My Earth My Responsibility : माझी पृथ्वी माझी जबाबदारी!

My Earth My Responsibility : पृथ्वीवरील नैसर्गिक स्रोतांचे मानवजातीसाठी असलेले मूल्य ओळखून त्यांचा बाजार मांडणे बंद केले पाहिजे. त्यांचे शोषण करण्याऐवजी त्यांचा हिशेब ठेवला पाहिजे. त्यासाठी, ‘माझी पृथ्वी माझी जबाबदारी’ हे प्रत्येकाचे ब्रीदवाक्य व्हावे!
My Earth My Responsibility!
My Earth My Responsibility!Dainik Gomantak
Published on
Updated on

डॉ . मनोज सुमती बोरकर

शाश्वत पर्यावरण आणि ते टिकवून ठेवण्याची जबाबदारी या विषयावर गेल्या काही काळापासून चर्चा होत आहे.

रॅचेल कार्सनचे पुस्तक ’सायलेंट स्प्रिंग’ (१९६२) आणि अमेरिकेचे माजी उपराष्ट्रपती अल गोर यांचा माहितीपट ’एन इनकन्वेनियंट ट्रुथ (२००६) याबाबत डोळ्यात अंजन घालतात.

पण, तरीही आज पृथ्वीवर वर्चस्व गाजवणारी सर्वांत बुद्धिमान(?) प्रजाती म्हणून स्वत:स मिरवणारा माणूस, सोयी व सुविधा यांच्या कोषात गुरफटलेला आहे. या ग्रहाच्या र्‍हासासाठी आपणच जबाबदार आहोत, आपण पृथ्वीचे केलेले प्रचंड नुकसान आपणच भरून काढले पाहिजे याकडे उद्दामपणे दुर्लक्ष करत सुखेनैव जगत आहे.

या ग्रहाचे नेतृत्व करण्याच्या वल्गना करणार्‍यांनी निसर्ग संपदेला पिळून काढत बक्कळ संपत्ती गोळा केली, पण ही वसुंधरा टिकवून ठेवण्यासाठी काहीही केले नाही.

हवामान उत्तरोत्तर अनियमित आणि प्रतिकूल होत आहे, या वसुंधरेचा वनराईने विनटलेला हिरवा पदर शहरांच्या अनियंत्रित काँक्रीटिकीकरणाने राखाडी होत चालला आहे, निळेशार सागरी पाणी सांडपाण्याने काळवंडू लागले आहे, आकाश विषारी वायूंच्या मिश्रणाने धुसर होत आहे, आमच्या ग्रामीण भागांची शांतता गोंगाटाने भंग पावत आहे आणि पृथ्वीवरील विविध सजीव प्रजाति झपाट्याने लुप्त होत आहेत.

वरील वर्णन कपोलकल्पित नाही. खरे सांगायचे तर, या आपत्तीजनक परिस्थितीचे स्पष्ट व पुरेसे पुरावे आहेत. म्हणूनच आपण, ‘भिवपाची गरज ना!’ या राजकीय दिलाशातून बाहेर पडत डोळे उघडे ठेवून सभोवताली पाहण्याची गरज आहे.

स्वत:च्या परीटघडीच्या आयुष्याची घडी मोडत आणि ‘सर्व काही आलबेल आहे’, या भ्रमातून बाहेर पडत वास्तव पांघरण्याची गरज आहे. त्याहीपुढे जाऊन या मानवनिर्मित सर्वनाशाचा विचार करण्याची आवश्यकता आहे.

त्यासाठी घोषणा, घोषवाक्ये, मुक्ताफळे यांची आकर्षक उधळण काहीच कामाची नाही. प्रामाणिक हेतू धरून योग्य दिशेने सतत मार्गक्रमण झाले पाहिजे. पण, असे प्रत्यक्ष धरातलावर काम करण्याऐवजी आपण कृती-आराखड्यांचे कागदी घोडे नाचवतो.

पर्यावरण रक्षणाच्या जागतिक परिषदांसाठी निधी अनाठायी खर्च करतो. ‘तुमची हिंमत कशी झाली?’, असली टाळ्या घेणारी वाक्ये उच्चारणारे पर्यावरण सेलेब्रिटी किंवा राजकारणी यांच्या वाक्चातुर्याचे कौतुक करण्यात धन्यता मानतो.

महत्त्वाच्या विषयांना बगल देत प्रगत लोकशाहीचे अध्वर्यू व विश्वगुरू फोटोसेशन करण्यात चमकतात. अशा आंतरराष्ट्रीय उधळपट्टीतून पर्यावरणाचे काहीच भले होत नाही.

पर्यावरणावर ओढवलेले संकट मानवतेवरचेही संकट असतानासुद्धा जगभरातले राजकारणी आणि विचारवंत तोंडाच्या वाफा दवडत आहेत, ही खेदजनक बाब आहे. प्रदेश, लोक, संस्कृती, राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था यात वैविध्य असले तरीही सकल मानवजातीकडे फक्त एकच पृथ्वी आहे, जी समानता आणि शाश्वतता या तत्त्वांवर सामायिक केली पाहिजे.

