गोमन्तक डिजिटल टीम
दिवाळी सण आता जवळ येऊ लागला आहे. राज्यभर तयारीची लगबग सुरू झाली आहे. महिला वर्ग फराळ बनविण्यात, युवा वर्ग नरकासुरांच्या प्रतिमा बनविण्यात व्यस्त आहे.
बाजारपेठा आता दिवाळीच्या साहित्याने सजू लागल्या आहेत. खरेदीला अजून गर्दी होत नसली तरी सणाची लगबग सुरू झाली अाहे.
वसुबारस पूजा आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस केली जाते. वसुबारस याचा अर्थ- वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवशी सायंकाळी गाईची पाडसासह पूजा करतात.
आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करुन दिव्यास नमस्कार करतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे.
कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. या दिवशी यमासाठी नरकात, म्हणजे घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे.
आश्विन अमावास्येस प्रदोषकाळी (सायंकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते.
कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा म्हणून ओळखतात. या दिवशी बळी राजाच्या रांगोळीची पूजा करतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. शेतकऱ्यांसाठी हा दिवस महत्त्वाचा असतो.
कार्तिक शुद्ध द्वितीयेस यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे नाव मिळाले, असे मानले जाते. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते.