

मी भारतीय जनता पक्षाचा कट्टर विरोधक आहे, हे सर्वज्ञात व सर्वश्रुत आहे. त्यामुळे, गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांशी हितगूज करण्याचा नैतिक अधिकार मला नाही असा दावा हे कार्यकर्ते करू शकतात.
पण, ही गोष्ट माझ्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या कक्षेत येते, असे मी मानतो. गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांना पुराणातील श्रीकृष्ण - सत्यभामा आणि रुक्मिणीच्या पारिजात वृक्षाची कथा माहीत असेलच. सत्यभामेच्या अंगणात लावलेल्या पारिजाताची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडत असत.
भाजपच्या अंगणातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी वाढवलेल्या पारिजाताची फुले काँग्रेसच्या अंगणात पडत असलेली आपण पाहतो आहोत. डॉ. प्रमोद सावंत सोडल्यास भाजपचे सर्व मंत्री पूर्वाश्रमीचे काँग्रेसमन आहेत. भाजप कार्यकर्त्यांना ही घाऊक पक्षांतरे मान्य आहेत का?
पक्षाचे ‘तृणमूल’ (तळागाळात) काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची आपल्या कामाचे चीज पक्षाने करावे अशी अपेक्षा असते. आपणही का नगरसेवक, आमदार, मंत्री, खासदार बनू नये असे त्यांना वाटते आणि त्यात गैर काहीच नाही. काँग्रेस पक्षातून होणारे प्रत्येक पक्षांतर भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय करते आणि त्यांची हक्काची संधी ते गमावून बसतात.
आज गोव्याचे प्रशासन ढासळलेले आहे. नोकरशहा मुर्दाड झाले आहेत. भ्रष्टाचार शिगेला पोचला आहे. अशावेळी प्रभू रामचंद्र आपल्याला तारून नेईल या भ्रमात भाजप नेते असतील तर त्यांच्या भ्रमाचा भोपळा भाजप कार्यकर्त्यांनी फोडायला हवा.
दस्तुरखुद्द इंदिरा गांधीच्या काळात चंद्रशेखर, मोहन धारिया ह्या तरुण तुर्कांचा पक्षांतर्गत दबाव गट श्रीमती गांधींवर नैतिक दबाव आणत असे. गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांनी असा पक्षांतर्गत दबावगट स्थापन करून मंत्र्यावर दबाव घालण्याचे तंत्र अवलंबले नाही तर इतिहास त्यांना क्षमा करणार नाही.
तळागाळातले भाजप कार्यकर्ते मूग गिळून परिस्थितीचे मूक प्रेक्षक (सायलंट स्पेक्टेटर) बनून राहिले तर सरकारला ते हवेच आहे. सत्ताधारी पक्ष व सरकार यांमध्ये सकारात्मक संघर्ष असणे आवश्यक आहे याचे भान भाजप नेत्यांना व कार्यकर्त्यांना असले पाहिजे.
जप अध्यक्ष सदानंद तानावडे कोणत्या आधारावर म्हणतात? विकसित भारत, विकसित गोवाच्या सरकारी खर्चाने केलेल्या सभेच्या प्रसिद्धीसाठी भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांची छबी (कटआउट) कशी लावण्यात आली?
ते खासदार आहेत म्हणून त्यांना हा मान दिला तर खासदार फ्रान्सिस्को सार्दिनचे कटआउट का नाही लावले? सभापती निःपक्षपाती असावा, अशी अपेक्षा असताना सभापती रमेश तवडकर भाजपच्या राजकीय व्यासपीठावर का लुडबूड करतात? आपले सोनेरी मौन सोडून भाजप कार्यकर्त्यांनी या प्रश्नांचा जबाब नेत्यांना विचारला पाहिजे.
डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला प्रशासन हे एका प्रकारचे (इव्हेन्ट मॅनेजमेंट) आहे, असे वाटते. गोव्यात प्रत्येक उपक्रमाला या (इव्हेन्ट मॅनेजमेंट) कंपनी भरमसाट पैसे देऊन कंत्राटे घेतात. गोव्याच्या प्रशासनाचे घाऊक कंत्राट पुढे मागे एखाद्या महत्त्वाकांक्षी (इव्हेन्ट मॅनेजमेंट) कंपनीने घेतल्यास नवल नाही!
लोकमान्य टिळकामध्ये ब्रिटिश सरकारला ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असा जाहीर जाब विचारण्याचे धारिष्ट्य होते.
’गोवा सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ हा प्रश्न विचारण्याचे धाडस भाजप कार्यकर्ते दाखवतील काय?
गोव्याच्या राज्यकर्त्यांचे व भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष मला एका संस्कृत सुभाषिताकडे वेधायचे आहे.
सुलभा पुरुषा राजन् सततं प्रियवादिन:।
अप्रियस्यच पथ्यस्य वक्ता श्रोताच दुर्लभ: ॥
हे राजा, नेहमी गोड बोलणारे (तुमची खुशमस्करी करणारे) लोक खूप असतात. अप्रिय पण पथ्यकारक (तुमच्या हिताच्या) गोष्टी तुम्हांला सुनावणारा वक्ता व त्या ऐकणारा श्रोता दुर्मीळ असतो.
भाजपच्या कार्यकर्त्यांपैकी काही जण माझे हितगूज वाचून क्षुब्ध होतील, प्रक्षुब्ध होतील, माझ्यावर रागावतील व याला ‘बुद्द’ (धडा) शिकवायला हवा असेही मनोमन म्हणतील.
पण बहुसंख्य भाजप कार्यकर्ते डोके थंड ठेवून हे हितगूज ऐकतील, अंतर्मुख होतील, कार्यप्रवण होतील, ह्या हितगुजामागील प्रस्तुत लेखकाची कळकळ त्यांच्या काळजापर्यंत पोहोचेल व प्रस्तुत लेखकाने आपल्या मनातील भावनाच व्यक्त केली आहे असे त्यांना वाटेल अशी मला आशा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.