रामदास केळकर
Goan Literature : बरेचदा एखादा नामवंत साहित्यिक गोव्यात कुठल्या तरी संस्थेच्या निमंत्रणावरून आला की, मुलाखतकारांची चांगलीच सोय व्हायची. कारण अनायासे त्या साहित्यिकाला भेटणे व्हायचे. अन्यथा, आम्ही पोहोचूच असे नाही. मराठी साहित्यिकांचे सोडा पण दूरच्या आसाममधील एखादी साहित्यिक आली तर चांगलाच योग म्हणायला हवा. अशा नामवंत, ज्ञानपीठ तसेच अनेक प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित असलेल्या लेखिका इंदिराजी गोस्वामी यांची भेट झाली. त्यानंतर गोहाटीत त्यांचे निधन झाले 2011मध्ये.
विशेष म्हणजे या लेखिकेचा जन्मही नोव्हेंबरमधला आणि मृत्यूही नोव्हेंबरमध्ये झाला. बऱ्याच दिवसांनंतर त्यांचे साहित्य वाचनात आले. यामध्ये ‘अर्धीमुर्धी कहाणी’ हे अर्चना मिरजकरांनी मराठीत अनुवाद केलेले पुस्तक हाती लागले आणि या लेखिकेच्या भेटीची आठवण झाली. अमृता प्रीतम यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिलेली आहे. अर्थात सर्व काही भेटीत सांगायला ऐकायला मिळाले, असे नाही पण त्यांचे साहित्य मात्र आवर्जून वाचले.
मामोनी रायसम गोस्वामी हे त्यांचे नाव. त्यांनी भोगलेले कारुण्यमय जीवन, आलेले अनुभव यांची सांगड त्यांच्या आत्मचरित्रामध्ये वाचायला मिळते. जिज्ञासूंनी जरूर वाचावे. वडिलांचा मृत्यू ही एक अपरिहार्य अशी घटना असते. पण आत्महत्या करणे, पती निधन होणे अशा कित्येक दुर्घटना तिच्याबाबतीत घडल्या. अर्थात भेटीत त्यांनी हे सांगितले नाही आणि ती पहिली भेट होती ना! साहित्याबद्दलच जास्त बोलणे झाले. त्यांनी एक सांगितले की, ‘तुमचा जेवढा अनुभव दांडगा असेल तेवढी तुमची रचना खोल होते’.
चहापान झाल्यानंतर त्यांचे पुरस्काराने सन्मानित पुस्तक नजीकच्या पुस्तकालयात मिळेल या आशेने त्यांना घेऊन रपेट केली, पण व्यर्थ. अर्थात आता निदान फ्लिपकार्ट अमेझॉनने पुस्तक मागवू शकता, तसेच स्थानिक पुस्तक विक्री चालविणारे तुम्हाला पाहिजे ते पुस्तक आणून देण्याची व्यवस्था करू शकतील. पण तेव्हा तसे काही नव्हते. पुस्तक मिळण्यासाठी निदान सप्ताहभर तरी वाट बघावी लागणार होती. अतिशय निराशेने आम्ही परतलो.
अशी पदरी निराशा येणे हा तर अनेकांना आलेला अनुभव. त्यामुळे खचून न जाणे ज्यांना जमले ते खरोखरच भाग्यवान. काहींना अडचणी येतात, प्रसंगी अपमान सहन करावे लागतात. पण जो फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उठून नव्याने सुरुवात करतो त्याला यशश्रीदेखील माळ घालून मोकळी होते. ‘अपयश ताकद असते’ असे अमेरिकन माणसांमध्ये म्हणतात. आपल्याकडे एखादा कोणी बेकार उमेदवार सापडला तर तो नोकरीसाठी वणवण भटकेल, पण स्वतःचा लहान का होईना व्यवसाय सुरू करणार नाही. कारण त्यात धोका असतो तोही अपयशी होण्याचा . आता यात थोडाफार बदल होत आहे हे सुचिन्ह.
