Goa Politics: ‘भाजप खरेच डेंजर झोन’मध्ये आहे का?

गोवा राज्यात भाजपविरोधी हवा, गोव्यातील भावी राजकारण अंधारात चाचपडताना दिसत आहे
Goa BJP Politics
Goa BJP PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

एका वृत्तवाहिनीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार भाजपचे बरेच आमदार ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे दिसून येत आहे. बाबू कवळेकर, बाबू आजगावकर, पांडुरंग मडकईकर, बाबाशान, बाबूश मोन्सेरात, जेनिफर मोन्‍सेरात, मिलिंद नाईक, इजिदोर फर्नांडिस, एलिना साल्ढाणा, ग्‍लेन टिकेलो, ज्योशुआ डिसोझा, प्रवीण झांट्ये, फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नांडिस, सुभाष शिरोडकर, कार्लुस आल्मेदा हे भाजपचे आमदार - मंत्री ‘अनसेफ’ असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. नीलेश काब्राल, फिलिप नेरी, दीपक पाऊसकर, क्लाफासिओ डायस, नीळकंठ हळर्णकर या आमदार, मंत्र्यांना पन्नास टक्के संधी असल्याचे हे सर्वेक्षण नमूद करते. तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्‍यासह माविन गुदिन्हो, विश्‍वजित राणे, राजेश पाटणेकर, दयानंद सोपटे व मायकल लोबो, एवढेच फक्त ‘सेफ झोन’मध्ये असल्याचा निष्कर्षही या सर्वेक्षणाने काढला आहे.

अर्थात, हे सर्वेक्षण वास्तविक आहे का? की वास्तविकाशी फारकत घेणारे आहे, हे सांगणे सध्या कठीण आहे. तरीही या सर्वेक्षणाकडे अगदीच दुर्लक्ष करता येणे शक्य नाही. पुढील तीन महिन्यांत अजून बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता असल्यामुळे हे सर्वेक्षण काही प्रमाणात ‘शितापुढे मीठ खाण्याचा’ प्रकारही असू शकतो. सध्या राज्यात भाजपविरोधी हवा आहे, हे नाकारण्यात अर्थच नाही. अनेक समस्यांमुळे सध्या जनता भाजप विरूद्ध रोष व्यक्त करताना दिसत आहे. तरीही भाजपला पर्याय कोण? याचे उत्तर अद्याप सापडलेले नाही. काँग्रेस पक्ष अस्ताला जाण्याचा वाटेवर दिसत आहे.

Goa BJP Politics
Goa Election: अनेकांना तिकिटे नाकारली जातील : मुख्यमंत्री

आम आदमी पक्षाने राज्यात जरी डेरा घातला, तरी अजून तो या निवडणुकीत मोठी झेप घेईल की नाही, हे सांगणे कठीण आहे. तृणमूलने जरी राज्यात धडाकेबाज सुरवात केली, तरी त्यांची उडी कुठपर्यंत पोहोचते हे बघावे लागेल. गोवा फॉरवर्ड, मगोप हे स्थानिक पक्ष एका मर्यादेपलीकडे जाऊ शकणार नाहीत. हेही तेवढेच खरे आहे. राष्ट्रवादी बाबतही तेच म्हणता येईल. मुख्य म्हणजे सध्या तरी हे सर्व पक्ष विखुरल्यासारखे दिसताहेत. सर्वांनी जर वेगळी चूल थाटली, तर भाजपचे परत ‘बल्ले बल्ले’ व्हायला वेळ लागणार नाही. इथे एक लक्षात घ्यायला हवे, ते म्हणजे भाजपकडे कार्यकर्त्यांचे जे जाळे आहे, ते अन्य पक्षांकडे नाही. भाजपमध्ये यावेळी उमेदवारीबाबत दुफळी माजणार, यात संदेह नाही. तरीसुद्धा त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरूद्ध राहतील, यातही दुमत असण्याचे कारण नाही. भाजपची बुथ यंत्रणा सक्षम आहे. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत कसे न्यायचे, हे तंत्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी कधीच आत्मसात केले आहे. केंद्रात सत्ता असल्यामुळे त्यांच्याकडे अमाप पैसाही आहे.

