बनाव

भारतासारख्या राज्यात केवळ बनाव करून निवडणुका जिंकता येत नाहीत. भाजपने हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी अाटोकाट प्रयत्न केले होते. परंतु ही संकल्पना भारतीय तत्त्वाच्या विरोधात होती, जी अल्पसंख्याकांना पसंत पडणे शक्य नव्हती, ती हिंदूंच्याही पचनी पडली नाही. हा सारा बनाव घरंगळत जाणारी अर्थव्यवस्था, महागाई, बेरोजगारी या प्रश्‍नांपासून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठीच निर्माण केला होता. परंतु तो नॅरेटिव्ह भारतीयांनी झुगारला, हाच या निवडणुकीचा निष्कर्ष आहे.
goa
goaDainik Gomantak

राजू नायक

लोकसभा निवडणुकीतील निकालाने अनेकांना उघडे पाडले. विशेषतः सत्ताधारी पक्षातील संघटनात्मक मोर्चेबांधणी. त्यांनी एक जबरदस्त नॅरेटिव्ह सेट केला होता. भाजपला हरविणे शक्यच नाही.

आम्ही हरणारच नाही, चारशे पार जाऊदेशभरातील वृत्तसंस्था, मीडियाने या त्यांच्या मांडणीवर शिक्कामोर्तब केले. देशातील मुख्य धारेतील इंग्रजी व हिंदी वृत्तवाहिन्यांनी जे एक्झिट पोल दिले, त्यात त्यांनी भाजपलाच ३७२ जागा म्हणजे- निर्विवाद बहुमत व एनडीएला मिळून आणखी ३०-४० जागा एवढे ४०० पार जाणारे मताधिक्य बहाल केले.

त्यानंतर इंडिया टुडे-एक्सिस पोलचे भीषण वास्तव सामोर आले. दूरचित्रवाहिनीवर या निवडणूक विश्‍लेषकांचे गुरू प्रदीप गुप्ता धाय मोकलून रडताना सर्वांनी पाहिले. त्यांच्याच संस्थेने तयार केलेला दुसरा; परंतु सत्यस्थितीला निकट जाणारा वस्तुनिष्ठ अहवाल कोणाच्या तरी चुकीमुळे समाजमाध्यमांवर प्रकाशित झाला. त्यामुळे एक्सिस पोल उघडा पडला.

तर मग प्रदीप गुप्तांनी बनावट अहवाल दिला होता का, या प्रश्‍नावर वेगवेगळे तर्क-वितर्क प्रसिद्ध झाले. त्यात एक तर्क होता की, भाजपच्या दडपशाहीमुळे सत्य दडपण्यात आले. प्रसारमाध्यमांनी खोटे आकडे प्रसिद्ध केले; परंतु त्यामुळे प्रतिष्ठित वृत्तसंस्था व सेफॉलॉजिस्ट यांची विश्‍वासार्हता धोक्यात आली नाही का? यात दोन मुद्दे गुंतले आहेत. या तथाकथित सेफॉलॉजिस्टना आपली कातडी वाचवायची होती. भाजपचा एवढा बोलबाला आहे. निवडणुकीपूर्वीच ते जिंकल्याचे वातावरण होते. मग आपला अंदाज चुकला तर? त्यापेक्षाही कोणतीही रिस्क नको, भाजपला दोन जागा अधिक दिल्या तर आपल्याला विचारणारा कोण आहे?

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. भाजपच्या मुस्कटदाबीचा तो परिणाम होता. देशातील अघोषित सेन्सॉरशिपमुळे लोक खरे बोलत नव्हते. त्यामुळे निवडणूकविषयक प्रश्‍नांना लोक बगल देत होते. ज्याअर्थी बहुतांश मतदार एका सुरात भाजपलाच आपण मतदान केल्याचे बिनदिक्कत सांगत होते; प्रत्यक्षात वेगळे मतदान करीत होते, त्याअर्थी त्यांना सत्य सांगायचे नव्हते. देशातील दलित आणि कमकुवत वर्ग अशा उत्तरांसाठी विख्यात आहे. ते कसे मतदान केले, याची वाच्यता करीत नाहीत. गोव्यातील वेळीप समाजाबद्दलही असाच अनुभव आलाय.

