या दिवसात अनेकांना असणारे धबधब्यांचे आकर्षण ठिकच आहे पण धबधब्यांसारखीच ग्लॅमरस इतर ठिकाणेही गोव्यात कमी नाहीत आणि कदाचित ती आपल्या घरापासून फार दूर नसावीत. धबधब्यांच्या पाण्याला आपण सरळ जाऊन भिडू शकतो मात्र अशा या वेगळ्या ठिकाणांवर भ्रमंती करून निसर्गाचा आनंद लुटायचा असेल तर थोडीशी अभ्यासू आणि चौकस नजर हवी हे मात्र खरे. उदाहरणार्थ पठारावरचे कातळ!
पाऊस कोसळायला सुरुवात झाल्यानंतर सड्यावरच्या कातळांचा रुक्षपणा जाऊन त्याला एक नवे चैतन्य लाभते. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची छोटी छोटी फुले त्यावर बागडताना दिसतात. कातळावरचे हे वैभव केवळ अवघे दिवस टिकणारे असले तरी रंगाच्या टिंबानी गजबजलेल्या त्या प्रदेशात एखादा तरी फेरफटका मारल्यास आपल्याला ते कायमचे स्मृतीत साठवता येईल.
केवळ आकर्षक आहेत म्हणून नव्हे तर अनेक जीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न कातळावरच्या वनस्पती पावसाच्या दिवसात सोडवत असतात म्हणूनही त्यांचे एक वेगळे महत्व आहे. उन्हाळ्यात बहरलेली फुले पावसाची सुरुवात होईतो झाडांवरून अदृश्य झालेली असतात. अशावेळी स्थानिक पक्षी व कीटकांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झालेला असतो. पावसात फुललेली कातळावरची फुले त्या दिवसात त्यांच्या अन्नाचा प्रश्न सोडवतात. त्यामुळे तिथले स्थानिक पक्षी आणि कीटक तग धरून राहू शकतात.
शिवाय ही कातळावरची फुले नायट्रोजन किंवा नत्र यांचे घटक निर्माण करण्यातही मदत करत असतात. वनस्पतींच्या वाढीसाठी ‘नत्र’ हे महत्त्वाचे खत असते. हे घटक पावसाच्या पाण्यातून वाहत येऊन खालच्या भागातील शेतीला मिसळतात. अशातऱ्हेने एकप्रकारे शेती-बागायतीना नैसर्गिक खत मिळवून देण्याचे काम कातळावरील या छोट्या छोट्या फुलांकडून अपरोक्षपणे होते. पठारावर उंच ठिकाणी असणाऱ्या या कातळांनादेखील पाणी हवेच असते.
कातळासाठी पाणी अडवून ठेवण्याचे हे काम या फुलांची रोपे करतात. अशाप्रकारे सर्व बाबतीत परोपकारी असणारी रानफुले आणि तिथल्या वनस्पती केवळ त्यांच्या नगण्य अशा आकारामुळे आम्हा सर्वांकडून दुर्लक्षित राहतात. कातळावर होत असलेल्या मानवी आक्रमणामुळे देखील कातळावरची ही संपदा असुरक्षित होत चालली आहेत.
पावसाळी मोसमात कातळांची सैर देखील अवश्य करा आणि तिथल्या अल्पजीवी फुलांचे सौंदर्य निरखा. मात्र तिथून चालताना जपून चाला कारण ही फुले फार नाजूक असतात. गोव्याचे कातळक्षेत्र जैवविविधतेत समृध्द असल्यामुळे पर्यावरणप्रेमी अशा पठारांचे संरक्षण व्हावे या हेतूने फार पूर्वीपासून प्रयत्न करत आहेत.
निसर्गप्रेमींनी पठारांचे हे वैभव लक्षात घेतल्यास पठारांच्या जतनासाठी चाललेल्या त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच पाठबळ मिळू शकते. पठारांकडे दुर्लक्ष करू नका. तसे करणे म्हणजे तिथल्या जैवसंपत्तीकडे दुर्लक्ष करणे आणि अशा दुर्लक्षित भूभागांचा लचका तोडण्यास तर अनेकजण सिद्ध असतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.