Restaurant: नव्या चवीचे नवे ठिकाण ‘ओ कामोतीम’

दोना पावला सर्कलला काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या ‘ओ कामोतीम’ मध्ये जाणे झाले
Restaurant
RestaurantDainik Gomantak
Published on
Updated on

मनस्विनी प्रभुणे-नायक

Restaurant गेल्या आठवड्यात आनंद साजरा करावा, अशी दोन तीन निमित्ते हाताशी होती पण संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे कुठे बाहेर जावेसे वाटत नव्हते. पावसाळी हवेमुळे आळसदेखील भरला होता. ‘कुठेतरी बाहेर जेवायला जाऊ या’, असे घरातील सगळ्यांचे ठरले.

या कोसळणाऱ्या पावसात खूप दूर जायचे नाही, यावर सगळ्यांचे एकमत झाले. मग लक्षात आले की, दोना पावला सर्कलला काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या ‘ओ कामोतीम’ मध्ये जाणे झालेले नाही. मला यावर लिहिता येईल हा बहाणादेखील लागू झाला.

दोना पावला सर्कलला पोलीस स्टेशनच्या मागे एक छोटासा रस्ता आहे जो ‘हवाई बीच’कडे जातो, याच रस्त्याच्या सुरुवातीला डाव्या हाताला ‘ओ कामोतीम’ रेस्टोरंट आहे. तिथे दारात पोहोचताच पाहिल्यांदा लक्ष वेधून काय घेत असेल तर ‘ओ कामोतीम’ या नावाखाली ‘१९५२’, असे लिहिले आहे आणि हे वाचताना ‘अरे हे इतके जुने रेस्टोरंट आहे पण आपल्याला माहीत नाही !’ असा आपला समज होऊन जातो. आपण त्याच प्रभावाखाली रेस्टोरन्टमध्ये शिरतो. हे ‘१९५२’ मात्र डोक्यात तसेच राहते.

प्रॉन्स स्टफ पापड आणि प्रॉन्स डांगर या रेस्टोरन्टमध्ये शिरताच भिंतीवर काढलेले ‘चारकोल पेंटिंग’सारखे वाटणारे घराचे चित्र आकर्षित करून घेते. सजावट अतिशय साधेपणाने केली आहे हे लगेच जाणवते. आमच्या शेजारच्या टेबलवर आमच्यासारखेच कशाचे तरी ‘सेलिब्रेशन’ करायला आले होते.

या रेस्टोरन्टमध्ये पहिल्यांदाच आलो असल्यामुळे आधी मॅनेजर बोलावून त्यांचे वैशिष्ट्य काय आहे हे जाणून घेतले. त्यांच्याकडूनच समजले की, दर्शन कामत हे ‘ओ कामोतीम’चे मालक आहेत. मॅनेजरने सुचवल्याप्रमाणे आम्ही सुरुवातीला प्रॉन्स स्टफ पापड आणि प्रॉन्स डांगर ऑर्डर केले. सध्या प्रॉन्स स्टफ पापड हे सर्वत्र लोकप्रिय आहे.

Restaurant
देवचारांची टेकडी कामातुरांनी व्यापली

हे बनवण्याची प्रत्येक रेस्टोरंटची पद्धतदेखील वेगळी आहे. थोड्याशा रेषाद मसाल्यात कांदा -टोमॅटो-कोथिंबीर यांच्यासोबत सुंगटे छान शिजवून ते पापडाच्या रोलमध्ये भरून त्या रोल केलेल्या पापडाला बाहेरून ब्रेड स्क्रम लावून खरपूस तळून सर्व्ह करतात.

पापडाचा कुरकुरीतपणा आणि प्रॉन्सचा मऊपणा यांचे एक वेगळेच मिश्रण त्यात तयार झाले. प्रॉन्स डांगरदेखील चविष्ट होते. या दोन्ही पदार्थांसोबत दिलेल्या पुदिना-कोथिंबीर चटणीमुळे या पदार्थांची चव अधिक वाढली. प्रॉन्स ताजे असल्यामुळे पापडातील स्टफ अधिक रुचकर झाले होते.

