Goa: गोव्यात कलिकलहाचा कल्लोळ

Goa: गोव्याचा कोणताच संबंध नसलेले गोव्याबाहेरच्यांचे खून गोव्यात होतात.
Goa
GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa: गोव्याचा कोणताच संबंध नसलेले गोव्याबाहेरच्यांचे खून गोव्यात होतात. त्यासाठी गुन्हेगारीला येथील हॉटेल हा एक सोईचा व्हॅन्यू म्हणून सापडला आहे. कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार राज्यात सापडण्याचा गोव्याच्या पर्यटन क्षेत्राचा इतिहास आहेच.

भागवत हा भक्तिसांप्रदायाचा महत्त्वाचा आदीम ग्रंथ. त्याच्या प्रथम स्कंदातील परिक्षित राजाची कथा. राजाने कलीला नाखुषीने द्यूत, मद्य, लैंगिकता व क्रौर्य या चार क्षेत्रांत वावरण्यास मुभा दिली. त्यापुढे कलीने द्रव्य हे पाचवे क्षेत्र मागून घेतले. पहिली चार तशी बदनाम झालेलीच. पण पाचवे तसे बदनाम त वाटणारे सर्वांवर ताण करणारे, भल्याभल्यांना नादी लावणारे कलिकलहाचे निवासस्थान ठरले.

Goa
Wagro Konkani Film : गोव्याच्या 'वाग्रो'चा गौरवास्पद प्रवास

पणजी-एक कॅसिनोसिटी

कोणीही बाहेरील माणूस पणजीत आला तर त्याला या राज्याची राजधानी ही एक द्युतनगरीच वाटावी, असा येथील माहोल. शहराच्या प्रवेशद्वारावरच सर्वात प्रथम रस्ता चित्रावर उमटलेली जाणवते ती कॅसिनोची ठसठशीत नाममुद्रा. पणजीचा राजमार्ग म्हणजे नदीकाठचा मिरामार व काबो राजनिवासाकडे जाणारा रस्ता.

तो कॅसिनोनेच विकत घेतल्यागत अख्ख्या रस्त्यावर कित्येक किलोमीटरपर्यंत दुतर्फा पताका लावल्यागत कॅसिनोचे नामफलक जुगाराचा उत्सव घोषित करतात. त्याचबरोबर शहराचा मानदंड जी मांडवी नदी तिचा भव्य देखावा कॅसिनोने काबीज केला आहे. गांधी-नेहरूंच्या काँग्रेस सरकारने दिलेला हा वारसा देशाची संस्कृती, राष्ट्रीयता याचा होलसेल मक्ता घेतलेला पक्ष आता आपल्या कार्यकाळात तो वारसा जास्त दिमाखाने मिरवीत आहे!

काही कोटींचा महसूल मिळतो ना! हाच या देशात द्युताला राजमान्यता देण्याचा निकष. द्यूत हे समाजाला वाममार्गाने नेणारे आहे, देशातील धन अनुत्पादक नीतिभ्रष्ट कार्यांत गुंतवले जात आहे, या सगळ्याकडे तत्कालीन आर्थिक कायद्यासाठी काणाडोळा करणे सोईचे. त्याचे थोडे परिमार्जन जत्रेतल्या ‘गडगड्यांवर’छापे टाकून करता येते.

Goa
Blog: ब्रिटनमध्ये हुजुरांची हातघाई!

सुरवातीला कॅसिनोला गोव्यातील नितीदारकांचा विरोध झाला. पण त्याना सांगण्यात आले, की कॅसिनो हे दूर समुद्रात असतील. त्याला बाहेरचे टुरिस्टच जातील. गोवेकर जाणार नाहीत. मग कॅसिनो हळूच मांडवीत आला. उंट तंबूत कसा आला आणि तंबूचा ताबा कसा घेतला कळलेच नाही!

अमली पदार्थांचा स्वर्ग

कलीचा दुसरा प्रांत मद्य. ते तर गोव्यात केव्हापासून आहे. पोर्तुगिजांचा वारसा. बापूजींचा वारसा सांगणाऱ्यांनी तो केवळ जपलाच नाही तर अप्रत्यक्षपणे पुरस्कारलाही. पोर्तुगीजकालीन मद्यालयांच्या किती पटीत गोव्यात बार उभे राहिले! गावोगावी, शहरात, कोपऱ्याकोपऱ्यांवर, देवळांच्या प्राकाराला लागून, शाळांना खेटून, निर्जन जंगलात, प्रत्येक पर्यटनस्थळावर सर्वच बारसंस्कृतीची ‘तीर्थ’क्षेत्रे उभी आहेत.

‘पर्यटनाची गरज’या नावाखाली स्थानिक मद्यपींना प्रोत्साहन व बरबादीला निमंत्रण. गेली 40 वर्षे माझ्या घरांत 4-5 मोलकरणी काम करून गेल्या. सर्व गोव्याच्याच. तरूणपणीच दारू पिऊन नवरा मेला म्हणून त्यांच्यावर ही पाळी आलेली. हीच या सर्वांची शोकांतिका. माझ्या लहानपणीही दारू खुलेपणे मिळत होती. पण असे घडणे क्वचित.