त्यामुळे आता राज्यात बाहेरून आलेले पक्षही कथित पैशांच्या थैल्या मोकळ्या करताना दिसताहेत. त्‍यामुळे गोव्यातील भावी राजकारण अंधारात चाचपडताना दिसत आहे. लुईझिन फालेरो यांच्‍यासारखा काँग्रेसचा निष्ठावंत व खास करून सोनिया गांधींशी निष्ठावंत असलेला दिग्गज राजकारणी जर काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये जाऊ शकतो, तर येत्या काही दिवसांत आणखी असेच चमत्कार होऊ शकतील, असे म्हणायला वाव आहे. त्यामुळेच राजकीय ठोकताळे बांधणे अवघड आहे. भाजपने या सर्वेक्षणाचा आधार घेऊन काही आमदारांचा पत्ता कट केला, तर आश्चर्य वाटायला नको. भाजपचे काही आमदार परत निवडून येणार हे भाजपच्या ‘हायकमांड’ला यापूर्वीच कळले आहे. म्हणूनच तर त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गोवा प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.

Goa BJP Politics
Goa Politics: युतीच्या शक्यतेला राज्यात पुन्हा चालना

याचा अर्थ भाजपने गोव्यातील निवडणूक गांभीर्याने घेतली आहे, असाच होतो. पण, भाजपचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी हे सर्वेक्षण करणारे सोसायटीच्या निवडणुकीतसुद्धा निवडून येऊ शकणार नाहीत, असे जे विधान केले आहे ते आततायीपणाचे ठरेल. राजकारणी व राजकीय विश्‍लेषक यांच्यात फरक असतो, हे बाबूश यांनी समजून घ्यायला हवे. राजकारणी हे संग्रामात उडी घेत असतात, तर राजकीय विश्‍लेषक या संग्रामाचा निकाल काय होऊ शकतो, कोणाची हार-जीत होऊ शकते याचा आढावा घेत असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच कोणतीही निवडणूक लढविली नाही. पण, ते उत्कृष्ट राजकीय विश्‍लेषक होते. भावी राजकीय घडामोडींचा अंदाज ते आधीच बांधत असत. सुरवातीला ‘मार्मिक’ व नंतर ‘सामना’द्वारे ते आपला अंदाज लोकापर्यंत पोहोचवित असत. त्‍यामुळे ते सेनेसारख्या एका सामाजिक संघटनेचे रूपांतर बलाढ्य राजकीय पक्षात करू शकले. त्यामुळे राजकीय विश्‍लेषकांना नजरअंदाज करणे हे चुकीचे ठरू शकते. सुदैवाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हे सर्वेक्षण गांभीर्याने घेतलेले दिसते. आता भाजपच्या इतर मंत्री आमदारांनी हे सर्वेक्षण गांभीर्याने घेतले की नाही हे कळायला मार्ग नाही.

2017 सालच्या निवडणूकीपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात तत्कालीन मुख्यमंत्री ‘डेंजर झोन’मध्ये असल्याचे दिसत होते. पण, पार्सेकर यांनी ते सर्वेक्षण गांभीर्याने न घेतल्यामुळे मोठ्या फरकाने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अर्थात वर नमूद केल्याप्रमाणे राजकीय पटलावरची ‘प्यादी’ अजून कशी हलणार याचा तर्क करणे कठीण असल्यामुळे या सर्वेक्षणात बराच बदल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. भाजपला ‘चेकमेट’ देण्याचे प्रयत्न राज्यात सुरू आहेत, असे सध्या तरी कोठेच दिसत नाही. प्रत्येक पक्ष हा आपल्या स्वप्नात मशगुल असल्यासारखा वाटतो. आपणच भाजपचा पर्याय, असे प्रत्येक पक्षाला वाटत आहे आणि ही परिस्थिती लवकरच बदलली गेली नाही, तर मात्र भाजपचे ‘डेंजर झोन’मध्ये असलेले काही आमदार ‘सेफ झोन’ मध्ये जाऊ शकतात. तरीही तूर्तास हातावर हात ठेवून ‘आगे आगे देखो, होता है क्या’ असे म्हणत काय होते ते बघत राहणे एवढेच आपण करू शकतो हेच खरे.

- मिलिंद म्हाडगुत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com