हिंदू कॅथॉलिक एन्काऊंटर्स : गोव्यातल्या संकीर्ण धार्मिक जाणिवेचा शोध'

गोव्यातील कॅथॉलिक समाज हा सांस्कृतिकदृष्ट्या हिंदू आहे'
condition of Catholic society in Goa
condition of Catholic society in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

2013 साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एका मुलाखतीत ‘गोव्यातील कॅथॉलिक समाज हा सांस्कृतिकदृष्ट्या हिंदू आहे’ अशा स्वरूपाचे काहीसे वादग्रस्त विधान केले होते. आजही अशा प्रकारची विधाने, खासकरून निवडणुकीच्या तोंडावर आपण ऐकत असतो. गोव्यातला मुस्लिम समाज इतर मुस्लिम समाजापेक्षा वेगळा आहे, असेही म्हटले जाते. अशी विधाने वर वर ठीक वाटत असली तरी ती काही मूलभूत प्रश्न निर्माण करतात. मुळात हिंदू असणे म्हणजे काय, ख्रिश्चन (त्यातही कॅथॉलिक) असणे म्हणजे काय, याची व्याख्या कोणती? त्या व्याख्येची ऐतिहासिक प्रक्रिया काय? गोव्यात हिंदू किंवा कॅथॉलिक असण्याची ठळक वैशिष्ट्ये कोणती? यातल्या सीमारेषा अगदीच स्पष्ट आहेत की पुसट आहेत? गोव्यातले कॅथॉलिक (Goa Catholic Society) जसे सांस्कृतिकदृष्ट्या हिंदू भासतात तसेच गोव्यातल्या हिंदूंना सांस्कृतिकदृष्ट्या कॅथॉलिक म्हणू शकतो का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न डॉ. अलेक्झांडर हेन यांनी आपल्या ‘हिंदू कॅथॉलिक एन्काऊंटर्स’ या पुस्तकात केला आहे. जर्मनीतील हायडेलबर्ग विद्यापीठात ‘रिलिजियस स्टडीज’मध्ये डॉक्टरेट मिळवून ते सध्या अमेरिकेतील ऍरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये भारतीय धर्माचे अध्यापन करतात. (condition of Catholic society in Goa)

condition of Catholic society in Goa
नथूरामने गोळ्या झाडण्यापूर्वी गांधीजींवर झाले होते 5 हल्ले

समाजात कुठलाही समज आपसूकच अस्तित्वात नसतो, तर तो समज रूढ होण्याची एक निरंतर प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेचे मापन समाजशास्त्रात विविध पद्धतीने केले जाते. इतिहास आणि मानवशास्त्र (अँथ्रोपॉलॉजी) या त्या प्रक्रियेचे मापन करण्याच्या दोन प्रमुख ज्ञानशाखा आहेत. डॉ हेन यांचे पुस्तक या दोन्ही ज्ञानशाखांचा आधार घेऊन गोव्यातील समाजात धार्मिकतेची व्याख्या आणि जागा, त्याच्या जडणघडणीची प्रक्रिया याविषयी धांडोळा घेते. पोर्तुगीज शासनामुळे एक नवीन धार्मिक जाणीव आणि आधुनिकतेशी सामना करत असलेल्या सोळाव्या शतकातील गोमंतकीय समाजात आलेली स्थित्यंतरे आणि त्याचे आजही आढळून येणारे प्रभाव यांची साखळी हेन बांधतात. गोमंतकीय समाजात हिंदू आणि कॅथॉलिक संस्कृतीची सरमिसळ होऊन एक संकीर्ण (सिंक्रेटीक) धार्मिक जाणीव उदयास आली असल्याचे मत हेन आपल्या संशोधनातून मांडतात.

पहिल्या प्रकरणात ते पूर्वेकडील ख्रिस्ती अनुयायांच्या शोधात निघालेल्या पोर्तुगीज प्रवाशांविषयी लिहितात. वास्को द गामासाठी पूर्वेकडे जाणे हा नवीन विश्वाचा, ज्ञानाचा किंवा अनुभवाचा शोध घेणे नसून आधीच असलेले ज्ञान आणि अनुभव दृढ करण्याचा प्रकल्प होता, असे ते म्हणतात. त्यामुळे ‘डिस्कव्हरी’ या संज्ञेला एक वेगळा आयाम प्राप्त होतो. दुसऱ्या प्रकरणात पोर्तुगीज राजवटीने आरंभलेल्या मूर्तीपूजेविरुद्धच्या मोहिमेबद्दल ते लिहितात. या मोहिमेंतर्गत मंदिरे, घुमट्या इत्यादी तोडून तिथे ख्रिस्ती धार्मिकस्थळे बांधण्यात आली, या प्रक्रियेचा सारांश ते देतात. तिसऱ्या प्रकरणात जेजुईट मिशनरींद्वारा स्थानिक संस्कृतीशी संवादी राहून ख्रिस्ती धर्माची एक दक्षिण आशियाई व्याख्या निर्माण झाली, याविषयी हेन सविस्तर लिहितात. स्थानिक संस्कृती, समाजव्यवस्था सामावून घेऊन ख्रिस्ती धर्मानुभव निर्माण करणे ही जेजुईट पंथाची खासियत होती. जेजुईट इतिहासात या प्रक्रियेला ‘ॲकोमोडाशियो’ असेही म्हटले जाते. फादर थॉमस स्टीफन यांनी वैष्णव पंथातील प्रतिकांचा वापर करून ‘ख्रिस्तपुराण’ हा बायबलच्या मराठीचा आविष्कार याच प्रक्रियेत मोडतो. जेजुईट पंथियांनी निर्माण केलेली मराठी व्याकरणे, शब्दावली इत्यादीविषयी हेन या प्रकरणात लिहितात.

