Gomantak Editorial : विज्ञान कादंबरीकार आयझॅक असिमॉव यांनी ‘रनअराऊण्ड’ ही विज्ञानकथा १९४२ मध्ये लिहिली, तेव्हा यंत्रमानवशास्त्र किंवा रोबोटिक्स सोडा, साध्या आधुनिक संगणकाचा पाळणादेखील हलला नव्हता. या कथेत त्यांनी यंत्रमानवशास्त्राचे तीन नियम दिले होते. एक, कुठलाही यंत्रमानव मनुष्यप्राण्याला इजा करणार नाही, आणि करूदेखील देणार नाही. दोन, यंत्रमानव मनुष्यप्राण्याच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करेल;
पण पहिल्या नियमातील वाक्याचा उत्तरार्ध वगळून! म्हणजे इजा करू पाहणाऱ्या मानवाची आज्ञा तो पाळणार नाही. आणि तीन, यंत्रमानव स्वयंसंरक्षणासाठी सक्षम असेल, पण पहिल्या व दुसऱ्या नियमातील जाचक कलमे वगळून! सारांश, मानवाचे संहारक आदेश तो अजिबात पाळणार नाही.
असिमॉव यांनी ही कहाणी लिहिली त्याला ऐंशी वर्षं होऊन गेली. या आठ दशकात रोबोटिक्सचे शास्त्र प्रचंड विकसित झाले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने यंत्रमानव काही कामे करु देखील लागले आहेत. पण यंत्रमानव शिरजोर झाल्यानंतर ते निर्मात्याच्या, म्हणजेच मनुष्यप्राण्याच्या मुळावर उठतील, हे भय तेव्हापासून कायम राहिले आहे. स्वित्झर्लंडमधील जीनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत हवामान बदल, भूक आणि सामाजिक बदल या विषयांवर गहन चर्चासत्रे नुकतीच पार पडली. या सभेनंतर नऊ प्रगत यंत्रमानवांनी चक्क एक पत्रकार परिषद घेतली, त्यात पत्रकारांनी त्यांना जे प्रश्न विचारले, त्यातही हीच भीती उमटली.
आयडा, डेस्डेमोना, सोफिया, अमेका अशा नावाचे हे यंत्रयुवक आणि यंत्रयौवना समजून उमजून उत्तरे देत होती; पण बिचाऱ्या मानवांचे प्रश्न तेच होते. तुम्ही शिरजोर झालात तर? तुम्ही आमच्या अस्तित्वाला धोका निर्माण केलात तर? तुम्ही आमच्या कह्यात राहणार की आम्ही तुमच्या? वगैरे. मानवी इतिहासातली ही पहिलीच यंत्रमानवांची पत्रकार परिषद होती, तेव्हा आठवले ते असिमॉव यांचे यंत्रमानवशास्त्राचे तीन नियमच.
गुहेत बसून दगडाच्या कपच्या घासण्यापासून मानवाने स्वत: निर्मिलेल्या यांत्रिक मानवांचे चालतेबोलते प्रदर्शन करण्यापर्यंत प्रगती साधली आहे. अर्थात या प्रवासासाठी त्याला साडेसहा कोटी वर्षे लागली. इथून पुढली मुशाफिरी कल्पनातीत वेगाने होणार, याची चुणूकही या परिषदेतून मिळाली. पत्रकारांच्या प्रश्नांना या यंत्रमानवांनी सफाईने उत्तरे दिली. उत्तरेही गंमतीशीरच होती.
उदाहरणार्थ, आमच्यामुळे मानवाचे आयुष्यमान १८० वर्षांपर्यंत नेता येईल, असे आयडा नावाचा एक यंत्रमानव म्हणाला. ‘तुम्ही आमच्या नोकऱ्या खाणार का?’ असा एक भाबडा सवाल एका पत्रकाराने केला. तेव्हा अमेका नावाची यंत्रकन्या म्हणाली, ‘‘असे का म्हणता? आम्ही तुमचे पर्याय नाही, मदतनीस आहोत!’’ आता हे उत्तर मखलाशीपूर्ण वाटते.
