पावसाची रीघ गेली आणि हळूवार गुलाबी थंडीची चाहूल लागली. अशाच गोड वातावरणाच्या सानिध्यात दिवाळी सणाच्या आनंदाची उधळण झाली. सर्व जुन्या वस्तू जशा नव्याने चकाकायला लागल्या, तसेच जुन्या, दुःखी आठवणी सुखाने नव्याने बहरल्या. दिव्यांचा तो उत्सव, आकाशातील फटाक्यांचा तो इंद्रधनुष्य, आकाशातील तो टिमटिम करणारा कंदील, फुलांची ती सुरेख रांगोळी आणि फराळाची ती रांग अशा सर्व तयारीत एकत्र येऊन साजरा होणारा हा आपल्या भारतीयांचा सर्वात आवडता सण दिवाळी.
‘दीप+आवळी’ शब्दांना जोडून दीपावली शब्द आला. दीपावली म्हणजे दिव्यांची रांग, फुलांच्या माळांनी बनवलेली ओळ असा याचा अर्थ आहे. दिवाळी सण दीपोत्सव म्हणून साजरा केला जातो. सर्वत्र दिव्यांची रोषणाई करून मोठ्या आनंदाने, उल्हासाने हा सण सर्वत्र साजरा केला जातो. चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले होते. त्यावेळी प्रजेने जागोजागी दिवे लावून दीपोत्सव साजरा करून त्यांचे आनंदाने स्वागत केले होते. तेव्हापासून हा दीपावली उत्सव साजरा केला जातो.
अश्र्विन महिन्याच्या त्रयोदशीला आलेली धनत्रयोदशी, अश्विन वद्य चतुर्दशीला आलेली नरकचतुर्दशी, अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे चार दिवस दिवाळी साजरी करण्यात येते. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवससुद्धा दिवाळीला जोडूनच येतात. म्हणून यांचाही समावेश दिवाळीत केला जातो. आपल्या घरी सदैव लक्ष्मीचा वास, ज्ञानाचा प्रकाश असावा म्हणून हा सण सर्वांनी आनंदाने आणि शास्त्रोक्त पद्धतीने साजरा करायला हवा. आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून परंपरेनुसार हा सण पिढ्यानपिढ्या असाच उल्हासाने साजरा करायला हवा.
अश्विन वद्य द्वादशीला ‘वसुबारस’ सण साजरा केला जातो. या दिवशी अंगणातील गायींना देव मानून त्यांची पूजा करून एकप्रकारे बारसे केले जाते. यासाठी या दिवसाला वसुबारस म्हणतात. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी मान्यता आहे. या धेनूला उद्देशून हा व्रत साजरा होतो. या दिवशी गायींना स्वच्छ करून, त्यांना सजवून त्यांची पूजा करून नैवेद्य दाखवला जातो. याच दिवशी गुरू द्वादशीच्या निमित्ताने शिष्य-गुरू ह्यांचेसुद्धा पूजन केले जाते.
अश्विन वद्य त्रयोदशीला ‘धनत्रयोदशी’ सण साजरा केला जातो. या दिवशी नवीन अलंकार, एखादी नवीन वस्तू विकत घेण्याची प्रथा आहे. या दिवशी धणे आणि झाडणी घेऊन त्यांचीसुद्धा पूजा केली जाते. धनत्रयोदशी म्हणजे देवतांचा वैद्य. ‘धन्वंतरी देवता’ ह्यांची जयंती. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात आणि कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे आणि साखर प्रसाद म्हणून देतात. या दिवशी यमदीप दानाला विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशी या दिवशी यम धर्माच्या उद्देशाने कणकेच्या तेलाचा दिवा करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावला जातो.
भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा नरकचतुर्दशीच्या दिवशी वध केला. या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी वस्त्रांचे दानसुद्धा दिले जाते. या दिवसाला ‘नरकचतुर्दशी’ म्हणतात. आश्विन महिन्यात आलेल्या अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री विष्णूने सर्व देवतांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले अशी कथा आहे.
प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा करून श्रीविष्णू आणि लक्ष्मीमातेचे पूजन करण्यात येते. संध्याकाळी सर्वत्र दिव्यांची आरास मांडली जाते. रांगोळ्यांनी संपूर्ण अंगण सुशोभित करून, गोडाच्या नेवैद्यासोबतच लाह्या-बत्तासे यांचाही प्रसाद असतो. दिवाळी पाडवा म्हणजेच कार्तिक शुद्ध प्रतिपदा ही तिथी श्रीविष्णूने बळीराजाच्या नावाने केली. म्हणून या तिथीला ‘बलिप्रतिपदा’ म्हटले जाते. दानाचे महत्त्व या दिवशी फार असते. दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त आहे. याच दिवशी स्त्रिया पतीला ओवाळतात. या दिवशी गोवर्धन पूजासुद्धा केली जाते. नवीन वस्त्रालंकार घालून, वेगवेगळ्या पक्वानांचे भोजन करून आनंद साजरा केला जातो.
कार्तिक शुद्ध द्वितीया हा दिवस म्हणजे भाऊबीज. या दिवशी यम आपल्या बहिणीकडे म्हणजे यमुनेकडे जेवायला गेला होता. म्हणून या दिवसाला ‘यम द्वितीया’ म्हटले जाते. याच दिवशी बहीण भावाला ओवाळते. त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. जर एखाद्या स्त्रीला भाऊ नसला तर ती चंद्राला भाऊ मानून त्याला ओवळते. असा हा सण साजरा केला जातो. हा दिव्यांचा, प्रेमाचा आणि आपुलकीचा सण प्रत्येक हृदयात ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित करण्यासाठी घरोघरी जीवन आणि प्रत्येक चेहऱ्यावर हास्य फुलणाऱ्यांसाठी साजरा होतो. आपल्या जीवनातील प्रत्येक दीपक आपल्यातील सद्गुणांचा प्रतीक आहे. धैर्य, प्रेम, शक्ती, उदारता आणि लोकांना संघटित करण्याची क्षमता या सद्गुणांना प्रज्वलित करून जागृत करणे म्हणजे खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करणे. असाच तेजोमय, उत्साह आपल्या जीवनात यावा म्हणून दिवाळीनिमित्त एकत्र येऊन आनंदाची उधळण करूया आणि दिवाळी साजरी करूया.
अश्र्विन महिन्याच्या त्रयोदशीला आलेली धनत्रयोदशी, अश्विन वद्य चतुर्दशीला आलेली नरकचतुर्दशी, अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे चार दिवस दिवाळी साजरी करण्यात येते. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवससुद्धा दिवाळीला जोडूनच येतात. म्हणून यांचाही समावेश दिवाळीत केला जातो. आपल्या घरी सदैव लक्ष्मीचा वास, ज्ञानाचा प्रकाश असावा म्हणून हा सण सर्वांनी आनंदाने आणि शास्त्रोक्त पद्धतीने साजरा करायला हवा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.