सुशीला सावंत मेंडिस
मडगावमध्ये होणाऱ्या ‘पुरुमेंत फेस्ता’ची मी लहानपणी आतुरतेने वाट पाहत असे. कारण त्यात पावसाळ्याच्या पुढील तीन महिन्यांसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची बेगमी केली जात असे. या वस्तू विकत घ्यायला आम्ही वेळ्ळीहून मडगावला कार्रेतीतून जायचो.
तिथेच ‘वाणपण’ (घासाघीस) या खरेदीशास्त्राचा पाया असलेल्या अत्यंत आवश्यक कौशल्याचा विकास होत असे, तोही बालवयात! नुकताच पांढरा रंग ल्यालेल्या चर्चच्या कॅनव्हासवर रंग, गंध आणि नादयुक्त असलेले पुरुमेंत फेस्त म्हणजे जणू गोमंतकीय संस्कृतीने काढलेले चालते बोलते जिवंत चित्रच होते!!
आम्हां लहान मुलांसाठी पुरुमेंत म्हणजे एक पर्वणीच असे. कारण, फक्त खरेदी झाली म्हणजे संपले, असे होत नाही. पुढील प्रक्रियाही तितकीच महत्त्वाची असते.
सुक्या गवताच्या पेंडी करून त्यात कांदे बांधून ते स्वयंपाकघरात लाकडी बांबूवर टांगण्याचा विधी व्हायचा. लाल मिरच्याही घरासमोर सुकवण्यासाठी ठेवल्या जायच्या, जेणेकरून त्या खराब न होता महिनाभर टिकतील.
गोवा हा सण आणि उत्सवांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. हा पर्जन्योत्सव जूनमध्ये गोव्यात बरसतो आणि तीन महिने सुरू राहतो. पावसाळ्यासाठीच्या तरतुदी करण्याची तयारीदेखील उत्सवी पातळीवर केली जाते.
पूर्वी हे पुरुमेंताचे फेस्त कॅथलिक लीटर्जिकल कॅलेंडरच्या फेस्ताशी संबंधित होते आणि संबंधित चर्चच्या बाहेरील प्रांगणात आयोजित केले जात होते. परंतु आज काकुलो मॉलने ते एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.
‘गोमन्तक तनिष्का महिला गट’ पुरुमेंत फेस्ताचे आयोजन कला अकादमी समोरील डॉ. एफ. एल. लुईस गोम्स गार्डनमध्ये करतो. गोव्यातील परंपरेचे दर्शन घडावे आणि तिचे संरक्षण व्हावे, या हेतूने हा त्यांचा प्रयत्न आहे. हे फेस्त मडगाव, पणजी, सांताक्रूझ आणि सांगे येथील चर्चच्या आवारात मोठ्या दिमाखात साजरे केले जाते.
पुरुमेंत फेस्ताप्रमाणे जगभरातील प्रत्येक समाजात हे विशेष दिवस साजरे होतात. ज्यांना ‘शेतकरी दिवस’ किंवा ‘बाजार दिवस’ म्हणतात. यात विकल्या जाणाऱ्या वस्तू स्थानिक पातळीवर पिकवल्या जातात. भूतानमधील नागरिक घरगुती पद्धतीने केलेले याक चीज आणि लोणी विकतात.
यूएसमधील गावकरी घरी बेक केलेले केक, कुकीज आणि जाम घेऊन येतात. गोव्यात मिरच्या, कांदे, चिंच, नाचणी, काजू, कोकम, खारातली तोरे (कच्चा आंबा), लोणचे, घरगुती गरम मसाला, फणसाचे चिप्स, पोर्क सॉसेज, पाम व्हिनेगर, खोबरेल तेल, गावठी मीठ व तांदूळ यांसारखे स्वयंपाकघरात लागणारे जिन्नस विक्रीसाठी घेऊन येतात.
राजमा, हळद, मिरपूड, गूळ इथपासून ते टेराकोटा इको-फ्रेंडली फुलदाण्या तसेच गोमंतकीय कुंभारांनी स्वहस्ते घडवलेली खापरासारखी स्वयंपाकाची भांडीदेखील असतात.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील पहिला रविवार, सांताक्रूझचे लोक त्यांच्या चर्चचे संरक्षक असलेल्या ‘सेंट क्रूझ’चा किंवा होली क्रॉसचा सण साजरा करतात. या सणाच्या दिवशीच पुरुमेंताचे फेस्तही मोठ्या प्रमाणावर भरत असे.
आजही भरते, पण त्यात स्थानिक उत्पादनांचा भाग खूपच कमी आहे. पूर्वीच्या काळी सांताक्रूझ गावातील स्थानिक शेतकरी त्यांची कृषी उत्पादने विकायचे आणि संपूर्ण इल्हास आणि बार्देशमधील लोक खरेदीसाठी यायचे. मात्र या गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेती सोडून दिल्याने त्यांचा पुरुमेंत फेस्तातील सहभाग नगण्य आहे.