आम्ही जेव्हा केपे-बाळ्ळीमध्ये फिरायचो, तेव्हा कोण जिंकून येणार, या प्रश्‍नावर ‘कोऽऽऽण जाणा!’ असा जबाब यायचा. देशातील मतदारांची देहबोलीही सर्वेक्षण करणाऱ्यांच्या लक्षात आली नाही. याचा अर्थ मतदार कौशल्यपूर्वक खोटे बोलत होते. त्यांच्या मनात आपणावर सूड उगवला जाईल, अशी भीती होती. सरसकट असेच मत व्यक्त झाले असणार. परिणामी भाजपही खोट्या भ्रमात राहिला. हा भ्रम मतदारांच्या वर्तनाचा चुकीचा अर्थ लावल्याने आला होता. हे मतदार केवळ वार्ताहरांशी, सर्वेक्षण करणाऱ्यांशी खोटे बोलत नव्हते, तर त्यांच्या घरापर्यंत येणाऱ्या त्यांच्या परिसरात वावरणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना, पन्ना प्रमुखांनाही खोटा समज करून देत होते. त्यांनी या कार्यकर्त्यांना, नेत्यांना हुबेहूब फसविले, त्यांना उल्लू बनविले.

तोपर्यंत आपला कार्यकर्ता घरोघर पोहोचला आहे, त्याला प्रत्येक घरात किती मते आहेत, हे लोक कोण आहेत, किती सरकारी लाभार्थी आहेत, त्यातील किती मते खात्रीशीर आहेत, याचा आमच्याकडे संपूर्ण डाटा आहे. आम्ही चुकू शकत नाही, असा तोरा मिरवीत होता. भाजप संघटनेच्या भ्रमाचा फुगा असा फुटला.

रा. स्व. संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी या फुगा-बुडबुड्याचा उल्लेख केला आहे. भाजप नेते खोट्या भ्रमात राहिले. मोदींच्या लोकप्रियतेच्या व एकूणच कामगिरीमुळे देशभर खुषीचे वातावरण आहे आणि लोक आम्हांलाच मतदान करणार आहेत, या ‘आनंदोत्सवा’त सत्य स्थिती समजून घेण्यात त्यांना अपयश आले. भाजपला सत्तेचा माज आला होता, अशाच पद्धतीचे वर्णन त्यांनी केले आहे.

देशभरात पहिल्या दोन टप्प्यांत कमी मतदान झाले. तेव्हाच भाजप नेत्यांना परिस्थितीचे आकलन झाले. त्यानंतर भाजप अधिक आक्रमक झाला. पंतप्रधानांच्या सभांमध्ये अत्यंत जहाल वक्तव्ये करण्यात आली. मतदारांना प्रक्षोभित करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मतदारांना जहाल राष्ट्रवादाने बांधून घेतले की, त्यांना तत्कालीन स्थितीचा विसर पडेल, असा तो कयास होता. परंतु त्यामुळे हिंदू मतांचे ध्रुवीकरण होण्याऐवजी अल्पसंख्याकांचे संघटन अधिकच प्रबळ झाले. गोव्यासारख्या राज्यात जेथे मतदार सहज ओळखता येतो, त्यांनी दबाव झुगारून मतदान केले.

ज ओळखता येतो, त्यांनी दबाव झुगारून मतदान केले.

लक्षात घेतले पाहिजे, भाजपने या निवडणुकीत नॅरेटिव्ह अत्यंत कौशल्यपूर्वक तयार केले होते. त्यामुळे सेफॉलॉजिस्ट नव्हे, तर राजकीय पंडित व तज्ज्ञही फसले. मोदींनी आपल्या पहिल्या दोन कारकिर्दीत काही आर्थिक स्वप्ने दाखविली होती. सामाजिक, आर्थिक कायापालट करण्याचे वचन दिले होते. या तिसर्‍या निवडणुकीत तर ते ‘मोदींची गॅरंटी’ अशी हमी सतत उच्चारत होते.

