साहित्याविषयीची आस्था हरवत चाललेल्या सद्ययुगांत रायकरांच्या आणि त्यांच्या समकालीनांच्या साहित्यिक (Literary)योगदानाचे महत्त्व नव्या पिढ्याना समजावून सांगण्याचे काहीच माध्यम नसल्याची खंत यानिमित्ताने पुन्हा एकदां उसवली आहे. हे योगदान मुलतः साहित्यिक असले तरी त्याला मुक्तिलढ्यातील असीम त्यागाची आणि हालअपेष्टांची किनार आहे. प्रसारमाध्यमांना (media)भौतिक आणि राजकीय बंधने असलेल्या त्या काळांत लोकचेतनेचे काम साहित्यिकांची अमोघ लेखणी करायची.
गजानन रायकर यांनी आपल्या प्रतिभाविलासाला जाज्वल्य भूमिनिष्ठेची व वसाहतवाद्यांच्या विरोधाची दीक्षा देत रचलेली कवने हादेखील गोव्याच्या मुक्तिलढ्याचा अविभाज्य भाग आहे. ''चला पुढे चला पुढे चला पुढे, रोवू चला पणजीवर विजयी झेंडे'' हे त्यांचे गीत (Song)तर असंख्य स्वातंत्र्यसैनिकांना (Soldier)शस्त्रसज्ज पोर्तुगीज सैनिकांसमोर निशस्त्र सत्याग्रही म्हणून उभे ठाकण्याची प्रेरणा देणारे स्फूर्तिगीत ठरलें. स्वतः गजानन रायकरांनीही मुक्तिलढ्यांत सक्रिय सहभाग घेतला आणि पोर्तुगीजांच्या (Portugues)हिंसेलाही ते सामोरे गेले. त्यामुळेही असेल कदाचित, त्यांच्या लेखणीतून उमटणाऱ्या शब्दांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या अंगी हत्तीचे बळ संचारायचें आणि ते साम्राज्यशाहविरोधातल्या विषम लढाईसाठी सज्ज व्हायचे.
एक स्वातंत्र्यसेनानी म्हणून त्यांच्या त्यागाचा यथोचित सरकारी सन्मान झालाही असेल, पण आपल्या प्रतिभेच्या साह्याने निर्मिलेल्या अलौकिक लेण्यानी मुक्तिदेवतेला सजवण्याच्या त्यांच्या यत्नांच्या स्मृती गोमंतकीय साहित्यविश्वाने अखंड तेवत ठेवणे हीच त्याना खरी श्रद्धांजली ठरेल.
गजानन रायकर मुक्तीनंतरच्या काळांतही आपल्या परीने साहित्यसेवा करत राहिले. मराठीइतकेच अव्वल आणि अस्सल, मातीचा गंध असलेले काव्य त्यानी कोकणीतूनही प्रसवले. जयजयकार (1993), रंगयात्रा (1994) आणि इंद्रफुलें (1996) या त्यांच्या कवितासंग्रहातील कोणतेही पान उलगडताना नादमधुर काव्यधून गात्रांतून उमटत जाते. गोव्याच्या मातींत रुजलेला नाद आणि लय रायकराना वश झाली होती आणि त्यांच्या विपुल अशा काव्यलेखनातून ती आजही दृगोच्चर होत असते.
''मी निजाचा गावडा रे, गावगाड्याचा धनी।
या भूमीचा मीच वारस,वंद्य मजला ही भूमी।।''
अशा, मुक्तीनंतरच्या काळात आपला आत्मस्वर शोधणाऱ्या बहुजन समाजाच्या हृदयाची तार छेडणाऱ्या कविता रायकरांनी लिहिल्या. चांगल्या कवितेचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती कालसापेक्ष असते. रायकरांची कविता आजही अम्लान वाटते, गुणगुणावीशी वाटते; यातच तिचे असाधारणत्व लपलेले आहे. या सहा- सात दशकांच्या या काव्यहोत्राला स्वाभिमानाची धारदार किनार असल्याचेही पदोपदीं जाणवतें. गोव्यातील मराठी चळवळीच्या अग्रस्थानी राहिलेल्या रायकरांच्या धारणांचा प्रभाव त्यांच्या काव्यनिर्मितीवर पडला नसता तरच नवल.