दक्षिण गोव्यातील दुसरे सर्वांत मोठे पुरुमेंताचे फेस्त सांग्यात भरते. पहिला क्रमांक मडगावचा लागतो, असे मानले जाते. सांग्यात भरणारे फेस्त चर्च ऑफ अवर लेडी ऑफ मिरॅकल्स चर्चशी संबंधित आहे आणि दरवर्षी मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी भरते.
सांगे हा गोव्यातील सर्वांत मोठा तालुका असल्याने, हे फेस्त केपे आणि धारबांदोरा तालुक्यालगतच्या खेड्यांतील शेतकऱ्यांसाठी मोठी बाजारपेठ आहे.
येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाच्या उत्सवादिवशीच पणजीत पुरुमेंताचे फेस्त भरवले जाते. हे ४०० वर्ष जुन्या चर्च ऑफ द इमॅक्युलेट कॉन्सेप्शनचे एक महत्त्वाचे फेस्त आहे. अवर लेडी ऑफ द इमॅक्युलेट कन्सेप्शन (डिसेंबर ८) या आश्रयदात्याच्या फेस्तासाठी चर्च प्रसिद्ध आहे, तर दुसरे महत्त्वाचे फेस्त म्हणजे स्वर्गारोहणाचे.
पणजीच्या राजधानीच्या मध्यभागी स्थित, चर्च ऑफ द इमॅक्युलेट कन्सेप्शन (इग्रेजा दा इमॅक्युलादा कॉन्सेसीओ) हे पणजीतील सर्वांत प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे. कॅथलिक जग इस्टरच्या चाळीस दिवसांनंतर (आणि पेन्टेकॉस्टच्या दहा दिवस आधी) येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणाचा सण साजरा करते.
हा दिवस नेहमी इस्टरनंतर सहाव्या गुरुवारी येतो, परंतु उत्सव पुढील रविवारी आयोजित केले जातात. आठवडाभर चालणाऱ्या या जत्रेत शहरातील तसेच आजूबाजूच्या गावांतील लोक खरेदीसाठी गर्दी करतात.
ताळगाव आणि आजूबाजूच्या गावांतील शेतकऱ्यांनाही त्यांच्या शेतातील भाजीपाला, तांदूळ आणि फळे विकण्यासाठी ही जवळची बाजारपेठ आहे.
मडगावमध्ये, परंपरेने ईस्टरनंतर पन्नास दिवसांनी, पेन्टेकॉस्ट किंवा होली स्पिरिटचा सण म्हणून फेस्त आयोजित केले जात असे. इस्टर सीझन पेन्टेकॉस्टने संपतो, जो ग्रीक शब्द पेंटेकोस्टे वरून आला आहे, ज्याचा अर्थ पन्नासावा, असा आहे. होली स्पिरिट चर्च मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात हे फेस्त साजरे करते.
ही जत्रा सुमारे आठवडाभर चालते, कारण सासष्टीतील सर्व गावांतील लोक पावसाळ्याची बेगमी करण्यासाठी मडगावला येतात. त्याकाळी, वाहतुकीची प्रगत साधने उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात शहरात येणे कठीण होते. आजची परिस्थिती वेगळी आहे आणि मिरचीसारखे अनेक उत्पादने वर्षभर दुकानात उपलब्ध असतात.
तथापि, स्थानिक सेंद्रिय उत्पादने, काणकोणची मिरची, आमच्या शेतकऱ्यांनी स्वत: पिकवलेले पॅरा-बॉइल्ड तांदूळ हे काश्मिरी मिरची किंवा भारतातील इतर राज्यांमधून आयात केलेल्या पांढऱ्या पॉलिश्ड तांदळासारखे नसतात!
या स्वयंपाकासंबंधीच्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुढील पावसाळ्यासाठी लोकांकडून केला जातो. फर्निचर, घरगुती वस्तू यांचीही खरेदी होते. गोव्यातील पारंपरिक ‘चणे’ व ‘खाजे’देखील फेस्तामधील आपले अस्तित्व टिकवून आहेत.
त्यामुळे, पुरुमेंताचे फेस्त हा केवळ आर्थिक उपक्रमच नाही तर लोकांच्या संवेदनांचा आणि सामाजिक संवादाचा मंच आहे. गोव्याच्या मंदिरातील जत्रांप्रमाणेच गोमंतकीय संस्कृती व वारसा जपणाऱ्या चर्चच्या फेस्तांचाही यात मोठा वाटा आहे.
गोव्याच्या या फेस्तांमधून पारंपरिक पद्धतीने कृषी लागवडीवर उपजीविका असलेल्या या लहान शेतकऱ्यांचे आणि विक्रेत्यांचे हित सरकारने जपण्याची व त्यांचे रक्षण करण्याची गरज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.