Goa
Congress: आव्हानयुक्त काटेरी मुकुट

आता दारूचा दादा, अमली पदार्थ आला आहे. नव्हे तर हातपाय पसरून बसला आहे. गोवा हे अमली पदार्थांचे आंतरराष्ट्रीय केंद्र बनून राहिले आहे. हे याच वर्षभरात एकाच ठिकाणी १७ कोटींचे अमली पदार्थ पकडले गेले आहेत. यापूर्वी गेल्या काही वर्षांत गोवा सरकारची यंत्रणेकडून दीड कोटींच्या आसपास अमली पदार्थ पकडले जात होते.

पण या धंद्याला किंचितही बाधा आली नाही. कारण एकूण उलाढाल त्याच्या कितीतरी पटींत होती. काही वर्षांपूर्वी कॉलेज विद्यार्थ्यांच्या खिशांत आणि विद्यार्थिनींच्या पर्समध्ये या पदार्थांच्या पुड्या सापडल्याची बातमी होती. एक बरबाद पिढी हेच गोव्याचे भवितव्य ठरायचे आहे का?

कलिकलहचा तिसरा प्रांत लैंगिक स्वैराचार. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर वाघातोर-बागा बीचवरील तागड्या हिप्पींचा स्वैराचार हा देशातील आंबटशौकिणांचा एक आकर्षणबिंदू बनून राहिला होता. बायणा येथील वेेश्‍यागृहे बोटीवरील खलाशांची ‘भूक भागविण्या’साठी होती. आता तशी सर्वत्र चालत असल्याचे वृत्तपत्रातील बातम्यांवरून दिसते. पकडलेल्या तरुणी देशातील निरनिराळ्या राज्यांतून पुरविल्या जात असल्याचे दिसून येते.

Goa
Diwali 2022: अंदाच्या दीपावलीचे आनंदपर्व

त्यावरून या धंद्यासाठी ‘माल’ पुरविणाऱ्या यंत्रणेची पाळेमुळे देशभर पसरल्याचे दिसते. राज्यातील पुढाऱ्यांच्या ‘भानगडी’ही मधूनमधून चर्चिल्या जातात. या सॅक्स मार्केटचे गोवा हे एक केंद्र बनत आहे. पुढे राजरोसपणे नोंदणीकृत वेश्‍यागृहास सरकारने परवानगी दिल्यास आश्‍चर्य वाटू नये. त्यातून भरपूर नोंदणीशुल्क आकारून राज्याच्या तिजोरित द्रव्य येईल! पण सार्वत्रिक होत असलेल्या स्वैराचाराचे काय?

गोव्यातील एका प्रसिद्ध पत्रकाराने राज्याच्या किनारपट्टीत पसरलेल्या लैंगिक स्वैराचाराविषयी लिहिले आहे. तो म्हणतो किनारपट्टीतील कितीतरी गोवेकर तरुण गोऱ्या कातडीला भुलून रशियाचे (अनौपचारिक) जावई बनले आहेत. गोव्यात एड्‌स कोणत्या भागांत, वयोगटात व लोकगटांत पसरला आहे, यावरून ही लागण कुठवर पसरली आहे यावर प्रकाश पडेल.

क्रौर्य हा कलिकलहाचा चौथा स्तंभ. अनैसर्गिक मृत्यूंच्या बाबतीत पहिला नंबर लागत असणार तो रस्त्यांवरील अपघातांचा. त्यानंतर खुनांचा. अनैतिक लैंगिक संबंध व पैसा ही मुख्य कारणे. पैशाच्या व्यवहारांतील दगाबाजी, बेकायदेशीरपणे पैसा हडप करणे, पैशांचे काळे व्यवहार, चोरी-दरोडा, खंडणी वगैरे. गेल्या दशकात एक गोवेकर लिंगपिसाट स्थानिक तरुणींना फसवून त्यांचे पैसे-दागिने लूटून, अब्रू लुटून, खून करून खुलेआम हिंडत होता.

Goa
Goa Diwali 2022: ''दिवाळीचा फराळ अन् फराळाची दिवाळी''

दहाच्या आसपास ही कुकर्मे करूनही पकडला जात नव्हता. बहुतेक स्त्रियांचा खून त्यांच्याच दुपट्याने गळा आवळून केल्याचे आढळून आले होते. त्यावर एका राजकीय पुढाऱ्याने सांगितलेला उपाय - ‘तरुणींनी दुपट्टाच वापरू नये!’ गोव्याचा कोणताच संबंध नसलेले गोव्याबाहेरच्यांचे खून गोव्यात होतात. त्यासाठी गुन्हेगारीला येथील हॉटेल हा एक सोईचा व्हॅन्यू म्हणून सापडला आहे.

कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार राज्यात सापडण्याचा गोव्याच्या पर्यटन क्षेत्राचा इतिहास आहेच. शिवाय शांत-सुशेगाद (!) गोव्यातील नवीन पिढीत पसरत असलेली गुन्हेगारी हा एक चिंतेचा विषय आहे. एक दीड दशकांपूर्वी गोव्याच्या सुसंस्कृत घराण्यांतील तरुणांच्या एका कंपूने आपल्यातल्याच एक तरुणाचे खंडणीसाठी अपहरण नाट्य घडवून आणले आणि त्यात त्या तरुणाचा खून झाला.

त्याने अख्खा गोवा हादरला होता. कलिकलहाच्या कल्लोळांत पैसा, संपत्ती हे पाचवे क्षेत्र म्हणजे महाकल्लोळ आहे. त्याची चर्चा पुढील लेखात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com