स्वभावाने सालस असलेल्या रायकरांच्या काव्यनिर्मितीवर कृष्णंभट्ट बांदकर आणि सोहिरोबांच्या प्रासादिक रचनांचे संस्कार झाले असल्याचेही लगेच लक्षांत येतें. अनेकदां आदर्शवादाच्याही वळणाने जाणारी त्यांची कविता निसर्गातील सुंदरतेला, निर्व्याजतेला उचलून धरताना उत्कट प्रीतीच्या भावनांचेही मनोज्ञ प्रकटीकरण करायची. गेयकाव्य लिहिणारा संप्रदाय आटत चालल्याच्या आजच्या काळांत ही मुळांतली नादमधुर कविता अधिक मोहमयी वाटावी अशीच!
गजानन रायकरांचा उल्लेख वर माजी आमदार म्हणून करण्यात आलाय. त्यांच्या राजकीय निष्ठा समाजवादी विचारांशी होत्या. पीटर आल्वारीस याना मानणाऱ्या गोमंतकीय बुद्धिवाद्यांत त्यांचा समावेश होता. समाजवादी नेत्यांकडून प्रेरणा घेऊनच रायकर मुक्तीसंग्रामात उतरले होते. गोवा मुक्तीनंतर 1963 साली जी पहिली विधानसभा निवडणूक झाली तिच्यात ते कागदोपत्री अपक्ष उमेदवार म्हणून लढले असले तरी त्यांचे नाव प्रजासमाजवादी पक्षाने पुरस्कृत केले होते. या निवडणुकीला गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण करावे या आग्रहाची पार्श्वभूमी होती.
नव्यानेच स्थापन झालेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला संघटनात्मक बांधणीची दीक्षा देणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रजासमाजवादी पक्षाच्या नेत्यांनी फोंडा मतदारसंघातून रायकराना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला आणि भाऊसाहेब बांदोडकरांनी तो मानलाही. या निवडणुकीत फोंडा मतदारसंघातून सिंह हे चिन्ह घेऊन उभे राहिलेल्या उमेदवाराला अवघी साडेसातशें मतें मिळालीं तर रायकरांनी साडेपांच हजार मतें घेऊन विजयश्री खेचून आणली, ही बाब आजदेखील लक्षणीय वाटावी अशीच.
मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असलेले ध्येयनिष्ठ कार्यकर्ते लोकप्रतिनिधी म्हणून निवडले जाण्याचे ते दिवस होते. विधानसभेच्या कामकाजाची धांदोळा घेताना गजानन रायकर यानी वेळोवेळी चर्चेत भाग घेत दिलेल्या योगदानावर लक्ष स्थिरावतें, पण विलीनीकरणाच्या राजकारणामुळे ह्या कर्तृत्वाचे चीज झाले नाही. नंतरच्या काळांत मगो पक्ष आणि बांदोडकरानाही समाजवाद्यांचे साहाय्य घेण्याची गरज भासली नाही. आपण उमेदवार म्हणून दगड जरी ठेवला तरी तो निवडून येईल असा आत्मविश्वास बांदोडकरांच्या ठायीं निर्माण झाला होता आणि शेजारी महाराष्ट्रांत नाथ पै, एस.एम. जोशी. नानासाहेब गोरे असे दिग्गज नेते असतानाही समाजवाद्यांचे गोव्याविषयीचे आकर्षण कमी झाले होते.
यथावकाश स्थानिक राजकारणाचे रंग अधिक झपाट्याने बदलत गेले आणि कधी अपक्ष तर कधी जनता पक्षाचे उमेदवार म्हणून उभ्या राहिलेल्या गजानन रायकरांची मतदारांकडून उपेक्षाच झाली. 1977 नंतरच्या राजकीय परिवर्तनाच्या पश्चात रायकरानाही निवडणुकींत आणि राजकारणांत स्वारस्य राहिले नाही. पण सामाजिक आणि सांस्कृतिक मंचावर त्यांची ठळक उपस्थिती असायची आणि ती आपला प्रभावही पाडायची. भाषा आंदोलनात ते अग्रस्थानी होते आणि निरपेक्षपणे त्यानी मराठीची पाठराखण केली होती. त्यांच्या स्मृतींचा नंदादीप गोमंतकीय साहित्यविश्वात अखंड तेवत राहील. गोमन्तकची त्याना भावपूर्ण श्रद्धांजली
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.