अभिदीप विष्णू देसाई
Independence Movement गोव्याच्या कुंकळ्ळी गावात 15 जुलै 1583 या दिवशी जी संघर्षाची ठिणगी पडली, त्यास समर्थ रामदासांच्या या ओळी समर्पक आहेत. 440 वर्षांपूर्वी याच दिवशी कुंकळ्ळी गावचे अनेक गावकर स्वधर्म रक्षणासाठी व स्वराज्य स्थापनेसाठी अन्यायी पोर्तुगिजांविरुद्ध रणांगणात उतरले.
दुर्दैवाने त्या वीरांच्या बलिदानानंतरदेखील अनेक शतके या लढ्यास न्याय मिळाला नाही. आज कुंकळ्ळीच्या स्वातंत्र्यलढ्याचा स्मृतिदिन. त्यानिमित्त आपल्या वीर पूर्वजांनी कशासाठी बलिदान दिले, त्यावर विचार करण्याची गरज आहे.
पोर्तुगीज सत्ताकाळात कुंकळ्ळीच्या स्वातंत्र्यसमराची केवळ एक ‘बंड’ म्हणून संभावना करण्यात आली. खरे म्हणजे हे स्वातंत्र्यासाठी केलेले युद्ध होते. परंतु दुर्दैवाने गोवा मुक्त झाल्यानंतरही हा बंडाचा शिक्का पुसण्यात आला नाही.
गोमंतकात आजही अशा कितीतरी व्यक्ती आहेत ज्या 15 जुलै रोजी मारल्या गेलेल्या जेझुइट्स पाद्र्यांना सहानुभूती दाखवतात व त्यांच्या दृष्टीने कुंकळ्ळीचे सोळा नायक म्हणजे काही गावकरी, ज्यांनी क्रोधाच्या भरात निष्पाप जेझुइट्स पाद्र्यांचा बळी घेतला.
हे पादरी इतके निष्पाप होते का? मुळीच नाही! हे पाद्री हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींचे चिथडे करून, हिंदूंना त्यावर नाचायला लावून या दृश्याचा आनंद घेणारे दानव होते. यातील फादर ब्रूनो नामक इसमाने तर शांतादुर्गेचे वारूळ आपल्या हाताने उद्ध्वस्त केले होते.
यानेच तळेभाट येथे गायीचे मास तळीत टाकून तळी भ्रष्ट केली होती. ज्या जेझुइट्स पंथाशी या सर्व पाद्र्यांचा संबंध होता त्याच पंथाने सासष्टी महालात हाहाकार माजवला होता. असंख्य हिंदूंना गोव्यातून स्थलांतर करायला भाग पडले होते
फक्त आपल्या संस्कृतीचे, धर्माचे रक्षण करण्याकरिता हजारो गोमंतकीय कर्नाटक-केरळपर्यंत विस्थापित होऊन गेले. जे गोव्यात राहिले व ज्यांनी ख्रिस्ती पंथ स्वीकारला त्यांनाही पोर्तुगीज राजसत्ता व पंथसत्तेने सुखाने जगू दिले नाही. ‘इन्क्विझिशन’च्या नावाखाली वाट्टेल ते कारण देऊन ख्रिस्ती पंथाचे पालन न केल्याचा ठपका ठेवत नवख्रिस्तींना जिवंत जाळण्यात आले.
कुणाच्या कुळागरात जरी छोटे तुळशीचे रोपटे दिसले किंवा कोणी आपल्या हिंदू नातेवाइकांशी बोलणे केले तर तो गुन्हा मानून त्यावर ‘इन्क्विझिशन’ची कारवाई होत असे.
अशा स्थितीत खरे तर गोमंतक भूमी आपल्या पुत्रांना आवाहन करत होती, ‘अरे पळू नका, एकत्रित व्हा, शस्त्र धारण करा व माझे व आपल्या देवदेवतांचे रक्षण करा’. ही हाक ऐकली कुंकळ्ळीच्या त्या वीरांनी.
कालांतराने जरी इतर गोमंतकीयांना कुंकळ्ळीकरांच्या या बलिदानाचा विसर पडला तरी कुंकळ्ळीकर आपल्या पूर्वजांचे हे बलिदान विसरले नव्हते, मग तो हिंदू असो वा ख्रिस्ती.
कुंकळ्ळीच्या अनेक गावकर नाईक देसाईंना पोर्तुगीज काळात ख्रिस्ती पंथ स्वीकारायला भाग पाडले. तरीही त्यांच्या मनातील आपल्या कुलाचाराविषयीचा आदर व हिंदू बांधवांविषयी प्रेम कमी झाले नाही.
दुर्दैवाने गोमंतकीय इतिहासात कुंकळ्ळीचा हा रणसंग्राम काही ओळीपर्यंतच सीमित राहिला होता. अशा काळात हा थोर इतिहास कुंकळ्ळीकरांच्या व गोमंतकीयांच्या मनात पुनर्जागृत करण्याचे काम केले डॉक्टर वेरेसिमो कुतिन्हो यांनी. त्यांच्या प्रयत्नांमुळे २००३साली तळेभाट येथे कुंकळ्ळीच्या १६ महानायकांचे स्मारक उभे राहिले.
तळेभाट ही तीच जागा, ज्या जागेवर शांतादुर्गा मातेची तळी होती. याच जागेवर १५ जुलै १५८३ रोजी जेझुइट्स पाद्र्यांचा वध केला होता. त्या स्थानी जेझुइट्स पाद्र्यांना अर्पित पोर्तुगीजकालीन एक कपेल होते. आज त्या कपेलच्या बाजूलाच गोमंतकीय सपुत्रांचे म्हणजेच १६ महानायकांचे स्मारक आहे.
कुंकळ्ळीच्या १६ महानायकांची वीरगाथा व कुंकळ्ळीचा हा एकूण पोर्तुगिजांविरुद्धचा संघर्ष शालेय पुस्तकात यावा, यासाठी अनेक कुंकळ्ळीकरांनी प्रयत्न केले. कुंकळ्ळीचे सुपुत्र ऍड. लिंगू दळवी व फादर प्लॅन्टोन फरिया तसेच स. श. देसाई, रुई गोमेस परेरा, रॉबर्ट न्यूमन, उल्हास प्रभुदेसाई यांच्या अभ्यासपूर्वक इतिहास लेखनामुळे कुंकळ्ळीचा रणसंग्राम अनेक वाचकांकडे व इतिहासाच्या विद्यार्थ्यांकडे पोहोचला.
अनेक ज्ञात व अज्ञात व्यक्तींच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश मिळाले ते २०२२ साली. शेवटी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यकाळात कुंकळ्ळीच्या या संग्रामाला ‘प्रथम गोमंतकीय मुक्तिसंग्राम’ अशी मान्यता देत १५ जुलै २०२२ रोजी सोळाही महानायकांना गोवामुक्ती संग्रामातील हुतात्म्यांचा दर्जा दिला.
तसेच १५ जुलै हा दिवस ‘गोवा राज्य युद्ध स्मारक दिवस’ असा घोषित केला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा इतिहास शालेय पाठ्यक्रमात या वर्षी समाविष्ट करण्यात आला.
बलिदानानंतर ४४० वर्षांनी व गोवा मुक्तीनंतर ६० वर्षांनी कुंकळीच्या हुतात्म्यांना योग्य तो सन्मान मिळाला. या वर्षीच्या नववी आणि अकरावीच्या पाठ्यपुस्तकातून हा इतिहास शिकवला जाईल. कुंकळ्ळीच्या वीरांच्या लढ्याला हीच खरी मानवंदना!
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.