'नंदनवन’ ची रंगलेली पार्टी आणि रात्री हाडामांसाचा चिखल करणारा ‘किलर स्टेट’ मधील बाणस्तारीचा अपघात.... विश्लेषण

वाहनाचा धक्का एवढा तीव्र असतो की स्कूटरवरची महिला उंच उसळून पुलावरून खाली फेकली जाते. वाहनाचा चालक नशेमुळे रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जात आणि दुचाकीला ठोकरत पुढे जातो.
Goa Road Accident
Goa Road AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Road Accident गेल्या आठवड्यात बाणस्तारीला झालेला थरकाप उडवणारा अपघात. त्यात तिघांचा तत्काळ मृत्यू. एक मध्यमवयीन दांपत्य जागीच ठार. इतरांवर गोमेकॉमध्ये उपचार. लोकांचा क्रोध, जमावाने उत्स्फूर्तपणे पोलिसस्थानकावर काढलेला मोर्चा. हल्लीच्या काळातील बरेच दिवस चर्चेत राहिलेला हा अपघात.

यापूर्वीही गोव्यातील रस्त्यांवर अपघात होऊन निष्पापांचे बळी गेलेले आहेत. रस्त्यावर रोज कुत्र्याच्या मौतीने माणसे मरत असतात. परंतु दारूच्या नशेत बेदरकारपणे वाहन हाकून अनेकांच्या मृत्यूला कारण झालो, तरी लोकांच्या अंगावर धावून जाणे, त्याच्या बायकोने काढलेले उद्गार, कोणाला तरी अपघात होतो तेव्हा कोणतरी मरणारच! हीच प्रवृत्ती गोव्यात तीव्र असंतोष निर्माण होण्याचे एक प्रमुख कारण बनले.

ध्यानीमनी नसताना तीन जीव मृत्यूच्या जबड्यात फेकले जातात. वाहनाचा धक्का एवढा तीव्र असतो की स्कूटरवरची महिला उंच उसळून पुलावरून खाली फेकली जाते. वाहनाचा चालक नशेमुळे रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जात आणि दुचाकीला ठोकरत पुढे जातो.

शेवटी त्याची गाडी रस्त्याच्या कडेच्या विभाजकावर अडकली नसती तर त्याने आणखी काही जणांचा जीव घेतला असता. दारूच्या संपूर्ण आहारी जाऊन गाडी चालविणे, दिशा ओलांडून वाहनांना ठोकरणे, शिवाय लोकांच्या अंगावर धावून जाण्यासारखी अरेरावी करणे... लोकांच्या भावना तीव्र बनण्याची ही काही कारणे आहेत. शिवाय हा राग उत्स्फूर्तपणे व्यक्त होत आहे.

गोव्याच्या रस्त्यावर दरदिवशी एक माणूस चिरडला जातो. बाणस्तारी प्रकरणात तर चंगळवादी प्रवृत्तीनेच निष्पापांचा बळी घेतल्याचे सिद्ध झाले. श्रीमंतांची गुलछबू मुले मद्यसेवनाचा अतिरेक करून रस्त्यावर वाहने चालवतात, हा संदेश त्यातून गेला. त्यामुळे उच्चभ्रू समाजाविरोधात संतापाची लाट उठली.

धनाढ्यांच्या मस्तवालपणाला चाप लागला पाहिजे, ही भावना त्यातून निर्माण झाली. या लोकक्षोभाला प्रसारमाध्यमांनी योग्य वळण दिले, कधी नव्हे ते उच्चभ्रू महिलेचे फोटो छापून आले. प्रसार माध्यमांचा तो अतिरेक तर नाही ना, असे सुरुवातीला वाटत होते. परंतु लोकांच्या रागाचीच ती परिणती होती.

सध्या प्रसारमाध्यमांमुळे कोणती गोष्ट लपून राहत नाही. खांडेपारच्या ‘नंदनवन’ या ठिकाणी सकाळपासून ही पार्टी चालत होती. रोटरी क्लबचे सदस्य-ज्यांना एरव्हीही समाजाबद्दल कितीशी पोटतिडीक आहे याबद्दल चर्चा होते- त्यात ते सहभागी झाले होते, हे छायाचित्रही व्हायरल झाले.

लोकांनी ज्या धनाढ्य कुटुंबातून ही मुले आली, त्यांची छायाचित्रे काढून व्हायरल केली. आता न्यायालयात काही निकाल लागो, परंतु समाजमाध्यमे, लोकांचा जनक्षोभ यामुळे अशा उन्मत्त घटकांना जन्मभर आठवण राहील अशी अद्दल त्यातून घडली आहे.

