Gomantak Editorial: उद्याचा पाऊस..!

तो येतो अगदी सहजपणे. तो बरसतो, शरीर आणि मन भिजवून टाकतो, मने उत्फुल्ल करुन सोडतो
Rain
Rain Dainik Gomantak
Published on
Updated on

Rain खरे तर पाऊस ही एक नैसर्गिक घटना. तो येतो अगदी सहजपणे. तो बरसतो, शरीर आणि मन भिजवून टाकतो, मने उत्फुल्ल करुन सोडतो, भवतालावर हिरवाई पांघरतो आणि आपली चौमाही ‘खेळी’ झाल्यानंतर परततो, तो पुढच्या वेळी परत येण्यासाठी!

हे चक्र वर्षानुवर्षे चालत आले आहे, हे खरेच आहे; परंतु त्यातले हे सहजपण अलीकडच्या काळात हरवत चालले आहे आणि ‘नभ मेघांनी आक्रमिले..’, असे म्हणण्याऐवजी ‘नभ चिंतांनी आक्रमिले...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

याचे कारण पाऊसमानावर आपल्या इतक्या गोष्टी अवलंबून आहेत की त्यातील कोणतेही बदल आपल्याला सोसत-झेपत नाहीत. त्याचे कुठे ना कुठे परिणाम भेडसावतातच. देशाच्या शेती उत्पादनापैकी 54 ते 56 टक्के उत्पादन खरीपावर अवलंबून आहे.

पावसाच्या वेळापत्रकात थोडा जरी फेरफार झाला तरी धान्याचे उत्पादन, खरेदी, वितरण, साठवणूक या सगळ्याला फटका बसतो. अन्न आणि इंधन (फूड आणि फ्युएल) या दोन गोष्टींतल्या महागाईवर नेहेमीच लक्ष ठेवावे लागते. याचे कारण त्या दोन्हींमधून दरवाढीचे दुष्टचक्र सुरू होण्याचा धोका असतो.

Rain
Touts Arrested: किनाऱ्यांवरील अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई; 21 दलाल कळंगुट पोलिसांच्या ताब्यात

त्यातील अन्नधान्य महागाईचा पावसाशी संबंध आहे. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी रेपो दराचा निर्णय जाहीर करण्याच्या निमित्ताने जे सविस्तर निवेदन केले, त्यात त्यांनी म्हटले की अर्जुन जसा फक्त माश्याचा डोळाच पाहात होता, तसे आमचे सध्या महागाईवर लक्ष आहे.

चलनवाढ आटोक्यात ठेवणे ही रिझर्व्ह बॅंकेचीही एक मुख्य जबाबदारी असते आणि तीच उद्‍गारांतून व्यक्त झाली. बरे नुसती सरासरी पूर्ण करणे एवढीच आपली पावसाकडून अपेक्षा नाही. ती अधिक काटेकोर आहे. त्याने वेळ तर पाळावीच, पण प्रमाणही सांभाळावे. म्हणजे पिके वाहून जातील, एवढे धुवाधार बरसू नये आणि पिके खुरटतील एवढे स्वतःला आक्रसून घेऊ नये.

Rain
Sudin Dhavalikar: वीजमंत्र्यांनी दिली ई-वाहन धारकांसाठी खुषखबर! राज्यात आता लवकरच होणार...

एवढेच नाही. त्याने सर्व विभागांचाही समतोल विचार करावा! म्हणजे देशाच्या काही भागांत मुसळधार आणि काही भाग ठक्क कोरडा, असे करू नये. थोडक्यात सगळीकडे त्याचे बऱ्याच अंशी समतोल वितरण व्हावे. हे समान वितरणदेखील केवळ भौगोलिक नाही, तर कालिकदेखील आहे.

