Goa Culture : गोव्यात काळ्याकुट्ट रात्रीच्या अंधारात पार पडणारा 'बनीरबाब विधी' माहितीये का?

बंदर आणि घाट मार्गाशी जोडणारा दुवा म्हणून त्यामुळे साखळी शहराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले.
Natural Heritage
Natural HeritageDainik Gomantak
Published on
Updated on

राजेंद्र पां. केरकर

आज डिचोली तालुक्यातले एक नगरक्षेत्र म्हणून साखळी विकसित होत असली तरी गेल्या कित्येक शतकांपासून हे गाव शहराचा लौकिक मिरवत होते. जोगाड्याची हाळी, वरची हाळी, बाजारपेठ... अशी येथील स्थळनामे एकेकाळी साखळी शहर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्टीने किती महत्त्वपूर्ण होते, त्याची प्रचिती देत असतात.

गोवा सरकारने या शहराचे महत्त्व वृद्धिंगत करण्यासाठी कोणतेच ठोस प्रयत्न केले नसल्याने, मध्यंतरी इथे साखळी, हरवळे आणि विर्डी या तिन्ही गावांचा समावेश ग्रामपंचायत क्षेत्रात केलेला आहे.

परंतु आज साखळी नगरपालिका कार्यरत असली तरी या शहराच्या शाश्‍वत विकासाचा आराखडा मूर्तस्वरूपात आणण्याचे ठोस प्रयत्न झालेले नसल्याकारणाने, इथे झपाट्याने सिमेंट- क्रॉंक्रीटच्या इमारती मोठ्या प्रमाणात उभ्या राहत असून कचरा सांडपाणी यांच्या व्यवस्थापनाचा मुद्दा अनुत्तरित आहे. ‘व्हाळवट’ किंवा ‘वाळवंटी’ नावाने परिचित असलेल्या जीवनदायिनी नदीची दुरवस्था झालेली आहे.

अशा पार्श्‍वभूमीवरती आषाढातल्या कृष्णपक्षातल्या दशमीला बनीरबाब विधी काळ्याकुट्ट रात्रीच्या अंधारात झाला. साखळीहून केरीला जाताना पर्ये गाव ओलांडला की वळणावळणाच्या रस्त्यावरच्या चढणीला शतकोत्तर परंपरा मिरवणारे सातविणाचे झाड असून, त्याच्या सावलीत जांभ्या दगडाच्या पठारावरती निराकार स्वरूपात वावरणाऱ्या रक्षणकर्त्याचे वास्तव्य आहे.

पर्ये, मोर्ले या दोन्ही गावांची जेथे सीमा भिडते तेथे छोट्या घुमटीचे बांधकाम करून ‘लपादर’ या अतर्क्य आणि नैसर्गिक शक्तीचे श्रद्धास्थान उभारण्यात आलेले आहे. लपादर हे दैवी शक्तीचे रूप लोकमानसाने पूर्वापार परंपरेने मानलेले आहे.

पूर्वीच्या काळी दुतर्फा मुख्य रस्त्याच्या जंगलसमृद्ध अधिवासात रात्री बेरात्री भुताखेतांचे जेव्हा भय सतावत होते, त्यावेळी भांबावलेली माणसे, ‘देवा लपादरा आमच्या घरी सुरक्षित पोहोचव’ अशी आर्तपणे साद घालायचे आणि ही शक्ती त्यांच्या साहाय्याला येते अशी लोकश्रद्धा रूढ होती.

प्राचीन काळी घाट माथ्यावर असलेल्या प्रदेशातून गोवा-कोकणात येण्यासाठी जे महत्त्वाचे घाटमार्ग होते, त्यात साखळी शहराला जोडणारे चोर्ला घाट, चांद सूर्या घाट (पारवड ते साटरे) केळघाट (कृष्णापूर मार्गे)महत्त्वाचे ठरले होते.

व्यापाऱ्यांचे तांडे, बैलगाड्या, घोडे पावसाळ्यानंतर प्रामुख्याने घाट माथ्यावरून गोवा कोकणात या पारंपरिक घाट मार्गातून खाली यायचे आणि तेथे असणाऱ्या बंदरांशी निगडीत जलमार्गाद्वारे होड्या, गलबतांतून आपला माल मागणी असणाऱ्या बाजारपेठेत न्यायचे.

