तुम्ही बाबांचा अपमान केलाय या गोव्यात: लता मंगेशकर

इथे जुळलेले मैत्र अखंड कायम राहिले.
Lata Mangeshkar
Lata Mangeshkar Dainik Gomantak

‘उद्या सोमवार असल्यानं दीदी जेवायला आपल्याकडे येणार’ एवढंच तिनं मला सांगितलं. मी दीदींना म्हटलं ‘आम्हांला खूप आनंद वाटेल दीदी; पण मी सरकारी वसाहतीतल्या एका निर्जीव अशा फ्लॅटमध्ये राहतो.’ त्यावर दीदी म्हणाल्या, ‘त्यात काय झालं? आम्ही एकेकाळी एकाच खोलीत राहात होतो. लतादीदींचा तसा घरगुती म्हणावा असा बराच परिचय. पण त्याचं रूपांतर आपुलकीत झाले ते काहीसे तणातणीत. मांडवीत उतरलेल्या. शिरस्त्यानुसार भेटायला गेलो. काहीसे खोचकपणे म्हणाल्या ‘‘तुम्ही बाबांचा अपमान केलाय या गोव्यात, मी उभा राहून बाहेर पडायच्या तयारीत म्हणालो, दीदी, माझ्या आजोबांनी तुमच्या बाबांचा अपमान केला त्याची शिक्षा मला? पुढे जरा जोरात बोललो, “दीदी, आम्ही तुमच्या ग्लॅमरवर नव्हे, गळ्यातील गंधारवर प्रेम करतो. म्हणाल तर यापुढे भेटणे बंद करूयां.’’ मी भांडल्याची ही तक्रार पुढे मुख्यमंत्री आणि कला अकादमीचे अध्यक्ष भाऊसाहेब बांदोडकरांपर्यंत गेली; पण इथे जुळलेले मैत्र अखंड कायम राहिले.(Lata mangeshkar connection with goa)

Lata Mangeshkar
गोवा मुक्तिलढ्यासाठी दीदींचे महत्वपूर्ण योगदान

दीदी (Lata Mangeshkar) गोव्यात आल्यानंतर एखादा पदार्थ त्यांनी सांगायचा आणि तो डब्यात भरून मुक्कामाच्या, मांडवी, ताज हॉटेलात पोचता करायचा हे ठरलेलं. यात दोन चांगले स्टीलचे डबे गायब झाल्याने ‘ही’ आजही मनसोक्त हळहळते. एल आकाराचा एक हॉल, छोट किचन, संडास, बाथरूम एकत्र, छोटा आणि एकच बेडरूम अशा आम्ही राहात असलेल्या पाटोवरच्या त्या सरकारी निवासस्थानात त्यांना घरी बोलावण्याचं धैर्य मला कधीच झालं नाही. लतादीदीसारख्या कलाकार व्यक्तीबाबत गोवेकर काहीसा हळूवार; त्यातून खेडेकर अनेकांच्या मते फालतू माणूस. ‘‘लताबाई खेडेकरांना जोड्याकडेसुद्धा उभे करून घेणार नाहीत’ हे तेव्हाचे महाराजकारणी एम्. एस्. प्रभू यांचे एका खासगी समारंभातील हे वक्तव्य कर्णोपकर्णी गोव्याच्या उच्च वर्गीयात पसरलेले. लतादीदी व मी, अधिक खाद्यपदार्थ हे विषय गोव्यात गाजले. त्यातील दोन स्फोटक, अवाजवी घटनांचा हा ‘आँखो देखा’ अहवाल. दीदींचा मुक्काम हॉटेल मांडवी. येता येताच विमानतळापासून खेडेकरांची चौकशी. प्रथेनुसार जाऊन भेटलो. दीदींनी म्हटलं. ‘गोव्यात खूप प्रकारचे चांगले ताजे मासे मिळतात.

Lata Mangeshkar
हिंदू कॅथॉलिक एन्काऊंटर्स : गोव्यातल्या संकीर्ण धार्मिक जाणिवेचा शोध'

खास गोवा (Goa) रुचीचे माशांचे पदार्थ बाबांना खूप आवडायचे. मी चाखलेत त्यातील काही. अरे हा, तुम्ही मासे खात नाही ना?’ यावर मी एवढंच म्हटलं. बघूया दीदी. बोलणे ऐकणारा एकटा अकादमीतील शांताराम राणे तेवढा. लगोलग कामाला लागलो. विविध प्रकृती, संस्कृतीच्या माझ्या परिवाराला साद घातला. हवे ते, चांगले, ताजे फडफडीत मासे दुसऱ्या सकाळी पोचविण्याची जबाबदारी एकाने घेतली. प्रश्न होता रुचकर पदार्थ बनविण्याचा. त्याकाळी खतखत्यासह खास गोव्याचे, अत्यंत रुचकर पदार्थ देणारे एकमेव ‘हॉटेल मांडवी’. कामत नावाचे एक चांगले वयस्कर मॅनेजर. मासळी मांडवीत पोचली आणि स्वाद जिभेवर राहावा, असे चविष्ट पदार्थ दीदींनी दुपारी व रात्रीही मनसोक्त खाल्ले. हे कामतसह फक्त आमच्यापुरते राहिले. दुसऱ्या सकाळी दैनिक ‘गोमन्तक’मध्ये मोठ्या मथळ्यात ठळक बातमी. ‘लता मंगेशकरांना गोव्याचे मासे मिळाले नाहीत.’ खाली होतं, ‘गोवा रुचीचे माशांचे पदार्थ खाण्याची इच्छा लताबाईंनी अकादमीच्या एका पदाधिकाऱ्याकडे व्यक्त केली; पण ते शाकाहारी असल्याने...’ मागाहून वृत्तपत्रात यावर अनेक प्रतिक्रियाही. अकादमीच्याच एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने तर मला झापलंही. ‘खेडेकार, म्हाका सांगपा न्ही...तें लता म्हगेर नुस्ते खावन, जेवन गेले.’ अशा फुशारक्या मारण्याचा अनेक लब्धप्रतिष्ठितांचा चान्स गेला होता. दुसऱ्यांदा याची पुनरावृत्ती. मांडवीत पोचलेली मासळी रुचकर पदार्थांत परिवर्तित होण्याच्या प्रक्रियेत. सकाळी नवाच्या सुमाराला मुख्यमंत्री मा. प्रतापसिंह राणेंचा घुश्शातला फोन. खेडेकर, लताबाई अकादमीच्या कार्यक्रमासाठी आल्यात. त्यांच्या सन्मानार्थ सायंकाळी मांडवीत डिनर ठरवलं. पण लताबाई मला सांगतात, खेडेकरांना विचारा, जेवण ते देणार आहेत. हे काय चाललंय?’ माझं उत्तर होतं, ‘सर, डिनर कन्फर्म करा, दीदींना मी सांगतो.’ त्याच कामतांच्या मदतीनं आणलेल्या माशांच्या डिशेस खास दीदींसाठी म्हणून स्वतंत्र ठेवल्या.