मटण चॉप्स

आमच्या मित्रमंडळींच्या गटातले अनेकजण मटणाचे चाहते आहेत. खास मटण खाण्यासाठी ते अधूनमधून कोल्हापूरला पन्हाळ्याला जातात. गोव्यात तसे ताजे मटण मिळत नाही, असे या सगळ्यांचे म्हणणे असते. आम्ही स्टाटर्स खात असताना ‘ओ कामोतीम’चे मालक दर्शन कामत तिथे आले.

त्यांनी ‘मटण चॉप्स’ खाऊन बघा ती आमची ‘खास डिश’ आहे, असे त्यांनी सांगितले. मग काय आमची सगळी मंडळी खूष. मी मटण खात नाही, त्यामुळे त्याची चव कशी होती हे सांगणे माझ्यासाठी कठीण आहे पण एकंदरीत ताव मारून खाणाऱ्या या मंडळींना विचारले तर ते सगळे खाण्यात इतके दंग होऊन गेले की त्यांच्याशी त्याक्षणी तुम्ही जगातला कोणताही महत्त्वाचा विषय काढला तरी त्यांनी आपले मत व्यक्त केले नसते.

Restaurant
वाणी कोण आहेत?

सांगण्याचे तात्पर्य एवढेच की, मटण चॉप्स चविष्ट होते. काळ्या मसाल्यात मॅरीनेट केलेले मटण चॉप्स व्यवस्थित शिजवून सर्व्ह केले होते. चॉप्सची सगळी मजा त्याच्या मसाल्यात आणि ताज्या मटणात असते. इथे दोन्ही उत्तम होते.

मटण खाणाऱ्या मंडळींनी मला या लेखात मुद्दाम ‘मटण चॉप्स’चा उल्लेख कर असे आणि लोकांना हे मुद्दाम खाण्यासाठी सुचवा म्हणून सांगितले. या सर्व मंडळींकडून ‘ओ कामोतीम’मधल्या मटण चॉप्सला पाच पैकी पाच स्टार मिळाले आहेत यावरून तुम्हांला मटण चॉप्स किती चवीने खाल्ले जात असतील याची कल्पना येईल.

याशिवाय दुपारी मिळणारी फिशकरी राइस थाळीदेखील तेवढीच चविष्ट असते. दर्शन कामत हे स्वतः खूप कल्पक आहेत. इथला मेन्यू त्यांनीच तयार केला आहे. इतका वेळ ‘१९५२’बाबत डोक्यात राहिलेल्या उत्सुकतेबद्दल न राहवून दर्शन कामत यांना विचारले.

Restaurant
महाकवी होमर

‘ओ कामोतीम रेस्टोरंट तीन चार महिन्यांपूर्वी सुरू झाले. १९५२ हे माझ्या वडिलांचे जन्म वर्ष म्हणून रेस्टोरंटच्या नावाखाली आम्ही त्यांचे जन्म वर्षदेखील घातलं’ असे दर्शन यांनी सांगितले. वडिलांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची दर्शन कामत यांची ही अनोखी पद्धत आहे.

‘ओ कामोतीम’ सुरू करण्यापूर्वी दर्शन कामत प्रसिद्ध सेलेब्रिटी शेफ संजीव कपूर यांचे ‘येलो चिली’ नावाचे रेस्टोरंट चालवत होते. ‘येलो चिली’ हे रेस्टोरंट म्हणजे संजीव कपूर यांनी खाद्यपदार्थांशी निगडित नव्याने सुरू केलेल्या वेगवेगळ्या उद्योगांचा एक भाग होते. पण कोरोनानंतर अनेक चढउतार आल्यामुळे त्यांनी हे रेस्टोरंट बंद केले.

इथूनच ‘ओ कामोतीम’ची पायाभरणी झाली. एक दरवाजा बंद झाल्याने सर्वच दरवाजे बंद होत नसतात. नव्या वाटेवर नेणारा नवा दरवाजा आपल्यासाठी उघडतोच. दर्शन कामत यांच्यासाठी ‘ओ कामोतीम’च्या रूपाने नवा दरवाजा उघडला.

दर्शन कामत हे ‘ओ कामोतीम’मध्ये नवनवीन संकल्पना राबवत आहेत आणि या सर्व कल्पना लोकांच्या पसंतीस उतरत आहेत, हे त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रतिसादावरून लक्षात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com