Blog : हवाई वाहतूक व्यवसायाची भरारी

गेल्या काही वर्षांत भारतातील हवाई वाहतूक उद्योगाचे भाग्य उजळलेले दिसते. हल्लीच आकाश एअर या कमी शुल्क आकारणाऱ्या नव्या कंपनीने या क्षेत्रात दिमाखदार प्रवेश केला आहे.
Airline Business
Airline BusinessDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. मनोज कामत

गेल्या काही वर्षांत भारतातील हवाई वाहतूक उद्योगाचे भाग्य उजळलेले दिसते. हल्लीच आकाश एअर या कमी शुल्क आकारणाऱ्या नव्या कंपनीने या क्षेत्रात दिमाखदार प्रवेश केला आहे. मुंबई, अहमदाबाद आणि कोचीसह देशातील महत्त्वाच्या हवाई मार्गांवर किफायतशीर दरात जागतिक दर्जाच्या सेवा देण्याचा वायदा कंपनीने केला आहे.

याच वर्षांत टाटा समूहाने 2.4 अब्ज डॉलर्सना एअर इंडियावर स्वामित्व मिळवले. एअर इंडियाच्या खासगीकरणाची बरीच वर्षे चाललेली चर्चा अशाप्रकारे संपुष्टात आलीय. याच दरम्यान जेट एअरवेजने नव्या नेतृत्वाखाली आपली कार्यवाही पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे. इंडिगो, गो एअर, स्पाइस जेट यांनी तर देशात चांगलेच बस्तान बसवले आहे.

भारतात नव्या एअरलाईन्सची घोषणा झाल्यास आता आठ वर्षांचा काळ उलटला असेल. उलटपक्षी गेल्या 20 वर्षांत 15 विमान कंपन्यांना गाशा गुंडाळावा लागला. असे असले तरी भारताकडे, जगातली शीघ्रगतीने वाढणारी विमानसेवेची बाजारपेठ म्हणून पाहिले जाते. अमेरिका, चीन आणि इंग्लंडनंतर आपला चौथा क्रमांक लागतो. संपूर्ण दक्षिण आशियाचा विचार करता भारतातील अंतर्गत हवाई वाहतुकीचे प्रमाण तब्बल 69 टक्के इतके म्हणजेच या भौगोलिक क्षेत्रांत अव्वल असेच आहे.

गेल्या पाच वर्षांत हवाई वाहतुकीचा वापर करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत तब्बल 250 टक्क्यांनी वृद्धी झालेली आहे. 2013 साली 6 कोटी प्रवाशांनी देशांतर्गत प्रवासासाठी विमानसेवेचा वापर केला होता तर 2021 साली ती संख्या 21 कोटींवर पोहोचली. याच कालावधीत विमानांची संख्या 400 वरून 700 वर पोहोचली. ही 75 टक्के वाढ झाली.

ही वाढ पाहता भारत 2024 अखेर इंग्लंडला मागे टाकून वैश्विक स्तरावर दुसरे स्थान पटकावेल, यात शंका नाही. भारतातील हवाई वाहतुकीत येत्या 20 वर्षांच्या कालावधींत 7 टक्क्यांची वृद्धी होईल, असे अनुमान बोईंग या कंपनीने काढले आहे. कोविडोपरांत काळात स्थिती पूर्वपदावर येण्याची गतीही अपेक्षेपेक्षा अधिक आहे.

भारतात केवळ विमान कंपन्यांची संख्या वाढली आहे असे नव्हे तर, या व्यवसायासाठी लागणाऱ्या साधनसुविधांतही स्तिमित करणारी वाढ अनुभवास येते आहे. 2013 साली देशात 74 विमानतळ होते, आज त्यांची संख्या 150वर गेली असून दुय्यम आणि तृतीय स्तरावरल्या शहरांतही विमानतळ उभे राहिले आहेत.

कोविडचे भंय संपलेले नाही तरी देशांतर्गत रोज 2500हून अधिक विमानोड्डाणांतून 3 लाखांपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक होत असते. विमानतळावरली सरासरी प्रवासी वर्दळ 6 लाख इतकी आहे. याशिवाय देशाबाहेर रोज होणाऱ्या 430 विमानफेऱ्या आणि देशात येणाऱ्या 450 विमानफेऱ्यांद्वारे दीड लाख प्रवासी येजा करतात. यांत येणाऱ्यांची सरासरी दैनंदिन संख्या 66 हजार तर देशाबाहेर जाणाऱ्यांची संख्या 80हजार आहे.

देशाच्या विमानसेवेतील आणखीन एक मानाचा तुरा म्हणजे महिला पायलटांची वाढती संख्या. हे चित्र नागरी विमान वाहतुकीसोबत देशाच्या हवाई दलातही दिसते आहे. एकूण पायलटांतले महिलांचे प्रमाण 12.5 टक्के असून ते प्रमाण आणि एकूणच भारतीय महिला पायलटांची संख्या विक्रमी आहे. भारतापाठोपाठ आयर्लंडचा क्रमांक (10 टक्के महिला पायलट) लागतो. अमेरिका (5.5 टक्के) आणि इंग्लंड (4.7 टक्के) हे प्रगत देश आपल्या कितीतरी मागे आहेत.

