लग्न हा संस्कार आहे, करार नाही

‘लग्न’ याकडे संस्कार म्हणून न पाहता करार म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन वाढलाय. यात आर्थिक बाबींना तर प्रचंड, नको इतके महत्त्व प्राप्त झाले आहे.
Marriage
Marriage Dainik Gomantak
Published on
Updated on

प्रसन्न शिवराम बर्वे

Marriage गेल्या लेखात आपण स्त्री-पुरुष ही रथाची दोन चाके असल्याची उपमा व पर्यायी जास्त जवळ जाणारी उपमा पाहिली. स्त्री पुरुषांना संसाररथाच्या दोन चाकांची उपमा देण्यामागे समानतेचे तत्त्व आहे. स्त्री व पुरुष समान आहेत, असे मानणे किंवा त्यांना एकमेकांच्या विरुद्ध वर्गसंघर्षाप्रमाणे उभारणे या विवाहसंस्था कमकुवत करण्याच्या अनेक उपायांपैकी एक उपाय आहे. कायदा हेसुद्धा प्रभावी शस्त्र म्हणून वापरले जाते.

एकाच देशाच्या दोन नागरिकांना एकाच बाबतीत दोन कायदे, दोन न्याय हे तर्कसंगत नाही व न्याय्यही नाही; पण आपल्या देशात हे चालते. लग्नाचे वय हे एकासाठी ‘मुलीला पाळी येणे’ हे असते, तर दुसऱ्यासाठी १८ ते २१.

लग्नासाठी वाढते वय ही एक वाढती समस्या आहे. शेतकरी, पौरोहित्य करणारे, ग्रामीण भागात राहणारे, पत्रकारितेत असलेले अनेक असे चांगले चांगले मुलगे आहेत, ज्यांच्या लग्नाचे वय कधीच उलटून गेले आहे. ‘मुलगा उशिरा घरी येतो’ या एका कारणासाठी माझ्या एका डिझाइनर मित्राचे लग्न अनेक वर्षे होत नव्हते.

‘आधी करिअर, मग लग्न’, हा विचार तितकासा बरोबर नाही. कारण, वैद्यकीयदृष्ट्या स्त्रीने तीस वर्षांपर्यंत माता होणे तिच्या आरोग्यासाठी हितकारक असते. त्यानंतर अनेक समस्या सुरू होतात. वेळेत लग्न होणे आवश्यक असते.

पण, ‘लग्न’ याकडे संस्कार म्हणून न पाहता करार म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन वाढलाय. यात आर्थिक बाबींना तर प्रचंड, नको इतके महत्त्व प्राप्त झाले आहे. मुलगा व मुलगी सवयी, आवडनिवड, स्वभाव वगैरेंना प्राधान्य न देता, ‘पॅकेज’ कितीचे आहे, ते पाहतात. पुन्हा आईवडील नको. मुलेही नकोत.

दोघांचे मिळून पाच लाख महिना कमावतात. पण, संसार व कुटुंब यांना ‘डिंक’(डबल इन्कम, नो किड्स) लागलेला. मग, एवढ्या पैशाचे करतात काय? दोघेही बाजारव्यवस्थेचे सर्वोत्कृष्ट ‘ग्राहक’ बनतात. ‘लग्न केलेच पाहिजे का?’, ‘लिव्ह इन’मध्ये राहिले तर काय होते?’, ‘स्त्रीला पुरुषाची आवश्यकताच नाही, अगदी मूल जन्माला घालायलाही.’, असे अत्याधुनिक विचार युवापिढीवर सातत्याने बिंबवले जातात.

व्यक्तिस्वातंत्र्याचे स्तोम इतके माजवले जाते की, ‘तडजोड करणे’ मूर्खपणाचे, दुय्यम असण्याचे व शोषित होण्याचे लक्षण मानले जाऊ लागले आहे. आपण व्यक्ती म्हणून आपल्यातच परिपूर्ण असतो, तर दुसऱ्या व्यक्तीचीच नव्हे तर समाजाचीही आपल्याला काहीच गरज उरत नाही.

आपण परिपूर्ण नाही, म्हणूनच तर आपल्याला जोडीदार हवा असतो. ‘फार झाल्या आता ओळखीपाळखी, एक व्यक्ती तरी आपली पाहिजे’, असे वैभव जोशी म्हणतात त्यामागे हीच भावना असावी.

