Gomantak Editorial: भविष्यवेधी दातृत्व

देशाच्या महत्त्वाकांक्षी अशा ‘आधार’ ओळखपत्र योजनेची आखणी नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली झाली, एवढे सांगितले तरी त्यांच्या एकूण कर्तृत्वाची ओळख होऊ शकते.
Gomantak Editorial
Gomantak EditorialDainik Gomantak
Published on
Updated on

Gomantak Editorial शूरवीर, विद्वान आणि वक्ता यांच्या तुलनेत ‘दाता’ समाजात अतिशय दुर्मीळ असतो, असे संस्कृत सुभाषितकाराने म्हटले आहे आणि त्याचा प्रत्यय येतोदेखील.

आधुनिक काळात दात्यांची संख्या हळुहळू का होईना वाढत असल्याने समाजचित्र बदलले आहे, असे म्हणता येत असले तरी दान कोणाला, कसे आणि कोणत्या भावनेने केले, हे मुद्दे उरतातच! त्या तपशीलात जाऊन विचार केला तर विचारपूर्वक आणि सत्पात्री केलेल्या दानाचे दुर्मिळत्व लक्षात येते.

Gomantak Editorial
मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सदानंद तानावडे दिल्लीला रवाना; जेपी नड्डांसोबत मंत्रिमंडळ फेरबदलावर होणार चर्चा?

‘इन्फोसिस’चे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांनी मुंबईच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या संस्थेला तब्बल तीनशे पंधरा कोटी रुपयांची दिलेली देणगी हे त्या प्रकारचे दातृत्व आहे.

याच ‘आयआयटी’तून शिक्षण घेतलेले नीलेकणी हे उद्योगपती म्हणून ख्यातकीर्त आहेतच; परंतु देशाच्या महत्त्वाकांक्षी अशा ‘आधार’ ओळखपत्र योजनेची आखणी त्यांच्या नेतृत्वाखाली झाली, एवढे सांगितले तरी त्यांच्या एकूण कर्तृत्वाची ओळख होऊ शकते.

‘‘मी जे काही दिले आहे, हे केवळ आर्थिक योगदान नव्हे, तर मला आयुष्यात भरभरून देणाऱ्या संस्थेप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे’’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. भारतातील एखाद्या शिक्षण संस्थेला एका व्यक्तीने दिलेली ही सर्वात मोठी देणगी असेल, असे ‘आयआयटी’चे संचालक सुभाशीष चौधरी यांनी म्हटले आहे.

परंतु केवळ मोठी रक्कम एवढ्याच कारणामुळे या देणगीला विशेष महत्त्व नाही. उद्योगातून मिळविलेल्या संपत्तीचा लक्षणीय भाग मनुष्यबळ निर्माण करणाऱ्या शिक्षण संस्थेला देणे यातील अर्थपूर्णता लक्षात घ्यावी.

देश जी स्वप्ने समोर ठेवून वाटचाल करू पाहात आहे, त्याच्याशी या कृतीचा नक्कीच संबंध आहे. आर्थिक महासत्ता बनायचे असेल तर त्याचा मार्ग खरे तर शिक्षण संस्थांमधूनच जातो. पण त्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यासाठी या संस्था सर्वार्थाने तेवढ्याच सक्षम हव्यात.

Gomantak Editorial
मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सदानंद तानावडे दिल्लीला रवाना; जेपी नड्डांसोबत मंत्रिमंडळ फेरबदलावर होणार चर्चा?

विशेषतः आर्थिक आणि शैक्षणिक साधन सामग्रीने त्या परिपूर्ण हव्यात. त्याच्या बळावरच त्या नव्या पिढीला अधिक दर्जेदार शिक्षण देऊन सक्षम करू शकतात. याच प्रक्रियेत जे काही अडथळे येत असतात, ते दूर करायला हवेत.

आपल्याकडे बुद्धिमत्तेची वानवा नाही. पण त्या बुद्धिमत्तेला चांगले संस्थात्मक कोंदण लाभावे लागते, तर त्याचा समाजाला, देशाला उपयोग होतो. असे संस्थाजीवन हे मोकळ्या वातावरणात, स्वायत्ततेच्या पर्यावरणात बहरते. ती परिस्थिती निर्माण करणे हे आपल्यापुढचे आव्हान आहे.