एकदा असाच महाबळेशवरला गेलो होतो. तिथे मेणबत्तीचा (सनराईज मेणबत्ती) व्यवसाय करणारे व अंध मंडळींना रोजगार देणारे श्री. भावेश भाटिया हे व्यावसायिक चक्क दृष्टिहीन असल्याचे समजले. पूर्वी ते एका हातगाडीवर मेणबत्ती विक्रीचा व्यवसाय करत. आता तेच मोठे व्यावसायिक झाले आहेत. ते मेहनतीच्या जोरावर. भेटायची इच्छा होती पण व्यग्र वेळापत्रकामुळे ते जमले नाही. पण अलीकडे त्यांचे मराठीतील पुस्तक वाचायला मिळाले (रुक जाना नही अनु सुप्रिया वकील ) एक प्रकारची तो यशोगाथा आहे त्यांच्या शेरो शायरीनेदेखील प्रेरणा मिळण्यासारखी आहे
शब्दोके समशेर चलाता हूं मै
पानीसे तसवीर बनाता हूं मै
कायर है वो जो किस्मतकी बात करते है
अरे किस्मतकी तो खुद तसवीर बनाता हूं मै
सर्वांना त्यातून प्रेरणा मिळू शकेल. त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने तीन वेळा सन्मानित करण्यात आले आहे. या प्रसंगांना सामोरे जाणाऱ्या व त्यात यश मिळविणाऱ्यांचे म्हणूनच मला कौतुक तर आहेच, शिवाय उत्सुकताही. जर त्यांना हे जमू शकते तर तुम्हा आम्हाला का नाही? हा प्रश्न छळत असतो. अशीच भेट इंग्रजी लेखक मसुरीला स्थायिक झालेले रस्किन बॉण्ड यांची. त्यांची ‘द रूम ऑन द रूफ’नंतरची साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ‘अवर ट्रीज स्टील ग्रो इन डेहरा’. पद्मश्री व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित शेकडो कथा लिहिणारे. ‘रस्टी’ हे त्यांचे प्रसिद्ध पात्र. त्यांनी ६९ पुस्तके लहान वाचकांसाठी प्रसिद्ध केली. ते मसुरीला राहतात. त्यांचे आत्मचरित्र ‘सीन्स फ्रॉम अ रायटर्स लाइफ’, ‘लॅम्प इज लिट लिव्हस फ्रॉम अ जर्नल’ वाचण्यासारखे आहे ते वाचून जेव्हा दौऱ्यामुळे इथे पोचलो तेव्हा त्यांची एका पुस्तकविक्रेत्याकडे आवर्जून चौकशी केली, पण शक्य झाले नाही. त्यांचे साहित्य मात्र त्यांच्याकडे विकत मिळाले.
विशेष म्हणजे त्यांचे काही साहित्य मराठीमध्ये आहे, उदा. ‘देवदारांच्या छायेतला मृत्यू’, ‘बोगद्यातला वाघ’ व ‘आत्मरंगी’ हे आत्मचरित्रदेखील आहे. एक दोन दिवसांनंतर ते भेटू शकणार होते पण मसुरीला तेवढे दिवस थांबणे शक्य नव्हते. एक मात्र खरे की या साहित्यिकांकडे जीवनाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची दृष्टी होती व आहे. म्हणूनच ते आपल्या क्षेत्रात वेगळी उंची गाठणारे ठरले. म्हणून तर ते इतरांना प्रेरणा देतात. निसर्गातील बरेच घटक आपल्याला प्रेरणा देतात, पण जीवनात माणसेदेखील देतात. आपण त्यांना बोलते करायला हवे किंवा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायला हवा. अनेक असे साहित्यिक आहेत जे आपल्याला नक्कीच प्रेरणा देऊ शकतात त्यांच्या लेखनातून ही प्रेरणा मिळू शकते हे जरी खरे असले तरी प्रत्यक्ष भेटण्यातला अनुभव वेगळाच असतो, दृष्टी देण्याचा...
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.