condition of Catholic society in Goa
कासावलीचे रेमेंत सायबिणीचे फेस्त

गोव्यातल्या ख्रिस्ती (Goa Christian) धर्माच्या प्रसारप्रक्रिया उद्घृत केल्यावर हेन सरळ विसाव्या शतकात येतात. नव्वदीच्या दशकापासून हेन गोव्यात फिल्डवर्क करत आहेत आणि यापुढील प्रकरणे याच फिल्डवर्कवर आधारित आहेत. चौथ्या प्रकरणापासून गोव्यातले हिंदू आणि कॅथॉलिक समाज एकत्ररित्या कसे राहतात, याविषयी ते सविस्तर मांडणी करतात. त्यासाठीचा मूलभूत आधार गोमंतकीय गाव आहे. हेन यांच्या मते गावाची संकल्पना ही केवळ आर्थिक आणि सामाजिक निकषांवर नाही तर धार्मिक निकषांवरही (उदा. ग्रामदेवता, जत्रा किंवा फेस्त यासारखे ग्रामदेवतांचे उत्सव व त्याला जोडून असलेले मानसन्मान.) आधारलेली आहे.

हेन यांच्या मते, गावातल्या धार्मिक तसेच दैनंदिन जीवनात आढळून येणारा हिंदू कॅथॉलिक समन्वय ढोबळमानाने तीन प्रकारांत मोडतो. पहिला प्रकार म्हणजे गावच्या सीमा व ग्रामदेवतांच्या अधिष्ठानाखाली येणारा गावाचा परिघ. यात विविध ग्रामदेवतांचे असलेले स्थानिक महत्त्व- उदा. खुरीस आणि घुमट्यांकडे असलेली गावपणाची आणि रक्षणाची जबाबदारी- यासारख्या रूढीपरंपरा मोडतात. दुसरा प्रकार म्हणजे ग्रामदेवतांमधील एकमेकांत असलेल्या नात्यातून हा समन्वय अधोरेखित होतो, असे हेन मांडतात. उदा. लईराई, महामाई, मोरजाई, केळबाय, आदिपाय या पाच बहिणींची सहावी बहीण मीराबाई म्हणजे फिरंग्यांनी धर्मांतरित केलेली मिलाग्रीस आणि सातवी बहीण सीता, जी पाताळात गडप झाली. या सर्व बहिणी गोव्यातल्या नव्या आणि जुन्या काबिजादींमधील गावांमध्ये पुजल्या जातात. तिसरा प्रकार म्हणजे ग्रामस्थ आणि पांथस्थांच्या आरोग्य आणि खुशालीमध्ये ग्रामदेवतांचे असलेले महत्त्व. उदा. बांबोळी येथे असलेला फुलांचा खुरीस किंवा म्हापशातील बोडगेश्वर हे तिथल्या गावच्या लोकांचे तसेच तिथून प्रवास करणाऱ्यांच्या आरोग्यावर अंकुश ठेवतात आणि या भावनेत धर्माचे बंधन ना देवाला ना भक्ताला आड येते. यातूनच एक प्रगल्भ आणि संकीर्ण धार्मिक जाणीव गोव्यातील समाजमनात रूढ झाली आहे, असे मत हेन मांडतात. हाच मुद्दा अधिक ठळकपणे समजविण्यासाठी पाचव्या प्रकरणात हेन शिवोली गावातील जागर उत्सवाचे उदाहरण घेऊन हिंदू-ख्रिस्ती धार्मिक संवादाची वैशिष्ट्ये स्पष्ट करतात.

सरतेशेवटी गोव्यातील (Goa) हिंदू ख्रिस्ती समन्वयाद्वारे धार्मिक संकीर्णतेच्या संकल्पनेवर एकूणच पुनर्विचार करणे गरजेचे आहे, असे हेन म्हणतात. धर्माच्या अध्यापनात किंवा एकूणच मानव्यशास्त्रांमध्ये संकीर्णतेला काहीशा संशयास्पदरित्या पाहिले जाते आणि याला ठोस कारणे आहेत. हेन यांच्याच पुस्तकाचे उदाहरण घ्यायचे झाले तर जे कॅथॉलिक नाहीत ते हिंदू, असा समज दृढ मानून हेन आपली मांडणी करतात. पण सोळाव्या शतकात आपण हिंदू आहोत, ही जाणीव बिगर कॅथॉलिक समाजात होती का? आणि असलीच तर ती समान पातळीवर होती का? याविषयी प्रश्न निर्माण केले जाऊ शकतात. बेताळ, जाग्यावयलो, भूतनाथ किंवा सांतेरी या ग्रामदेवता प्रामुख्याने ब्राह्मणेतर समूहांमध्ये लोकप्रिय आहेत पण हेन यांच्या विवेचनात जातिव्यवस्थेचा समावेश फारसा नसल्याने त्यांच्या संकीर्णतेची व्याख्या ही सरसकट संपूर्ण गोमंतकीय समाजाला लागू होते की नाही, याबद्दल प्रश्न आहे. या तार्किक मर्यादा असल्या तरीही गोव्यातील धार्मिक जाणिवांची जडणघडण समजायची असेल तर हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com