Goa BJP: मडकईकरांचे 'बोल' काय दर्शवितात?

BJP: भाजपमध्ये जाणे म्हणजे आत्महत्या करणे असे म्हणून नुकतेच भाजप प्रवेश केलेल्या आठ आमदारांची जी खिल्ली उडवली, ती मात्र न पटण्यासारखीच वाटते.
Goa BJP | Pandurang Madkaikar
Goa BJP | Pandurang MadkaikarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: पांडुरंग मडकईकरांचा राजकीय प्रवास खऱ्या अर्थी सुरू झाला तो 2002 साली. त्यावर्षी ते कुंभारजुवेतून मगोपच्या उमेदवारीवर निवडून आले. त्यावेळी मगोपचे फक्त दोनच आमदार निवडून आले होते. एक मडकईचे सुदिन ढवळीकर व दुसरे हे कुंभारजुवेचे मडकईकर. पण मडकईकर जास्त दिवस मगोपमध्ये टिकले नाहीत.

त्यांनी लगेच भाजपमध्ये उडी घेतली. आणि 2004 साली केंद्रात झालेल्या सत्ताबदलानंतर 2005 साली मडकईकरांनी काँग्रेसला जवळ केले. म्हणजे 2002 ते 2007 या पाच वर्षांत मडकईकरांनी तीन पक्ष बदलले. नंतर 2007, 2012 साली ते काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले. 2012 साली खरेतर राज्यात काँग्रेसची वाताहात झाली होती.

Goa BJP | Pandurang Madkaikar
India Politics: 'भारत जोडो'चे नेमके उद्दिष्ट काय?

अभेद्य वाटणारे गड ढासळले होते. गृहमंत्री रवी नाईक, साबांखा मंत्री चर्चिल आलेमावसारखे रथी-महारथी या निवडणुकीत कामाला आले होते. फक्त नऊच आमदार निवडून आल्यामुळे राज्यात काँग्रेसची अक्षरशः ससेहोलपट झाली होती. पण यातही टिकले होते ते मडकईकर. ते त्यावेळी तब्बल साडेचार हजार मताधिक्यांनी निवडून आले होते. यातून त्यांचे कुंभारजुवा मतदारसंघावर असलेले वर्चस्व प्रतीत होते.

नंतर निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्‍ये शिरले. आणि 2017 साली निवडूनही आले. पण त्यानंतर त्यांची पडझड सुरू झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या कामावर मर्यादा आल्या. त्यात परत श्रीपाद नाईक पुत्र सिद्धेश हे डोके वर काढायला लागल्यामुळे त्यांची अधिकच कुचंबणा झाली. त्यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनाही शिंगावर घेण्याचा प्रयत्न केला. सिध्देश यांचे वजन कमी करण्याकरिता त्यांनी बरेच डावपेचही खेळले. पण सिद्धेश जिल्हा पंचायतीत निवडून आलेच.

Goa BJP | Pandurang Madkaikar
Blog : हवाई वाहतूक व्यवसायाची भरारी

आता विधानसभा निवडणुकीची उमेदवारी सिद्धेशला की मडकईकरांना असा प्रश्‍न निर्माण झाला. पण भाजपश्रेष्ठींनी कौल मडकईकरांच्या बाजूने दिला. मडकईकरांना जरी उमेदवारी दिली नसली तरी त्यांच्या पत्नी जेनिता यांना भाजपने रिंगणात उतरविले. मात्र, जेनिता मडकईकरांचा काँग्रेसच्या राजेश फळदेसाईंकडून पराभव झाला.

साधारण 1500 मताधिक्यांनी जेनितांचा पराभव झाला. त्यानंतरच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मडकईकरांच्या कन्येचाही पराभव झाला. त्यात परत आता राजेश फळदेसाईंनी भाजपमध्ये उडी मारल्यामुळे मडकईकरांची बरीच गोची झाल्याचे दिसते आहे. आणि ते साहजिकच आहे. जेव्हा एखादा नवा आमदार भाजपमध्ये शिरतो तेव्हा जुन्यांची कुचंबणा होणे हे अपरिहार्यच असते.

Goa BJP | Pandurang Madkaikar
Blog : जाणत्यांचा सन्मान करुया

शिवोलीचे दयानंद मांद्रेकर, साळगावचे जयेश साळंगावकर व दिलीप परूळेकर तसेच मुरगावचे मिलिंद नाईक यांनाही सध्या याचा अनुभव येत आहे. यामुळे मडकईकरांचे तप्त होणे हे ठरलेलेच होते. आणि याच नैराश्‍यापोटी त्यांनी हे उद्‍गार काढले असावेत असे वाटते. पण हे उद्‍गार काढताना आपणही बऱ्याच वेळा पक्षांतर केले होते, याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत असे दिसते.

भाजपमध्ये जाणे म्हणजे आत्महत्या करणे असे वाटत असेल तर त्यांनी ही आत्महत्या आधीच केली आहे यात शंकाच नाही. एखाद्या पक्षनिष्ठ व्यक्तींनी हे उद्‍गार काढले असते तर ते पटण्यासारखे होते. पण आजकाल असे पक्षनिष्ठ आमदार सापडणेच मुश्‍किल झाले आहे. त्यामुळे सध्या कोणाला दुसऱ्याकडे बोट दाखविण्याचा अधिकार आहे असे वाटत नाही.

Goa BJP | Pandurang Madkaikar
Construction: बांधकामशास्त्र आणि पर्यावरण

आता फळदेसाई आल्यामुळे मडकईकरांचे कुंभारजुवेतील वजन कमी होणार हे निश्‍चित आहे. फळदेसाई हे विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांना भाजपची पुढील उमेदवारी मिळूही शकते. हे पाहता मडकईकर दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात. पण भाजप हा सध्या केंद्रातही सत्तेवर आहे आणि त्यांच्याकडे प्रत्येक आमदारांच्या ‘फाईल्स’ तयार असतात हे विसरता कामा नये.

यामुळे सध्या तरी मडकईकरांना पक्षांतर करणे वाटते तेवढे सोपे नाही आणि मुख्य म्हणजे निवडणूका साडेचार वर्षे दूर असल्यामुळे हे पक्षांतर करून काही फायदाही होणार नाही मडकईकर हे जाणून आहेत. आणि त्यामुळेच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे एक गाजर फेकले आहे असे वाटते. यातून दिलजमाई होऊन काही पदरी पडले तर पडले अशी त्यांची भावना असू शकते.

Goa BJP | Pandurang Madkaikar
Goa Accident: अनंत साळकर यांच्यावर 'गोमेकॉत' उपचार सुरुच

त्यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मागितली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पण ती उमेदवारी त्यांना मिळेल असे बिलकूल वाटत नाही. विद्यमान मंत्री श्रीपाद नाईक यांची केंद्रात लॉबी असल्यामुळे त्यांना डावलणे सध्या तरी कठीण वाटते. श्रीपादांना डावलले गेले तरी त्यांच्या जागी मडकईकरांची वर्णी लागणे तर जवळजवळ अशक्यच.

हे पाहता राजकीय अज्ञातवासात गेलेल्या मडकईकरांचा हा सध्या अंधारातील तीर मारण्याचा प्रकार वाटतो. आता यातून मडकईकरांच्या हाती नेमके काय लागते आणि त्यातून त्यांचे अस्थिर झालेले राजकीय आसन स्थिर होते की काय याचे उत्तर लोकसभा निवडणुकीपूर्वीच मिळू शकेल हेच खरे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com