त्यांनी अत्यंत कौशल्यपूर्वक सामाजिक, आर्थिक बदलांपासून पलटी मारून एकछत्री राजकीय व्यवस्थेच्या दिशेने मोर्चा वळविला होता. विरोधी पक्षांचे झालेले खच्चीकरण, मोदींच्या व्यक्तिमत्त्वाभोवती गुंफलेले प्रचाराचे सूत्र, प्रसारमाध्यमांनी दिलेली साथ. यामुळे देशात एक नवीन नॅरेटिव्ह सेट होत होता. त्यातून जे निवडणूकपूर्व सर्वेक्षण (लोकनीती व सीएसडीएस) प्रसिद्ध झाले. राम मंदिराचे निर्माण, नेतृत्वातील गुण व समान नागरी कायदा, ३७० कलम हटविले जाणे, यामुळे हिंदू ओळख अधिक दृढ होत गेली व अर्थव्यवस्था कमकुवत असतानाही त्याचा फायदा भाजपला होणार असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले. भाजपचे नेतृत्व देशातच नव्हे, तर जगामध्ये वरचढ ठरले, जगभर भारताची प्रतिमा उंचावली, असा सूर व्यक्त झाला.

भाजपविरोधातील काही मुद्दे या सर्वेक्षणात जरूर पुढे आले होते. त्यात निवडणूक आयोगाची घटलेली प्रतिमा, ईडी-सीबीआय यासारख्या संस्थांचा राजकीय वापर, काळे डाग असणार्‍यांना पक्षाचे उघडे झालेले दरवाजे, विचारधारांना तिलांजली देऊन घटक पक्षांशी केली जाणारी युती, पक्षाच्या प्रतिमेशी सोयरसुतक नसणे व त्यातून निष्ठावंतांचा होणारा भ्रमनिरास आदी मुद्दे पुढे आले होते. पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी बदनाम नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊ नये, असे मत व्यक्त केले होते. परंतु त्यांना सांगण्यात येत होते, राजकारणात सारे काही क्षम्य असते. पक्ष सत्तेवर येतो, तेव्हाच आमचा कार्यक्रम राबविता येतो. पक्षाचे नेते स्वतःचे समाधान करून घेत होते, भाजप हा कॉंग्रेसपेक्षाही सरस व कमी कलंकित आहे. नेते स्वतःची समजूत करून घेत होते की, राम मंदिराच्या उभारणीमुळे हिंदू मतदार बारीक-सारीक कुरापतींकडे लक्ष देणार नाहीत.

‘इंडिया टुडे’च्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणातही काही भीषण वास्तव सामोरे आले होते. रोजगार निर्माणात सरकारला अपयश आले आहे. २०१८-१९ मध्ये बेरोजगारीचे प्रमाण ५.८ टक्क्यांवरून २०२२-२३ मध्ये ३.२ वर आणल्याचा दावा सरकार करीत होते. परंतु वास्तव त्याहून कितीतरी वेगळे असल्याचे सर्वेक्षणात शोधून काढण्यात आले. कल्याणकारी हमी योजनाही फसली आहे व ६२ टक्के लोक दैनंदिन खर्चही भागवता येत नसल्याचे मत नोंदवित होते.

शेतकरी वर्ग अत्यंत नाखूष होता. त्यांनी सरकारवर श्रीमंत व गरिबांमधील दरी वाढवीत नेल्याचा आरोप केला. शिवाय सर्वसाधारण लोकांनाही आपली आमदनी आणखी घटेल, अशी भीती वाटत होती. लोक म्हणत होते, सरकारी प्रवृत्तीमुळे वाढत्या अर्थव्यवस्थेचा केवळ श्रीमंत उद्योजक फायदा उपटतील...

‘इंडिया टुडे’चा सर्वे तरीही म्हणत होता, एनडीएला सहज आरामशीर बहुमत प्राप्त होईल. २०१९ची संख्याही वाढण्याचा विश्‍वास ते प्रकट करीत होते.