त्यामुळेच व्यापार, उद्योगांशी निगडीत गोव्याच्याच नव्हे तर कोकण आणि घाटावरच्या प्रांतातून बंदराशी आणि घाटमार्गांना जोडणाऱ्या साखळी शहरात स्थायिक होण्यासाठी विशेष प्राधान्य द्यायचे.

त्यामुळे साखळी आणि परिसरातल्या गावांत ही मंडळी स्थिरावली होती. बंदर आणि घाट मार्गाशी जोडणारा दुवा म्हणून त्यामुळे साखळी शहराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. भक्ती परंपरेशी स्नेहबंध ठेवणाऱ्या इथल्या वारकरी संप्रदायाशी जेव्हा व्यापारी, यात्रेकरू, भाविक जोडले गेले, तेव्हा श्रीविठ्ठल, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्या पाषाणी मूर्तींची प्रतिष्ठापना करून साखळी शहराच्या नदीपल्याड असणाऱ्या कारापुरात मंदिराची स्थापना करण्यात आली. श्रीविठ्ठल मूर्तीच्या स्थापनेमुळे कारापुरातला मारुतीगड, विठ्ठलापूर म्हणून नावारूपास आला.

श्रीविठ्ठलाची स्थापना नदीपल्याड झाली असली तरी या दैवताशी पूर्वापार धार्मिक, सांस्कृतिकच नव्हे तर सामाजिक अनुबंध इथल्या नाना जातीजमातीतल्या लोकमानसाने निर्माण केले होते. त्यानंतर साखळीत श्रीदत्त आणि श्रीराधाकृष्ण मंदिराची स्थापना करण्यात आली.

परंतु असे असले तरी शेकडो वर्षांपासून निसर्गाच्या कणाकणात वास करणाऱ्या लपादरासारख्या शक्तीच्या अस्तित्वाला मानणाऱ्या लोकमनाने, त्यांच्या विषयीचा आदर आणि भक्तिभाव व्यक्त करण्यासाठी विविध विधी, परंपरा, उत्सव यांची सांगड घातली.

घाटमार्गातून अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करत आणि भुताखेतांच्या परंपरेने निर्माण झालेल्या भयाने मार्गक्रमण करताना लपादराचा केला जाणारा धावा त्यांच्या मनाला उभारी द्यायचा. कधी प्रतिकूल परिस्थितीशी लढत असताना, आपणाला त्यातून मार्ग मिळतो, तो लपादराच्या कृपेने अशी लोकांची धारणा व्हायची.

साखळी बंदरातून माकडशेणोला वळसा घालून वाळवंटी नदी वजरीतून कारापूर आणि तेथून पिळगावात डिचोलीशी एकरूप होऊन सारमानसला मांडवीत समर्पित व्हायची. साखळी शहरातून जाणारा जलमार्ग मांडवीच्या मुख्य प्रवाहाशी पिळगावात एकात्म व्हायचा. त्यामुळेच साखळी येथील दूरवरच्या व्यापारी, उद्यमशीलवंतांनी बाजारपेठ गजबजलेली असायची.

Natural Heritage
रस्त्यावर वाहन उभे करून प्रवाशांना शिवीगाळ, दाबोळी विमानतळ परिसरात युवकांकडून दहशत

घाटातून आणि मग बंदरातून होणारा आपला प्रवास निर्विघ्न होण्यासाठी लपादराची कृपा कारणीभूत होती अशी लोकधारणा आली होती. त्यामुळे लपादराच्या अदृश्य रूपाचा वावर जेथे जेथे असल्याची लोकांना प्रचिती आली तेथे तेथे त्याच्या अस्तित्वाची खूण म्हणून घुमट्याची निर्मिती झाली.

साखळी देसाईनगर येथील जांभ्या दगडांनी युक्त पठारावरती जाण्यापूर्वी जी नैसर्गिक गुंफा आणि भुयार अस्तित्वात आहे. तेथे लपादराचा वावर असल्याचे मानून आज त्या जागेला धार्मिक-सांस्कृतिक अधिष्ठान प्राप्त झालेले आहे.