एक आठवडा संपूनही बाणस्तारी प्रकरणावरून निर्माण झालेला असंतोष शमलेला नाही. लोक सतत सरकार आणि पोलिस यंत्रणेवर संशय व्यक्त करताहेत. प्रत्यक्ष घटना पाहिलेल्या व्यक्तीने आपण स्वतः स्टेअरिंगवर मेघना सावर्डेकर बसली होती, अशी साक्ष पोलिसांना दिली. शिवाय प्रसारमाध्यमांपुढे बोलतानाही तिचा पुनरुच्चार केला. परंतु मेघनाला तत्काळ अटक टाळली जाते, तिची मद्यप्राशनाची तपासणी केली जात नाही. त्यामुळे पोलिसांवरील संशय वाढला आहे.

पोलिसांच्या मते गाडीत तिची तीन छोटी मुले बसली होती. गाडी विभाजकावर अडकल्यानंतर नवऱ्याला तिने बाजूला करून गाडी हलविण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय पोलिस घटनास्थळी आले आणि जखमींना वाचवण्याऐवजी या दांपत्याला मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती दिसून आली, असा जमावाचा आरोप आहे.

मेघनाला गाडीतून उतरल्यानंतरही चालता येत नव्हते, असा जमावाचा दावा आहे. परेश सावर्डेकरला अटक करण्यास पोलिसांना आठ तास लागले. त्यापूर्वी या कुटुंबाला पोलिसांनी जाऊ दिले होते. नंतर त्याला कुठून पकडून आणले याबद्दलही पोलिसांकडून खरी माहिती मिळत नाही.

या वाहनाच्या मागच्या सीटवर तीन छोटी मुले बसली होती, त्यामुळे दारूच्या नशेत त्या मुलांच्या जिवाला धोका निर्माण केल्याचा गुन्हा नोंद केला जाऊ शकत होता. दोन महिन्यांत सहावेळा ओव्हरस्पीडिंगचे गुन्हे नोंदवूनही पोलिसांनी वाहनमालकाचा परवाना रद्द केला नव्हता. आता तो रद्द केला जात असल्याचा बहाणा वाहतूक खात्याने चालविला आहे.

हा अपघात रात्री आठच्या सुमारास घडला, तेव्हा तेथे लोक होते. त्यामुळे अपघाताची वार्ता समजली, तरी तो अपघात मध्यरात्री घडला असता, तर त्याचा मागमूसही राहिला नसता. वाहन घेऊन ते पळून गेले असते किंवा वाहन कोण चालवीत होते, याचा तपास लागला नसता. या पुलावर सीसीटीव्ही यंत्रणाही नाही.

गोव्याला आधीच रस्त्यावरच्या अपघातांमुळे ‘किलर स्टेट’ म्हटले जाते. लोक गहजब करीत असूनही रस्त्यावरच्या अपघातांमध्ये घट झालेली नाही. उलट दारूच्या नशेत वाहने हाकणे आणि धनाढ्यांची बेदरकारी, हे प्रकार वाढूनही वाहतूक खाते किती निष्काळजीपणे ही प्रकरणे हाताळते, त्यावर वरील अपघाताने शिक्कामोर्तबच केले आहे.

खांडेपारहून भरधाव निघालेली ही गाडी म्हार्दोळ पोलिस ठाण्यालाही मागे टाकून फोंड्याहून निघाली तेव्हा एकाही पोलिसाने तिला कसे हटकले नाही? त्यांनी बाणस्तारी पुलावर घोळक्याने उभे राहून चकाट्या पिटणाऱ्या पोलिसांना कसे सावध केले नाही? असेही प्रश्‍न उपस्थित होतात. पोलिसांचा निष्काळजीपणा अपघाताला कारण असल्याचे वास्तव सतत सामोर आले आहे.

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही रस्त्यावरच्या वाढत्या अपघातांसाठी राज्य सरकारांनाच दोष दिला आहे. नवीन वाहतूक कायदा अस्तित्वात येऊन वाहतूक नियम उल्लंघनासाठी अनेक कठोर नियम तयार केले आहेत. परंतु आमच्या भाजपच्या राज्यांमध्येही या नियमांचे पालन करण्याविषयी अनास्था आहे, असे त्यांचे उद्गार नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

भारतीय रस्त्यांवर दर तीन मिनिटांना एक व्यक्ती मृत्युमुखी पडते. भरधाव, बेदरकारपणे चालविली जाणारी वाहने व दारूच्या नशेतील वाहनचालकांचे बेताल वर्तन, ही अपघातांची महत्त्वाची कारणे आहेत. वळणांचे चुकीचे नियोजन व रस्त्यावरील खड्डे, अशीही काही कारणे अपघातांसाठी कारणीभूत आहेत, असेही अहवाल सांगतो.