नीलेकणी यांनी म्हटले आहे, की मी दिलेल्या देणगीचा कसा विनियोग करायचा हे त्या संस्थेने ठरवावे. मी कोणत्याही अटी घालणार नाही. हे स्वातंत्र्य मोलाचेच आहे. आता इतरांनीही नीलेकणी यांचे हे ‘देणारे हात’ घेतले पाहिजेत.

देशाची प्रगती वगैरे करायची तर फक्त ‘मायबाप सरकार’नेच त्यासाठी प्रयत्न करावेत, अशी एक समजूत आहे; मग तो आर्थिक आधार देण्याचा मुद्दा असो, वेगवेगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधांची निर्मिती असो. वा इतर आनुषंगिक बाबी असोत.

अनेकदा ही समजूत सरकारच्या एकूण आविर्भावामुळे तयार होते, हे नाकारता येणार नाही; परंतु वास्तव हे आहे की कोणतीही राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य होतात, ती राजकीय नेतृत्व, प्रशासकीय यंत्रणा यांच्याबरोबरच देशातील व्यक्तींच्या उत्स्फूर्त सहभाग आणि मेहनत यांच्यामुळेच.

Gomantak Editorial
Goa Congress : गोव्याला दुसरे मणिपूर बनवू देणार नाही; काँग्रेस नेत्या रिचा भार्गव

आपल्याकडे उद्योगपतींनी दानधर्म करणे हे देखील काही नवे नाही. अनेकांची नावे त्यात घेता येतील. परंतु ज्या देणगीतून नव्या कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळते, भविष्याला आकार दिला जातो, त्याचे महत्त्व वेगळेच असते. टाटा समुहाने दाखवलेले दातृत्व या प्रकारचे आहे, हे त्यांनी उभ्या केलेल्या अनेक मूलभूत काम करणाऱ्या संस्थांवरून चटकन लक्षात येते.

त्यामुळेच नीलेकणी यांनी केलेली कृती ही केवळ एका व्यक्तीने केलेला दानधर्म एवढ्यापुरती पाहून चालणार नाही. या देणगीने सगळे प्रश्न निकालात निघतील, असेदेखील नाही. पण आपल्याकडे उद्योग आणि शिक्षणसंस्था यांच्यात उत्तम समन्वय प्रस्थपित व्हायला हवा आहे, ही प्रयत्नांची दिशा त्यातून अधोरेखित होते.

तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे उत्पादन प्रक्रियेचे स्वरूप अधिकाधिक व्यामिश्र, कौशल्याचा कस पाहणारे होऊ लागले आहे. जागतिक स्पर्धेत चांगल्या कामगिरीची मुख्य भिस्त मनुष्यबळावरच असणार आहे. आजच्या घडीला अनेक कारणांनी विविध देश चीनला पर्याय शोधत असताना सक्षम उत्पादन केंद्र बनण्याच्या स्पर्धेत भारताला मोठी संधी समोर दिसत आहे.

हे लक्षात घेतले तर उद्योग आणि शिक्षण यांचा मेळ किती महत्त्वाचा आहे, हे लक्षात येते. असे विविधांगी कौशल्य तयार व्हायचे तर त्याला अनुरूप अभ्यासक्रम, पायाभूत सुविधा, शिक्षकवर्ग आणि संशोधनाला पूरक वातावरण याची गरज आहे.

अशा प्रयत्नांत अनेकदा जे अडथळे निर्माण होतात, ते लाल फितीचे, सरसकटीकरणाचे, प्रशासकीय नियंत्रणाचे. यातून बाहेर पडून एक नवी कार्यसंस्कृती निर्माण करायची असेल तर सर्वांगीण प्रयत्न करायला हवेत. नंदन नीलेकणी यांच्या दातृत्वाच्या कृतीचा उपयोग तशा व्यापक प्रयत्नांना चालना देण्यासाठी झाला, तर त्याइतकी दुसरी चांगली गोष्ट कोणती असेल?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com