म्हणजे विशिष्ट वेळी भरपूर पाऊस आणि मोसमातील काही काळ पावसाविना असेही होता कामा नये. एवढ्या सगळ्या अपेक्षांचे ओझे वाहणारा वरुणदेव यंदा नेमके कोणते रूप दाखविणारा याविषयीची उत्कंठा त्यामुळेच लागून राहिली आहे. अशा प्रकारची पूर्वी भावनिक, धार्मिक पातळीवर व्यक्त व्हायची. आताही होते.

Rain
Shripad Naik: लोकसभा निवडणुक निमित्ताने भाजपची मोर्चेबांधणी; श्रीपाद नाईक म्हणाले, काही अशक्य गोष्टी..

परंतु आता हवामानअंदाजशास्त्र बऱ्यापैकी विकसित झाले असून वेगवेगळ्या प्रारूपांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. जानेवारी-फेब्रुवारीपासूनच वैज्ञानिकांचे डोळे मान्सूनच्या आगमनाकडे आणि त्याच्या संभाव्य स्वरूपाकडे लागलेले असतात.

केवळ वैज्ञानिकांचाच नव्हे तर गोमंतकीयांनाही मिरगाच्या पावसाची ओढ लागलेली असते. यंदा अमेरिकी संस्थांनी ‘अल निना’च्या धोक्याची घंटा खूप आधीपासून वाजवायला सुरुवात केली आणि आपल्या छातीत धडकी भरवली.

भारतीय हवामान खात्याने मात्र पाऊसमान कमी असले तरी 96 टक्क्यांचा कोटा तो पूर्ण करणार, असा निर्वाळा दिला आहे. गोव्यात गेल्या वर्षी मुबलक पाऊस पडूनही दोन तीन महिन्यांआधी जलस्रोतांची पातळी खाली उतरल्याने लोक चिंताग्रस्त झाले होते.

Rain
Smart City: मोन्सेरात ऑन ग्राऊंड; कामाची केली पाहणी

केरळमध्ये साधारण तीन-चार जूनमध्ये येणारा मोसमी पाऊस यंदा थोडा उशिरा दाखल झाला आहे. गोव्यातही त्याचे आगमन उशिराच झाले आहे. पण तो आला आहे, हीच केवढी आनंदाची बाब! आरोप-प्रत्यारोप, हिंसाचार, सर्व प्रकारची गुन्हेगारी, अपघात यांसारख्या मनःस्थिती झाकोळून टाकणाऱ्या बातम्यांच्या गर्दीत मॉन्सूनच्या आगमनाची वर्दी ही सुखद झुळूक आहे!

‘बिपरजॉय’ नावाच्या चक्रीवादळाने हे आगमन लांबले असे सांगण्यात आले. हे आणखी एक संकट अलीकडच्या काळात त्रास देत आहे. मागील चार ते पाच वर्षांत बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील चक्रीवादळांचे प्रमाण आणि तीव्रता वाढली आहे.

वैश्विक तापमानवाढीने समुद्राचे वाढत असलेले तापमान आणि हवेतील वाढते धुलिकण ही त्याची दोन मुख्य कारणे आहेत. ही चक्रीवादळे मॉन्सूनपूर्व असोत, की मॉन्सूननंतर; पण ती शेतीचे नुकसान करतात. त्यामुळेच पावसाच्या आगमनाने मने मोहरली असली तरी त्याच्या स्थिरावण्यासाठी मनोमन प्रार्थना कराव्या लागताहेत.

काल पाऊस गोव्यात आपल्या आगमनाची वर्दी देऊन गेला आहे. प्रत्यक्षात पाऊस सुरू झाल्यावर पणजी तुंबेल, डुंबेल की, आणखी काय होईल या चिंतेने पणजीकरांना ग्रासले आहे. या चिंतेचा दाह येत्या काही दिवसांत मोसमी पावसाच्या जलधारांनी शांत व्हावा, पणजी तुंबू नये व सर्वांचे आरोग्य ठीक राहावे, अशी प्रत्येकाची इच्छा असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com