गेल्यावर्षी ४ लाख १२ हजार ४३२ रस्ता अपघात घडले, त्यात १ लाख ५३ हजार ९७२ लोक मृत्युमुखी पडले. त्यापूर्वीच्या वर्षीच्या तुलनेने ही वाढ १७ टक्के आहे. त्यामुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. शिवाय सरकारला या परिस्थितीची जाणीव ठेवून वाहनांच्या सुरक्षेसंदर्भातील निकष कडक करावे लागले. दुर्दैवाने दारूच्या नशेत गाडी हाकणाऱ्या प्रवृत्तीला मात्र आळा घालणे, सरकारला जमलेले नाही.

गेल्या पाच वर्षांत अपघातांचे प्रमाण वाढले आहे. २०१७पासून अपघातांची ही मालिका २८.३ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर गेली. आता तर हे प्रमाण ३४.५ टक्के या भयावह पातळीवर पोहोचले आहे. केवळ कोविडच्या काळातच रस्ता वाहतुकीला नैसर्गिक आळा बसल्याने अपघात कमी नोंदविले गेले.

रस्ता वाहतुकीतील अनागोंदी आणि वाढते अपघात याविषयीच्या वार्षिक अहवालावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेले विचार उद्बोधक आहेत. ते म्हणतात, ‘रहदारीला शिस्त लागावी, रस्त्यांच्या उभारणीतील अभियांत्रिकीमध्ये सुधारणा व्हावी व रस्ता सुरक्षेसंदर्भात अधिक चांगली जनजागृती होण्यासाठी शैक्षणिक उपाय योजणे एवढेच आमच्या हातात आहे.

परंतु वाहनांचे स्टेअरिंग हातात धरून स्वतःला मस्तवाल बनविण्याच्या प्रवृत्तीला आळा कसा घालणार?’ आव्हानात्मक रहदारीला शिस्त लावण्यासाठी मोटार वाहन (सुधारणा) कायदा २०१९ संमत होऊन त्यात बेशिस्त रहदारी, अल्पवयीनांकडून चालविली जाणारी वाहने याविषयी अधिक कडक दंड बसविण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या शहरांमध्ये इलेक्ट्रॉनिक देखरेखीचीही सोय करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गडकरी यांनी राज्य सरकारची बेफिकिरी, अनास्था अधोरेखित केली आहेच, शिवाय अनेक सरकारांनी या कायद्याच्या अंमलबजावणीत हेळसांड चालविली यात तथ्य आहे. त्यात गोव्यासारख्या राज्याने हे नियम आणखी शिथिल करण्यावर भर दिला आहे.

अपघात वाढत असले तरी आणि बाणस्तारी प्रकरणानंतर लोक राग व्यक्त करीत असले तरी प्रत्यक्ष वाहतूक नियम कडक होऊन पोलिसांनी वाहने थांबविण्याची मोहीम सुरू केल्यास लोकच नाराजी व्यक्त करतात, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. सावर्डेकर दांपत्याने सहावेळा नियमभंग करूनही त्यांचा परवाना रद्द झाला नाही, अशी आणखी हजारो नियमबाह्य वाहने गोव्याच्या रस्त्यांवर राजरोस फिरत असतील.

खाणपट्ट्यात ट्रकवाले रस्त्यावर रक्ताचा चिखल उडवत वाहतूक करीत असत, तेव्हा आपले नेतेच त्यांच्या संरक्षणासाठी धावत असताना आपण पाहिले आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या एका अहवालानुसार गेल्या वर्षी ओव्हरस्पीडिंगमुळे (अतिवेग) झालेल्या अपघातांचे प्रमाण ६९.६ टक्के होते.