त्यासाठी राष्ट्रीय आणि जागतिक नेतृत्वाने बोलण्यापेक्षा जास्त कृती केली पाहिजे. जागतिक राजकीय व्यवस्था आणि आकांक्षा वेगवेगळ्या आहेत, हे मान्य असले तरीही कोणतीही राजकीय सीमा नसलेल्या पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्र कृती करायला हवी!

भारतात असलेले पर्यावरणाचे वैविध्य, वेगवेगळे हवामान, जैवविदिधता, अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबतच निसर्गपूजेचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणारी युवापिढी, या सर्व अनुकूल गोष्टींमुळे भारत निसर्गसंवर्धनात जगाचे समर्थ नेतृत्व करू शकतो.

जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत सर्वोच्च स्थान मिळवून ‘सुपर पॉवर’ होणे हे भारताचे ध्येय असू शकत नाही. संपूर्ण मानवजातीचे कल्याण करणारी, ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणत वसुंधरेचे निसर्गस्रोत जपणार्‍या कुटुंबाचे कर्ता होणे, हे आपले ध्येय असायला हवे.

My Earth My Responsibility!
Goa Medical College: GMC चे घुमजाव? म्हणे 'ती' नोट सर्वांसाठी नव्हे अंतर्गत, काँग्रेसने मोदींना केले ट्विट

अर्थात, कर्तेपण घेण्याची क्षमता भारताकडे असली तरी प्रत्येक देशातील सरकारने त्यांचे परराष्ट्र धोरण आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांच्या कार्यपद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. सर्व देशांना राष्ट्रीय हित आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या त्यांच्या पारंपारिक आकलनाचे पुनरावलोकन करावे लागेल.

त्यांच्या सार्वभौमत्वाचे आणि पृथ्वीच्या नैसर्गिक भांडवली मालमत्तेचा एक भाग म्हणून त्यांच्या राष्ट्रीय संपत्तीसाठी मूल्यांकनाचे एक नवीन परिमाण विकसित करावे लागेल. आपले संरक्षण करण्याचा, आपली लष्करी, राजकीय, आर्थिक किंवा तांत्रिक शक्ती गुंतवण्याचा आणि बळकट करण्याचा कुठल्याही देशाचा अधिकार व हक्क याला पर्यावरण रक्षणाचे वास्तव स्वीकारल्याने बाधा पोहोचत नाही. राष्ट्रीय हितासोबतच पर्यावरणाचे अखंडत्व जतन करण्याचे आंतराष्ट्रीय हितही जपले गेले पाहिजे.

भारताच्या बाबतीत, अस्थिर भौगोलिक-राजकीय क्षेत्रात आम्ही आमच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्याच्या पाकीस्तान, चीन या शेजारी देशांच्या प्रयत्नांचा ठामपणे प्रतिकार केला आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित या बाबीला सर्वोच्च प्राधान्यही दिले पाहिजे. परंतु, घटते नैसर्गिक संतुलन आणि वाढणारी लोकसंख्या पाहता आपल्या देशाच्या पर्यावरणीय सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरजही तितकीच महत्त्वाची आहे.

सध्याच्या काळातील परराष्ट्र धोरण हे केवळ राजकीय संबंधांपुरते मर्यादित ठेवणे पुरेसे नाही; ते सजीव सृष्टीच्या भवितव्याबद्दलही चिंतित असावे लागेल! परराष्ट्र धोरण ही केवळ आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीची बाब नाही.

ती मानवजातीसह अखिल सृष्टी जपण्याची धारणा झाली पाहिजे. हवामान आणि ऊर्जेवर लक्ष केंद्रित करणार्‍या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अमेरिकन तज्ज्ञ जेसिका मॅथ्यूज म्हणतात, ‘पृथ्वीला दीर्घकाल राहण्यायोग्य राखण्याचा विचार न करणारी सुरक्षेची कोणतीही व्याख्या स्वाभाविकपणे संशयास्पद आहे’.

प्रामाणिकपणे, आम्हाला आमचे नुकसान होण्यासाठी परग्रहावरील कुणीतरी आक्रमण करण्याची आवश्यकता नाही. ते काम येथे राहणार्‍यांनी आधीच केले आहे.

पर्यावरणीय कारभाराची नवीन नैतिकता अंगीकारण्यासाठी पर्यावरण संरक्षणाचा दृढ संकल्प घेऊन सर्व राष्ट्रांच्या अधिकार्‍यांचा समावेश असलेल्या ‘प्लॅनेटरी पॉलिटिक्स’ची आम्हांला नितांत आवश्यकता आहे.

सरकार, व्यवसाय आणि समुदायांनी पृथ्वीवरील नैसर्गिक स्रोतांचे मानवजातीसाठी असलेले मूल्य ओळखून त्यांचा बाजार मांडणे बंद केले पाहिजे. त्यांचे शोषण करण्याऐवजी त्यांचा हिशेब ठेवला पाहिजे. त्यासाठी, ‘माझी पृथ्वी माझी जबाबदारी’ हे प्रत्येकाचे ब्रीदवाक्य व्हावे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com