Marriage
'नंदनवन’ ची रंगलेली पार्टी आणि रात्री हाडामांसाचा चिखल करणारा ‘किलर स्टेट’ मधील बाणस्तारीचा अपघात.... विश्लेषण

लग्न म्हणजेच आपलं असण्याची भावना आहे. एक व्यक्ती अशी असावी जिला आपले सर्व काही माहीत असेल, आपण कसे आहोत हे आतबाहेर माहीत असेल आणि तरीही ती कायम आपल्यासोबत असेल, अशी व्यक्ती. आपण लहानपणी इतके निरागस असतो की, लपवणे ही गोष्टच आपल्याला समजत नाही.

वय वाढत जाते तसे काय सांगावे व काय लपवावे, हे समजू लागते. लपवण्यासारख्या गोष्टी वाढणे म्हणजेच वयात येणे! मग, एक अशी व्यक्ती आयुष्यात येते जिच्यापासून काहीच लपून राहत नाही. तिथे सार्वजनिक, खासगी असे काही उरतच नाही.

भले ते आवडो न आवडो, पटो ना पटो. ‘आमगेलो होऽऽ’, या पालुपदाने नवऱ्याविषयी नाराजी, तक्रारी करणारी बायको, नवरा आजारी पडला, तर त्याच्यासाठी जिवाचे रान करताना पाहिली आहे. ‘बायकोला काडीची अक्कल नाही’, असे म्हणणारा नवरा, बायकोच्या आजारपणात डॉक्टरचे पाय धरताना पाहिला आहे.

Marriage
History of India: गुजरातची महाराणी कदंब घराण्याची राजकन्या

यावरून लहानपणी ‘अमृत’ मासिकात वाचलेली एक गोष्ट आठवली. एका महिला डॉक्टरकडे आपल्या अत्यंत आजारी बायकोला घेऊन एक नवरा येतो. तो दिसायला रुबाबदार असतो व ती कुरूप. ‘डाक्टरसाब कैसे भी करके मेरी बिवी को बचायइये.

बहुत उम्मीद लेके आपके पास पहुंचा हूं.’ तो बायकोसाठी करत असलेली गयावया पाहून डॉक्टर त्याला विचारते, ‘इतर डॉक्टरांनीही तुला सांगितले असेलच, तुझी बायको वाचण्याची शक्यता फार कमी आहे.

तू दिसायलाही रुबाबदार आहेस. तुला आणखी कितीतरी मुली सहज हो म्हणतील. तरीही तू तुला न शोभणारी बायको वाचावी म्हणून इतकी गयावया का करत आहेस?’ डोळ्यात आलेले अश्रू आवरत तो म्हणतो, ‘डाक्टरसाब इसे मेरी आंखोसे देखो.’ इथेच ही कथा संपते. जिथे व्यवहारातले सगळे येऊन थांबते, तिथेच हे नाते सुरू होते.

Marriage
History of India: गुजरातची महाराणी कदंब घराण्याची राजकन्या

लग्न टिकवण्यासाठी तडजोड करावी लागते, पण लग्न ही निव्वळ तडजोड, व्यवहार व करार नाही. लग्न हा संस्कार आहे, हे अजिबात विसरून चालणार नाही. लौकिकार्थाने तोच गृहस्थाश्रमाचा पाया आहे. म्हणून त्याविरुद्ध सांगितल्या जाणाऱ्या गोष्टी कितीही तार्किक, आकर्षक वाटत असल्या तरीही आपले कर्तव्य व आपल्यावर होणारा संस्कार या दृष्टीने त्याकडे पाहिले पाहिजे.

कुटुंबव्यवस्था हा आपल्या समाजाचा महत्त्वाचा घटक आहे, जो विवाह किंवा लग्नसंस्थेवर आधारलेला आहे. कुटुंबव्यवस्थेला हलवण्यासाठी लग्न या संस्थेवर आघात करणे क्रमप्राप्त ठरते. वैचारिक, शैक्षणिक, मनोरंजन, कायदा या अनेक माध्यमांतून त्यावर हल्ले होत आले आहेत, होत राहतील. तरीही लग्नसंस्था टिकून आहे. कारण तो एक संस्कार आहे. शेवटी गुण असणे आणि ‘मार्क्स’ असणे यात फरक असतोच.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com