अपघात टाळण्यासाठी वेगावर मर्यादा येणे महत्त्वाचे आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याची वळणेही चुकीची बनली आहेत. शिवाय पायाभूत व्यवस्थेतही बऱ्याच उणिवा आहेत. गोवा विधानसभेतही वाहतूक खात्याचा विषय चर्चेला आल्यानंतर सत्ताधारी आमदारांनी पेडणे ते काणकोण या राष्ट्रीय महामार्गात समानता नसल्याचा विषय सभागृहाच्या निदर्शनास आणला होता.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वेगावर मर्यादा का आणली जात नाही, यावर युक्तिवाद करताना, ‘प्रवासी नाराज होतात, वारंवार वाहने रोखणे पर्यटन राज्याला शक्य नाही’, अशी मखलाशी केली. मुंबईनेही २००७-०८मध्ये दारूच्या नशेत वाहने हाकणाऱ्यांविरुद्ध जोरदार मोहीम आखल्यानंतर संपूर्ण देशाला हादरा बसला होता.

त्यावेळी हजारो दारूड्यांना चलन देण्यात आले. त्यात शेकडो महिलाही होत्या. या धनाढ्य व बेमुर्वतखोर, शिवाय प्रसिद्धीच्या झोतात असणाऱ्यांचीही छायाचित्रे प्रसारमाध्यमांनी बिनदिक्कत छापली होती. तेव्हा समाजमन हबकले होते. आज गोव्यातही मद्यसेवनाला सामाजिक प्रतिष्ठा लाभली आहे.

सोशल पार्ट्यांमध्ये दारूच दिली जात नाही, तर ती अक्षरशः वाहत असते. त्यात महिलाही तेवढ्याच ताकदीने मद्यसेवन करीत असतात. दुर्दैवाने तेथून घरी परतताना नियमांचे काटेकोर पालन करण्यास कोणी सांगत नाहीत. अशा मंडळीचे परवाने वेळीच रद्द झाले, त्यांच्या प्रतिष्ठेवर ओरखडे उठले तरच हा मस्तवालपणा नियंत्रणात येऊ शकतो. गोव्यातही तशी कडक मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे.

Goa Road Accident
Drunk and Drive प्रकरणी पोलिस अलर्ट मोडवर, उत्तर गोव्यात दोन दिवसांत तब्बल 'एवढ्या' मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

रस्ता अपघात व रस्त्यावर पडणारे रक्ताचे सडे थांबविण्यावर यापूर्वी बराच अभ्यास झाला आहे. त्यासाठी प्रमुख दहा कारणे दिली जातात आणि या कारणाचा अवलंब करूनच अपघात रोखणे शक्य आहे.

भरधाव वाहने चालवून रस्ता वाहतुकीतील शिस्त मोडीत काढणे, दारूच्या नशेत वाहने हाकणे, खराब रस्ते, तीव्र हवामान, समोरील वाहनांनी पेटविलेले उच्च दाबाचे दिवे, रात्रीच्या वाहन चालविण्यातील धोके, रस्त्याच्या आसपास चाललेले लक्ष विचलित करणारे प्रकार व एकूणच नियमबाह्यता ही काही प्रमुख कारणे अपघातांसाठी अधोरेखित करण्यात आली असली तरी मानवी चूक हे त्यातील सर्वांत मोठे कारण आहे.

अनेकांना उगाचंच इच्छित स्थळी पोहोचण्याची घाई झालेली असते, ते जरी अशी घाई दाखवत असले तरी बेदरकारपणा आणि मस्तवालपणा हे त्यामागील कारण असल्याचे शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. अनेकदा मानवी मन बेदरकार बनते, कारण त्याच्या मनात सत्ता आणि पैशाचा माज चढलेला असतो.

‘आपले कोणी काही करू शकत नाही आणि पकडले तर आपण पैसे देऊन सुटका करू शकतो’, ही भावना गोव्यात सार्वत्रिक आहे. रस्त्याच्या कडेला उभे असलेले पोलिस वाहने अडवितात, तेव्हा हमखास आमदार किंवा एखाद्या वजनदार व्यक्तीला फोन जाऊन त्या पोलिस अधिकाऱ्याला त्यांच्याकडे बोलायला सांगितले जाते, हा प्रकार सर्रास आपण पाहतो.

परंतु कोणी त्याविरुद्ध आवाज उठवत नाही, कारण गोव्यात प्रत्येकाचा वशिला चालतो. आजही बाणस्तारीच्या घटनेविरुद्ध आवाज उठविणारे लोक, ‘पोलिसांना जादा अधिकार द्या’, असे म्हणत नाहीत. गोव्यात पोलिसांचे खच्चीकरण सरकारने केले, मंत्री आमदारांनी त्यांचे नीतिधैर्य काढून घेतले आणि सर्वसामान्य माणूसही धनाढ्यांएवढाच या पतनाला कारण ठरला आहे.