कारण प्रमाण मर्यादित होते. त्याचा स्वाद मुख्यमंत्र्यांनीही घेतला. मागाहूनचे पुराण ‘ही’शी डायरेक्ट संबंधित. अकादमीच्याच एका कार्यक्रमासाठी लतादीदी येणार होत्या. त्यांना विमानतळावर घेण्यासाठी जाताना मी ‘हिला’ आग्रह करून सोबत घेतलं. कदाचित अशा प्रकारचा हा पहिलाच प्रसंग असावा. पण आपल्या हातचे पदार्थ खाणारी दुनियेत मशहूर अशी ही गायिका दिसते कशी, हे पाहण्यासाठी असेल; पण ती आली. विमानतळावरून त्यांना घेतल्यानंतर त्यांच्यासाठी रिझर्व्ह केलेल्या तारांकित हॉटेलच्या सूटपर्यंत त्यांना पोचवलं. दोघीही मागल्या सीटवर बसलेल्या; पण फार बोलल्या नसाव्यात. दीदी अधूनमधून काहीतरी विचारत होत्या आणि कोण जाणे पण ‘ही’ दडपण असेल, जेवढ्यास तेवढं. हॉटेलात पोचल्यानंतर बाहेरच्या खोलीतून मी त्यांचा निरोप घेऊ लागलो तशा मला म्हणाल्या, ‘अरे, बसा ना दोघं जरा.’ वॉश घेऊन आल्यानंतर आमचं जुजबी बोलणं झालं.

आणि त्यांनी हिला म्हटलं, ‘वहिनी, तुम्ही बोलत का नाहीत? गप्प गप्प का? या.’ आणि तिला घेऊन आतल्या रुममध्ये गेल्या. दोघींचं अर्धा-एक तास काय गुफ्तगू झालं माहीत नाही, बाहेर आल्यानंतर हिचा चेहरा उत्फुल्ल होता. कसंबसं ‘उद्या सोमवार असल्यानं दीदी जेवायला आपल्याकडे येणार’ एवढंच तिनं मला सांगितलं. मी दीदींना म्हटलं ‘आम्हांला खूप आनंद वाटेल दीदी; पण मी सरकारी वसाहतीतल्या एका निर्जीव अशा फ्लॅटमध्ये राहतो.’ त्यावर दीदी म्हणाल्या, ‘त्यात काय झालं? आम्ही एकेकाळी एकाच खोलीत राहात होतो. फक्त एक करा, कुणाला सांगू नका मी येणार म्हणून. लोक खूपच त्रास देतात हो.’ गाडीत बसल्यानंतर हिनं सांगितलं, की दीदीना खतखतं खायची इच्छा आहे. बरोबर त्यांची बहीण उषाही येणार आहे. तिचा वाढदिवस आहे उद्या आणि आपल्याला हे सर्व करायचंय.

दुसऱ्या सकाळी गावठी भाज्यांसाठी गाडी वेऱ्याला पाठवून आणि मार्केटमधून खतखत्याचं आवश्यक सामान आणलं. कधी नव्हे ते हिनं मला फोटोग्राफरला बोलवायला सांगितलं. सायंकाळी दीदी आल्या. पोटभर गप्पा झाल्या. त्याचवेळी अभिषेकीही आलेले. त्यामुळं अधिक रंग भरला. एक-दोन गाण्यांच्या चर्चेत, त्यावेळी हवी तशी आली नाही ती तान अशी यायला पाहिजे होती, अशा ताना, पलटे, पाटोवरच्या फ्लॅटमधील त्या निर्जीव भिंती त्याक्षणी खरंच मोहरल्या असतील. उषाताईंचं औक्षण झालं आणि साग्रसंगीत जेवण मला वाटतं तासभर चाललेलं असावं. जेवणारी चार माणसं, दीदी, उषाताई, अभिषेकी व मी खतखतं व सोबत करमलाचं लोणचं दीदींनी पुन्हा पुन्हा मागून खाल्लं. त्यावेळचा हिचा प्रफुल्लित व तृप्त असा चेहरा आयुष्यात पुन्हा कधीही बघायला मिळाला नाही. आता राहिल्यात फक्त कुरतडणाऱ्या असह्य आठवणी. । ॐ शांतिः।

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com