Lok Sabha Elections: लोकसभा निवडणुकांचे वारे

गोव्यात तसे दोनच मतदारसंघ असले तरी या पटलावरही घडामोडींना वेग यायला सुरुवात झाली आहे.
Lok Sabha
Lok SabhaDainik Gomantak

मिलिंद म्हाडगुत

लोकसभा निवडणुका आता एका वर्षांवर येऊन ठेपल्यामुळे गोव्यातसुद्धा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे.

गोव्यात तसे दोनच मतदारसंघ असले तरी या पटलावरही घडामोडींना वेग यायला सुरुवात झाली आहे. भाजपच्या गोटात तर इच्छुक उमेदवारांची मांदियाळीच दिसते आहे.

उत्तर गोव्यात सध्या विद्यमान खासदार व मंत्री श्रीपाद नाईक यांचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. श्रीपादभाऊ यांनाही याची जाणीव झाली असल्यामुळे ते सध्या थोडेफार आक्रमक होताना दृष्टीस पडायला लागले आहेत.

काही कार्यक्रमांना श्रीपादभाऊ यांना डावलल्यामुळे ते काहीसे संतप्त बनल्याचे बघायला मिळत आहे.

हल्लीच ‘गोमन्तक’शी बोलताना त्यांनी, ‘दुसऱ्याच्या नावाची एजंटगिरी थांबवा’, असे जे म्हटले ते याच संतापापोटी. तसे उत्तर गोव्यातही भाजपच्या उमेदवारी करता अनेक दावेदार आहेत. उत्तर गोवा सध्या भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.

याच मतदारसंघातून श्रीपादभाऊ सलग पाच वेळा निवडून आले आहेत आणि सध्या विरोधी गोटात असलेली शांतता पाहता याहीवेळी भाजप बाजी मारेल हे सांगायला तत्त्ववेत्त्याची गरज नाही. याचसाठी सध्या या उमेदवारीकरता रस्सीखेच सुरू झाली आहे.

दक्षिण गोव्यातही भाजपच्या उमेदवारीकरता स्पर्धा कमी नाही. माजी खासदार नरेंद्र सावईकरांप्रमाणेच बाबू कवळेकर, दिगंबर कामत यांची नावेही ऐकू येत आहेत.

पण सावईकरांनी जोर धरल्याचे दिसत असून ते सध्या मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत. दक्षिण गोवा सध्या कॉंग्रेसच्या अधीन असला तरी यावेळी बदल घडण्याचे संकेत मिळत आहेत.

याला अर्थातच जबाबदार आहे ते कॉंग्रेसचे विद्यमान खासदार सार्दिन. सार्दिन यांनी आपल्या मतदारसंघाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. पहिली तीन वर्षे ते मतदारसंघात फिरकलेच नाहीत. आता निवडणूक जवळ आल्यामुळे ते थोडे सक्रिय झाल्यासारखे बघायला मिळताहेत.

Lok Sabha
Goa Beach: गैरकृत्यांपासून किनारे मुक्त होतील?

पण हे म्हणजे, ‘जो बुंद से गई वो हौदसे नही आती’ अशातला प्रकार ठरू शकतो. सार्दिन यांना यावेळी उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असली तरी त्यांच्या कर्माची फळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्याला मिळू शकतात, असेच चित्र दिसते आहे.

कॉंग्रेसबरोबर आम आदमी पक्षही रिंगणात उतरण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. सध्या आम आदमी पक्ष महत्त्वाकांक्षी बनला असून जिकडे तिकडे आपले पाय पसरण्याच्या तयारीला लागला आहे.

पण आम आदमी पक्ष रिंगणात उतरल्यास कॉंग्रेसची परिस्थिती अधिकच बिकट होईल यात शंकाच नाही. त्यामुळे दोन्हीही मतदारसंघात भाजपचे ‘बल्ले बल्ले’ होण्याचीच शक्यता अधिक वाटते.

Lok Sabha
Goa Crime News : झारखंडमधून कस्टमरला ड्रग्स द्यायला गोव्यात आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला...

त्या दृष्टीने भाजपचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. ते कोणतीच कसूर बाकी ठेवताना दिसत नाहीत. दूध गरम लागले तर ताकसुद्धा फुंकून घेण्याची त्यांची प्रवृत्ती विरोधकांच्या मार्गात अडथळा बनू शकते.

दुसरे म्हणजे विरोधकांना झुंजवायचे व आपण पोळी खायची ही त्यांची पॉलिसी त्यांना परत एकदा सत्तेच्या मार्गांपर्यंत नेऊ शकते.

Lok Sabha
Road Safety Audit: रस्ता सुरक्षितता पडताळणी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आवाहन केल्याप्रमाणे जर सर्व विरोधक एकत्र आले तरच भाजपच्या आव्हानातली हवा निघून जाऊ शकते.

पण सध्या तरी विरोधकांची एकजूट म्हणजे ‘अभी तो दिल्ली बहुत दूर है’ अशातला प्रकार वाटतो. यामुळे गोव्यात सध्या तरी भाजपकरता मैदान साफ वाटायला लागले आहे.

आता खरेच मैदान साफ आहे की, तो फक्त एक ‘भूलभुलैय्या’ आहे याचे उत्तर येणारा काळच देणार आहे, हेच खरे!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com