2030 पर्यंत विमानसेवेचा लाभ घेत प्रवास करणाऱ्यांची संख्या 40 कोटींना भिडेल, असा अंदाज आहे. तोपर्यंत देशातील विमानतळांची संख्या 220 होईल. मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकाता हे देशातील अव्वल विमानतळ असून त्यांना जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून पुरस्कार मिळत असतात. येत्या काळात हे क्षेत्र गतिमान वाढ अनुभवणार असून पुढील वीस वर्षांत 2300 विमानांची गरज देशाला भासेल. याच बरोबर हवाई मालवाहतुकीतही लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. 2016 ते 2022 या काळांत प्रतिकुलतेवर मात करीत हवाई मालवाहतुकीने कमालीची वाढ दर्शवली. भारतातील दिल्लीचा विमानतळ हा जगातला सर्वांत मोठा आणि सर्वांत व्यस्त असा विमानतळ. मोठा विमानतळ म्हटला की कोंडी आलीच. पण भारतीय विमानतळांनी उत्कृष्ट नियोजनाचा वस्तुपाठ घालून दिलेला आहे.

हवाई वाहतुकीत होणारी वाढ रोजगार प्रवर्तक असेल, यात शंका नाही. असे मानले जाते की या क्षेत्रातील रोजगार हा अन्य क्षेत्रांच्या तुलनेत 4.4 पटींनी अधिक उत्पादक असतो. त्यातून पर्यटनासारख्या अन्य व्यवसायांना चालना मिळते. 2028 साली, म्हणजे आणखीन सहा वर्षांनी हवाई वाहतूक भारतीय अर्थव्यवस्थेला एकहाती 500 अब्ज डॉलर्सचे उत्पन्न मिळवून देईल, असा अंदाज इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशन या संस्थेने व्यक्त केला आहे.

हवाई प्रवासाला मिळणारा वाढता प्रतिसाद विमान निर्माण, दुरुस्ती व देखभाल अशा क्षेत्रांना प्रचंड वाव प्राप्त करून देईल. एकटा देखभाल उद्योगच 2028 पर्यंत 2.4 अब्ज डॉलर्सच्या घरात जाईल, अशी ही संस्था सांगते. 2028 साली तो केवळ ८ कोटी डॉलर्सचा होता.

भारत सरकारच्या आकडेवारीनुसार आज हवाई वाहतुकीशी संलग्न क्षेत्रांतून अडीच लाख रोजगार उपलब्ध झालेले आहेत. यात पायलट, केबिन कर्मचारी, अभियंते, विमानतळावर आणि बाहेर व्यवस्था पाहाणारे लोक, मालवाहतूक हाताळणारे, सुरक्षाकर्मी, प्रशासकीय आणि विपणन कर्मचारी यांचा समावेश असून याव्यतिरिक्त अप्रत्यक्षरित्याही रोजगार मिळत असतो. पुढील दोन वर्षांत ही संख्या एक लाखाने वाढणार तर आहेच, शिवाय पुढील पाच वर्षांत अतिरिक्त दहा हजार पायलट्स लागतील.

वाढता कर्जाचा बोजा, अल्प नफा, सहजतेने कर्ज मिळण्यातील अडचणी, उच्च करप्रणाली आणि सुरक्षा या हवाई वाहतूक क्षेत्राला सतावणाऱ्या प्रमुख समस्या. कोविड महामारीमुळे गेली तीन वर्षे हवाई वाहतुकीवर झालेल्या अनिष्ट परिणामांतून कर्जाच्या थकबाकीची समस्या उद्भवलेली आहे. तूर्तास तीव्र स्पर्धेमुळे नफ्याचे प्रमाण जेमतेम 3 ते 4 टक्के इतकेच असते.

महामारीआधीही अनेक एअरलाईन्सना वित्तीय समस्या भेडसावत होत्याच. गतवर्षी या उद्योगाला पंचवीस हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले. आता तर विमानांसाठी लागणाऱ्या इंधनाच्या दरांत भरमसाट वढ झालेली असून तिचा परिणाम पूर्वपदावर येऊ पाहाणाऱ्या या उद्योगाला जाणवणारच आहे. यातून नफ्याची गणिते कोलमडण्याची शक्यता दिसते. अनेक राज्ये या सेवेवर 25 ते 30 टक्के विक्रीकर लावतात

इंधन दरवाढीबरोबर तो करही वाढणार आहे. शिवाय खासगी विमानतळांकडून प्रचंड भाडे आकारले जाते. यात भर पडते ती अमेरिकन डॉलरच्या तुलनेत होणाऱ्या रुपयाच्या अवमूल्यनाची. परदेशांत केली जाणारी देखभाल, यामुळे लीज करारांचे शुल्क वाढते. काही विमानसेवांना हल्लीच्या वर्षांत सुरक्षाविषयक समस्यांनी भेडसावलेले आहे. विमानात तांत्रिक दोष निर्माण होण्याच्या प्रकारांत वाढ झालेली आहे.

इतके असूनही आगामी काळांत हवाई वाहतूक क्षेत्रांतली स्पर्धा अधिकाधिक तीव्र होत जाणार आहे. तिला उत्तेजन मिळावे यासाठी भारत सरकारला सेवेवरला खर्चाचा बोजा अधिक वाढणार नाही आणि कंपन्याना गाशा गुंडाळावा लागणार नाही, याची खातरजमा करावी लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com