वास्तविक भाजपने तयार केलेल्या यशाच्या नॅरेटिव्हवरच ही माध्यमे शिक्कामोर्तब करीत होती. एनडीएने आपल्या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षामधील मोहरे नेमके टिपले होते व त्यांना सत्तेतील हिस्सा दिला होता. त्यांनी विरोधकांची संभावना अतिभ्रष्ट, स्वार्थी, कुटुंबराजला प्रोत्साहन देणारे अशी केली होती. (मोहन भागवत यांनी विरोधकांच्या अशा पद्धतीच्या खच्चीकरणावरही आसूड ओढला आहे. विरोधी पक्ष हा लोकशाहीमधील एक महत्त्वाचा घटक मानला पाहिजे. त्याचाही म्हणून एक दृष्टिकोन असतो, तो समजून घेतला पाहिजे. विरोधकांना उखडून टाकण्याचीच प्रवृत्ती चुकीची आहे, असे सांगून त्यांनी आपल्या स्वत:च्या महाराष्ट्रात ज्या पद्धतीने भाजपने सत्तेवरील सरकार खिळखिळे करण्यासाठी मोडतोड केली, त्याचाही समाचार घेतला. याच प्रवृत्तीला ते मुजोर व उद्धट म्हणत असावेत.)

भाजपने तिसरी एक महत्त्वाची गोष्ट साध्य केली, ती म्हणजे स्वतःची एक विस्तृत राजकीय आघाडी निर्माण केली. विरोधकांमध्ये आणखी फूट घातली, प्रसारमाध्यमांना अंकित बनविले...

परंतु प्रश्‍न सत्ताधाऱ्यांच्या विश्‍वासार्हतेचा होता. जेव्हा लोकांना ‘इंडिया टुडे’ने प्रश्‍न केला, इंडिया आघाडी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पराभव करू शकते का, ३१ टक्के म्हणत होते होय, तर ५५ टक्के लोकांनी नकार दिला होता. आता निकालात आढळून आले आहे, ३६.६ टक्क्यांनी भाजपला मतदान केले आहे. २३५ दशलक्ष मतदार.

भारतीय प्रसारमाध्यमांची मर्यादा त्यातून उघड झाली. ही माध्यमे -विशेषतः इंग्रजी व हिंदी- सत्य दडपत होती. लोकांमध्ये जाऊन काम करीत नव्हती. त्यांनी आपले मुख्य ध्येय- लोकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शनही केले नाही. ही प्रसारमाध्यमे त्यांचा श्रोतृवर्ग २३५ दशलक्षांहून अधिक असल्याचा दावा करीत होती. त्यांनी स्वतःच्या टीआरपीचा पोहोच ४२१ दशलक्षांहून अधिक असल्याचाही दावा केला होता; परंतु या मतदारांपर्यंत प्रसारमाध्यमे पोहोचली होती का? त्यांनी प्रत्यक्ष जनजागृती निर्माण केली का? प्रसारमाध्यमांतील तज्ज्ञ सध्या या प्रश्‍नांच्या मुळाशी जाऊन अभ्यास करू लागले आहेत.

सुरुवातीचा निष्कर्ष हाच आहे, प्रसारमाध्यमांची पत घसरली. केवळ विश्‍वासार्हता नव्हे, तर निवडणूक काळात रिपब्लिकन व इतर अनेक प्रसारमाध्यमांचाही टीआरपी कमी झाला. दुसऱ्या बाजूला स्थानिक माध्यमे, समाजमाध्यमे, यूट्यूब किंवा समाजमाध्यमांवर फिरणारे छोटे व्हिडिओ लोक पाहत होते. त्यांच्या पाहणीवर्गात कित्येक लाखांची लक्षणीय वाढ झाली.

