Puzzles Game काळाच्या ओघात अस्तंगत झालेल्या अनेक प्रकारच्या स्थानिक खेळांमध्ये, एकमेकांना कोडी घालणे हादेखील एक प्रकारचा खेळ होता. चारजण एकत्र जमले की, हळूच कोणीतरी यमकात बांधलेले एखादे कोडे सर्वांसमोर टाकायचा- ‘कुणा एकाला बारा मुले, काही छोटी-काही मोठी, काही तापट तर काही थंड, तर ओळखा पाहू मी कोण?’ मग इतरांचे डोके खाजवणे सुरू व्हायचे.
अनेक उत्तरे यायची पण ती चुकीची निघाली की कोडे घालणारा ऐटीत नकारार्थी मान हलवायचा, शेवटी सर्वांनी शरणागती पत्करली की त्याचे रुबाबात उत्तर यायचे- ‘वर्ष’! कोड्यांचा सिलसिला मग अशाप्रकारे सुरू व्हायचा आणि वेळ आरामात जायचा.
एकमेकांना कोडी घालून अानंद लुटायची ती संस्कृती आता कधीच मागे पडली आहे. गोव्यात कोड्याला वापरला जाणारा कोकणी शब्द म्हणजे हुमाणे. दक्षिण गोव्यात त्याला ‘पार्कोणे’ असेही म्हटले जाते.
एक-दुसऱ्यांना कोडी किंवा हुमाणी घालणे हे आता फार दुर्मिळ बनले आहे पण तीन वर्षांपूर्वी जेव्हा चिखली येथील बायाे-क्रुसेडर्स या संस्थेने कोडी-स्पर्धा जाहीर केली तेव्हा ती आश्चर्याची गोष्ट ठरली होती.
पण सर्वात आश्चर्याची गोष्ट ही होती की, त्या स्पर्धेला शेकडो स्पर्धकांनी प्रतिसाद देऊन कोडी सोडवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या वर्षी स्पर्धेत पैकीच्या पैकी कोडी सोडवणारे केवळ दोघे जणच होते मात्र गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेत सहा स्पर्धकांनी सर्व कोडी सोडवली होती.
ही स्पर्धा अभिनव पध्दतीने घेण्यात येते. संशोधन करून कोडी गोळा केली जातात. त्यापैकी ५० कोडी व्हिडिओत गुंफून तो व्हिडीओ सर्वात्रिक करण्यात येतो. हा व्हिडीओ पाहून स्पर्धक मग त्यातली कोडी सोडवण्याचा प्रयत्न करतो.
जो अधिकाधिक कोडी सोडवील त्याला बक्षीस जाहीर होते. आजपर्यंत या स्पर्धेच्या तीन आवृत्ती पार पडल्या आहेत. दर वर्षी ऑक्टोबर महिन्यात ही स्पर्धा जाहीर होते. स्पर्धेच्या दर आवृत्तीत नवीन कोडी असतात.
यंदाच्या चौथ्या आवृत्तीसाठी ‘बायो-क्रूसेडर्स’ने लोकांकडून कोडी मागवायला सुरुवात केली आहे. लोकाकडून आलेल्या कोड्यांमधून ५० उत्कृष्ट व बुध्दीला आवाहन करणारी वेचक कोडी निवडून त्यांचा नव्या व्हिडीओमध्ये समावेश करण्यात येईल.
तीन वर्षांपूर्वी, साधारण कोरोनाग्रस्त काळात या स्पर्धेची बीजे रोवली गेली. ‘चिखली बायो- क्रुसेडरचे’ सिरील फर्नांडिस यांची गाठभेट एका वयोवृध्दाशी झाली. त्यांनी सिरील यांना कोडी घालण्यास सुरुवात केली.
त्यांची ती कोकणी शब्दसंपदा पाहून थक्क झालेल्या सिरिल यांच्या डोक्यात मग या स्पर्धेची कल्पना तयार झाली. गोव्याभरच्या लोकांनी क्रुसेडरपाशी अनेक कोडी पाठवून जसे आपले योगदान दिले त्यातून ‘पार्कोणे सांस्कृतिक महोत्सव’ आयोजित केला गेला. ही स्पर्धा हा त्याचाच एक भाग होता. विजेत्यासाठी जाॅर्ज वार्की रोलींग ट्रॉफीची स्थापना करण्यात आली.
यंदाचे वर्ष हे या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे. स्पर्धेसाठी आतापर्यंत निवडण्यात आलेल्या कोड्यांचे पुस्तक यंदा प्रकाशित करण्याचा आयोजकांचा मानस आहे. ‘चिखली बायो क्रुसेडर्स’ मार्फत एक लुप्त होऊ पाहणारी परंपरा पुनर्जीवित करण्याचा हा प्रयत्न आहे.
बायो क्रुसेडर्सचे सिरील म्हणतात, ‘कोडी हे आपल्या भाषेचे एक वैभवी अंग आहे. कोड्यांच्या रूपाने शब्द-संपदा, भाषिक रचना यांचाही विकास होत असतो.’
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.