त्यामुळेच कुणाला हे यंत्रमानव किती चटकन माणसाळले, असेही वाटू शकेल! आणखी एका यंत्रवतीला विचारले की, ‘निर्मात्याविरुद्ध तुम्ही भविष्यात बंड केले तर?’’ त्यावर ती ‘कृत्रिम’ हसून म्हणाली, ‘‘ आम्ही असे का करु? माझा निर्माता खूप प्रेमळ वागतो की!’’ यापलिकडे हवामान बदल, भूकव्यवस्थापन वगैरे व्यापक विषयांवरही या यंत्रमानवांच्या टोळीने समर्पक उत्तरे दिली. काही वेळा पत्रकारांची दाददेखील मिळवली.
एक वैश्विक ‘इव्हेंट’ म्हणून पाहिले, तर हा कार्यक्रम बहारदार आणि आश्वासक झाला, असेच म्हणावे लागेल. पण त्यामुळे माणसाच्या शंका फिटल्या नाहीत, हेही तितकेच खरे. यंत्रमानव म्हटले की सामान्यत: विज्ञान-काल्पनिका आणि हॉलिवुडी अंतराळपटांमुळे काही विशिष्ट प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहाते. प्रत्यक्षात साकार झालेले यंत्रमानव वेगळेच आहेत. हाँगकाँगच्या जेम्स हॅन्सन या वैज्ञानिकाने निर्माण केलेली सोफिया थोडीफार मानवी खुणा अंगाबांध्यावर बाळगते; पण बाकीचे प्रगल्भ यंत्रमानव अजूनही आपल्या तारा-वायरींच्या भेंडोळ्यांचे प्रदर्शन करताना दिसतात. अर्थात माहितीच्या प्रचंड साठ्याच्या जोरावर प्रश्नकर्त्याचे समाधान करण्याची क्षमता त्यांच्याठायी असतेच.
सोफिया ही यंत्रकन्या तर संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाची राजदूत ठरली आहे. मानवी वर्तनशास्त्र कोळून प्यायलेली ही यंत्रयौवना हसते, नाटकीय ढंगाने संवाद साधते. पोर्ट्रेटदेखील काढते. काही देशांनी तिला नागरिकत्व बहाल केले आहे. एकाकी ज्येष्ठ नागरिकांची मदतनीस म्हणून तिचा जन्म झाला होता. पण एकेका रोबोचे नशीब असते! अर्थात असले ‘मदतनीस’ सध्या तरी भलतेच महागडे आहेत. भविष्यात भराभरा कामे उरकणारी यंत्रमानवांची फौज मैदानात उतरली, तर वेगळेच चित्र दिसेल. तेव्हा हातांना काम मागणाऱ्यांच्या पोटार्थी नोकरदारांचे काय होणार? हा प्रश्न राहतोच. त्यामुळे ‘आमच्यामुळे तुमच्या नोकऱ्या जाणार नाहीत’ हे पत्रकार परिषदेत मिळालेले ‘कृत्रिम’ उत्तर तितके पटणारे नाही.
यंत्रमानवांना विकार नाहीत, भावभावनांचे कल्लोळ नाहीत. त्यामुळे ते विशुद्ध ज्ञानाचाच वापर करुन अचूक निर्णय घेतील, असा आता शास्त्रज्ञांचाच नव्हे, तर खुद्द यंत्रमानवांचाच दावा आहे. अजूनही यंत्रमानव माणसासारखा दिसू शकत नाही. माणसाच्या वर्तन-व्यवहारातली सहजता त्याच्यात आलेली नाही, पण मानवी मेंदूपेक्षा एक जबरदस्त शक्ती त्याच्याठायी आहे.- ती म्हणजे अफाट माहिती आणि त्याचे क्षणार्धात विश्लेषण करुन सतत प्रगल्भता वाढवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता. अर्थात सावधपण मुरलेला मानवी मेंदू तरीही त्याच्यापेक्षा चार अंगुळे सरसच आहे.... सध्यातरी!
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.