आपण केलेल्या नवसानुसार इच्छापूर्ती झाल्यावरती भाविक फुले, केळी अर्पण करण्यासाठी या जागी येतात. परंतु असे असले तरी दर दोन वर्षानंतर साखळी शहराबरोबर गावठण, पर्ये आणि कारापूर येथील भाविकांतर्फे ‘बनिरबाब’ विधीचे आयोजन केले जाते.

सप्तशतीभूमिका देवीचा जो पारंपरिक मांड साखळी बाजारपेठेत आहे, तेथे मानकऱ्यांना वडे, चण्यारोस, भाजी यांचे विशेष शाकाहारी जेवण दिले जाते.

Natural Heritage
Digital Payment : महत्वाची बातमी ! राज्य सरकारचा ‘पेटीएम’शी करार, आर्थिक व्यवहार ‘कॅशलेस’ करण्यावर भर

त्यानंतर ‘बनिरबाब’च्या विधी उत्सवाला पर्ये, गावठण आणि कारापूरच्या गावकऱ्यांच्या उपस्थितीत प्रारंभ होतो. पर्येची भूमिका गावठणची सांतेर-केळबाय, कारापूरची शांतादुर्गा आणि परिसरातल्या समस्त लोकदैवतांबरोबर श्री विठ्ठल, श्री दत्तात्रय, श्री राधाकॄष्ण आदींना मानसन्मान देऊन गार्‍हाणे घातले जाते.

पारंपरिक लोकवाद्यांच्या वादनात लपादर, तोणयो, म्हारींगण आदींचे अवसर प्रवेश करतात. बावीस ठिकाणी पान विड्याचा, तर काही ठिकाणी पशुहत्या समर्पित केली जाते. बनिरबाब विधीसाठी जो बकरा बळी द्यायचा असेल, त्याच्या गळ्यात पटकोळणीचे कळे घालतात तेलतुपाने भिजलेल्या कापसाच्या वातीने पेटलेले मातीचे विशेष भांडे म्हणजे ‘आकटे’ धारण करून ढोलवादनाद्वारे बनिरबाबची मिरवणूक अवसराच्या नेतृत्वाखाली सप्तशती मांडावर सुरू होऊन, ती वरची हाळी, दत्तवाडी, ख्रिश्‍चन दफनभूमीमार्गे लपादराच्या गुंफेकडे जाते.

मुस्लीम वाड्यावरती मेणकुम्याच्या वृक्षाठायी असणाऱ्या बाबरो आणि बाबुल पीराचा मानसन्मान करून या मिरवणुकीचा समारोप देसाईवाड्यावरच्या गुंफेकडे होतो तो बकऱ्याचा बळी देऊन.

Natural Heritage
Konkan Railway: धावत्या कोकण रेल्वेत सोने चोरी प्रकरण: सांगलीतून आणखी दोघांना अटक

मिरवणुकीवेळी वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने आकट्यावरच्या पेटणाऱ्या वाती, बकऱ्याच्या शिंगाना बांधलेले दोन काकडे यांचा प्रकाश केवळ लोकांना लपादराच्या गुंफेकडे येण्यास मदत करतो, वारंवार उद्भवणाऱ्या वाळवंटीच्या पुरासारख्या आपत्तीबरोबर अनेक प्रश्‍नांच्या संदर्भात आपापल्या भौगोलिक परिस्थितीनुरूप आणि उदरनिर्वाहाच्या प्राप्त गोष्टीनुसार मार्ग शोधून काढण्यात येत असतात व दरवेळी नवीन प्रयोग करून पाहण्याऐवजी अनुभवाने समाधानकारक ठरलेल्या व सरावात असलेल्या गोष्टींचा वापर केला जातो.

नाना विधी आणि अनाकलनीय रीतीरिवाजांनी संपन्न होणारा ‘बनिरबाब’ लोकमानसानी जतन केलेल्या पारंपरिक भावविश्‍वाचे दर्शन घडवतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com