Goa Road Accident
Goa Monsoon Update: पावसाचा ब्रेक संपणार! राज्यात पुन्हा बरसणार जोरदार सरी

माझी मुलगी जर अशा अपघाताला कारण ठरली असती तर मीच तिला समज देऊन पोलिसांना शरण यायला भाग पाडले असते, असे आमदार दिव्या राणे म्हणाल्या आहेत. त्यावर कोणाचाही विश्‍वास बसणे कठीण. गोव्यात किती आमदारांना गेल्या पंचवीस वर्षांत बेशिस्त वाहन चालनाबद्दल शिक्षा झाली आहे?

जो आमदार किंवा मंत्री इतरांची सुटका करण्यासाठी पोलिसांना फोन करताना जराही विचार करीत नाही, तो आपल्या कुटुंबीयांना ‘लांच्छन’ लागू नये म्हणून पोलिसांना ताकीद देणार नाही, हे गळी उतरणे जरा कठीणच!

जागतिक पातळीवरही अमलीपदार्थ आणि अतिमद्यसेवन करणे, ही मुख्य समस्या बनली आहे. आपले वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये ड्रंक अॅण्ड ड्रायव्हिंगसाठी बारमालकांना जबाबदार धरणार असल्याची भीष्मप्रतिज्ञा केली होती. ‘यापुढे दारूड्यांना घरी सोडण्याची जबाबदारी बारमालकांना उचलावी लागेल’, असे त्यांनी मोठ्या ऊर्मीत जाहीर केले होते, परंतु बार संघटनेचे अध्यक्ष मायकल कोरासो यांनी त्यांना आव्हान दिले.

‘दारूड्यांपेक्षा खराब रस्ते हेच अपघातांचे खरे कारण आहे’, असा त्यांचा दावा होता. तरीही गुदिन्हो म्हणाले होते, ‘दारू पिऊन वाहन चालवणे हेच अपघातांचे कारण बनत आहे आणि त्यावर कडक उपाययोजना करण्यावर आपण भर देऊ’. त्यानंतर बार संघटनेने गोव्यात ॲपधारक टॅक्सी सेवा नाही, असे आणखी एक कारण दिले. त्यामुळे पर्यटन राज्याचा आणखी एक संकल्प धुळीला मिळाला.

Goa Road Accident
Mayem Biodiversity: मये उलगडणार 1,300 वर्षांचा जैवविविधतेचा इतिहास; त्रिवेणी वारसा सांगणारं देशातील पहिलंच गाव

वास्तविक मद्यप्राशन करून वाहन चालविण्याचा दोनवेळा गुन्हा केल्यास वाहन चालक परवाना रद्द केला जाऊ शकतो. पश्‍चिमी देशात अशा पहिल्याच गुन्ह्यात परवाना रद्द होतो. तेथे सार्वजनिक वाहतूक कित्येक पटीने सक्षम असतानाही परवाना रद्द होणे अनेकांना परवडण्यासारखे नसते.

गोव्यात नियम एवढे कडक असूनही त्याची सक्षमतेने अंमलबजावणी होत नाही. गडकरी म्हणाले त्याहूनही पुढे जाऊन सांगायचे झाल्यास गोव्यात अक्षरशः ‘बनाना राजवट’च सुरू आहे. मुंबईत दारूड्या महिलांचे फोटो प्रसिद्ध होऊ लागले तेव्हा मोठा गहजब निर्माण झाला होता. गोव्यातही ज्या महिलेचे छायाचित्र प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले, त्यांच्या घरात काय अवस्था बनली असेल याचे चित्र आपण डोळ्यांसमोर आणू शकतो.

परंतु कडक शिस्तच बेधुंद वाहने हाकण्यावर नियंत्रण आणू शकते, नाहीतर बाणस्तारीचे ओरखडे आणखी काही दिवसांनी शमतील, तेव्हा समाज पुन्हा उन्मत्त बनेल. पुन्हा भरधाव गाड्या चालू शकतील. मर्सीडीज वाहने आज काही उच्चभ्रूंचीच मक्तेदारी राहिलेली नाही.

नवश्रीमंतांची टोळीच मर्सीडीज कंपनीपुढे रांग लावून उभी आहे. जोपर्यंत वाहतुकीत शिस्त येणार नाही, समाज किमान काही निर्बंध स्वतःवर लावून घेणार नाहीत तोपर्यंत हे लोक रस्त्यावर हाडामांसाचा चिखल उडवत उजळ माथ्याने फिरतच राहतील...

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com