाय संपूर्ण किनारपट्टी सागराने गिळून टाकण्याचे संकट आणखी भीषण बनविणार आहोत. त्यामुळे सत्तरीतील जंगलतोड विशेषतः एकूणच अभयारण्यातील वृक्षसंहार हा आपल्या सर्वांसाठीच चिंतेचा विषय बनला पाहिजे.
दुसऱ्या बाजूला किनारपट्टीवरील बांधकामे, पर्यटनासाठी उभी केली जाणारी शॅक्स आणि उपहारगृहे, पंचतारांकीत हॉटेलनी गिळंकृत केलेली किनारपट्टी, याकडे आपण कितीकाळ दुर्लक्ष करणार आहोत? गोव्याने किनारपट्टी पर्यावरण मूल्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे.
त्यामुळे आपला किनारपट्टी संरक्षण नकाशाच तयार झालेला नाही. गेल्या ५० वर्षांत ज्याप्रकारे आपल्या राज्यकर्त्यांनी संपूर्ण पश्चिम किनारपट्टी ओरबाडू दिली, स्वतःच्या स्वार्थाखातर या भूभागाचा लचका तोडू दिला, तो संपूर्ण गोव्याला संकटात लोटण्यास पुरेसा आहे.
आपल्या पर्यटन मंत्र्यांनीच कबूल केल्याप्रमाणे गोव्यातील ९० टक्के शॅक्स बाहेरच्यांना चालविण्यास देण्यात आलेले आहेत. ही खानपान गृहे ही स्थानिक पाककलेचा आस्वाद स्वस्तात पर्यटकांना घेता यावा, यासाठी उदारपणे तयार केलेल्या धोरणात सामावून घेतली होती.
परंतु स्थानिक नेते व हितसंबंधी प्रवृत्तीने शॅक धोरणाचा कायम दुरुपयोग केला. हॉटेल संघटनेच्या दाव्यानुसार शॅक चालविणाऱ्या प्रवृत्ती आता गरीब आणि बेरोजगार राहिलेले नाहीत. उंची महागड्या गाड्या उडवताना सरकारी योजनेचाच त्यांनी विचका केला.
शिवाय पर्यटनाला काळीमा लावणारी सर्व कृत्ये त्यांनी चालविली. राज्यातील शॅक्स ही सध्या धोकादायक ठिकाणे बनली आहेत, दुसऱ्या बाजूला त्यांनी पर्यावरणाचा विध्वंस केला. कासव पैदास केंद्रांवर केलेले आक्रमण अनेकदा चर्चेला येते, त्याशिवाय त्यांनी किनाऱ्यावर कचरा आणून टाकला.
किनारे हे मल आणि सांडपाण्याचे आगर बनले आहेत. या किनाऱ्यांवरील वाळूची बने व त्यावरील वनस्पती ज्यांना आपल्या शास्रज्ञांनी किनारपट्टीच्या संरक्षणाच्या ढाली मानले, त्या कधीच उद्ध्वस्त झाल्या आहेत. बार्जेस आणि मोडक्या जहाजांचे अवशेष यामुळेही किनारेही उद्ध्वस्त झाले आहेत.
स्थानिक हितसंबंधी प्रवृत्ती आणि धनाढ्य गट यांचे कान उपटण्याचे धारिष्ट्य सरकारमध्ये नाही. या कृत्यात गुंतलेले अनेक नेते विधानसभेत पोहचून सरकारी धोरणे ठरवित असतात. त्यामुळेही अशा पर्यावरण विनाशक बाबींकडे कठोर दृष्टीने पाहण्याचे राज्यकर्त्यांनी कधीच सोडून दिले आहे.
या प्रवृत्तीमुळे अरबी समुद्राचे तापमान वाढले, पातळी वाढू लागली, त्यामुळे वादळ-वाऱ्याच्या मालिका सुरू झाल्या आणि आपला चिमुकला गोवा धोक्यात आला आहे. बिपॉरजॉयने आज गोव्याला वाचविले.
बंगाली आणि कोकणीचा संबंध असल्याचा अर्थही काहीजण काढतील, परंतु आपण केवळ नशिबाने वाचलो आहोत. कच्छच्या किनाऱ्याला वादळाने धडक दिल्यावर तेथे निर्माण झालेला उत्पात ज्यांनी व्हिडिओद्वारे पाहिलेला असेल, त्यांच्या अंगावर काटा उभा राहील.
पोटात भीतीचा गोळा निर्माण करणारे हे वादळ मागेपुढे गोव्याला धडक देणार नाही, असे कोणी शास्त्रज्ञही सांगू शकणार नाही. किंबहुना आपण धोक्याच्या सीमारेषेवर हेलकावे खात उभे आहोत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.