प्रसारमाध्यमे मुकी किंवा स्तुतिपाठक होण्याचे कारण म्हणजे अनेक आक्रमक समूहांवर छापे पडले. एनडीटीव्ही-बीबीसीचा छळ झाला. सरकारधार्जिण्या उद्योजकांनी माध्यमे खरेदी केली. इतर माध्यमांना जाहिराती मिळत नव्हत्या. त्यामुळे स्तुतिपाठक माध्यमांनी सत्तेवरील सरकारपेक्षा विरोधकांचीच चिरफाड सुरू केली.

‘गोमन्तक’मध्ये गेल्या आठवड्यात रत्नाकर लेले यांचा लेख आम्ही प्रसिद्ध केला आहे. लेले हे एकेकाळचे रा. स्व. संघाचे प्रमुख कार्यकर्ते. त्यांनी सध्याच्या भाजपप्रवृत्तीच्या अनेक उणिवा दाखवून दिल्या. मोहन भागवत यांनीही भाजप नेत्यांच्या डोक्यात सत्ता गेली होती, मोदींच्या करिष्म्यावर अनेकांनी आपली दुकाने चालू ठेवली. लोकांना चालले आहे ते आवडते का, हे समजून घेण्याच्या फंदात ते पडले नाहीत, असे शेरे मारले आहेत. ‘ऑर्गनायझर’ या मुखपत्रानेही भाजपच्या कथित बनावावर टीकेची झोड उडविली. एक गोष्ट खरी आहे, भाजप सद्य:स्थितीपासून अनभिज्ञ होता. जगातील सर्वांत मोठी तल्लख संघटना असा जिचा गौरवाने उल्लेख केला जात होता, ती संघटना केवळ खूषमिजाशीत जगत होती. वास्तविक लोकशाहीमध्ये या संघटनेचे काम मोठे.

goa
South Goa : ध्रुवीकरणाचा मुद्दा भाजपवर बुमरँग; दक्षिणेतील पराभव ख्रिस्ती धर्मगुरूंमुळे हे ढवळीकर, माविन यांना अमान्य

सरकारी योजना तिने लोकांपर्यंत नेणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे दुहेरी बाजूने जनमनाचा कानोसाही तिला बनावे लागते. कॉंग्रेस सत्तेवर असताना त्यांच्या पक्षसंघटना नेत्यांच्या दावणीला बांधलेल्या असत. भाजपने कॉंग्रेसमधून नेते आयात केल्यानंतर या संघटनाही त्यांच्या दावणीला बांधल्या का? असा प्रश्‍न या पाहणीतून पुढे आला आहे.

सर्वांत धोकादायक गोष्ट होती, ती प्रसारमाध्यमांच्या मुस्कटदाबीची. सरकारी यंत्रणेचा गैरवापर आणि पर्यायाने प्रसारमाध्यमांचा गळा आवळला जाणे, यांमुळे लोकांमधून जे हुंकार ऐकायला यायला हवेत, तेही बंद झालेत. मोठे राष्ट्रीय पक्ष ढेपाळले असले तरी देशातील प्रादेशिक पक्ष मात्र जनतेमधील प्रवाह ओळखत होते.

खोट्या बनावात कॉंग्रेस मात्र अडकली नाही. राहुल गांधी यांच्या दोन्ही पदयात्रांमध्ये सहभागी झालेले निवडणूक विश्‍लेषक योगेंद्र यादव लोकांचे प्रवाह नेमके काय आहेत, त्याचे अनुमान काढत होते; परंतु त्यांना कोणी गांभीर्याने घेतले नाही. दुसऱ्या बाजूला गोव्यात बदनाम होऊन माघारी गेलेले प्रशांत किशोर मात्र भाजपच्या सुरात सूर मिसळून त्यांच्या नॅरेटिव्हला पुष्टी देत होते. त्यांनी राहुल गांधींचीही थट्टा केली. परंतु राहुल गांधी या थट्टेला बधले नाहीत. ते काम करीत राहिले. भाजपने तयार केलेल्या नॅरेटिव्हला भले भले बळी पडत होते, तरीही विरोधी पक्षांची पताका उंच घेऊन हा माणूस निग्रहाने चालत राहिला. लोकशाही बलवान करण्याचे काम त्यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com