जरा विसावू या वळणावर...

वानप्रस्थ हे असे वळण आहे जिथे थांबून, विसावा घेऊन, पूर्ण विचार करून निर्णय घ्यायचा आहे.
Old Age
Old AgeDainik Gomantak

प्रसन्न शिवराम बर्वे

आश्रम चतुष्टयातील मूल्यांच्या विवेचनाचा विषयप्रवेश करताना, मानसिक विकासाचे प्रेयस, श्रेयस आणि नि:श्रेयस हे तीन टप्पे आपण पाहिले होते.

प्रिय आहे तेच करायचे एक मानसिक वय असते, त्यानंतर श्रेय मिळेल ते करण्यास प्राधान्य देणारा (भले ते प्रिय नसले तरी) मानसिक वयाचा, विकासाचा एक टप्पा असतो आणि प्रियही नाही आणि त्याचे कुणी श्रेयही देणार नाही, तरीही ते कार्य कर्तव्य म्हणून किंवा धर्म म्हणून करण्याची एक मानसिक अवस्था येते, ती नि:श्रेयस अवस्था. नि:श्रेयसाच्या याच प्राथमिक अवस्थेत वानप्रस्थाश्रम हे मूल्य सांगितले आहे.

वानप्रस्थाचे वय ५१ ते ७५ अशी आयुष्याची शंभर वर्षे गणतीस धरून विभागणी केली जाते. पण, शारीरिक वयानुसार विभागणी तितकी योग्य नाही. मानसिक वय आणि अवस्था यानुसार या चारही मूल्यांची जीवनात विभागणी करणे उचित ठरेल.

पन्नाशीला टेकलेल्या माणसाची वृत्ती संसारातून निवृत्त होतेच असे नाही. उलट ‘मला काही पडलेलं नाही, तुम्हांला हवं ते करा’, असे म्हणणारा माणूसच संसारात अधिक लिप्त असतो.

आताच्या आपल्या कुटुंबामध्ये ज्या समस्या आहेत, त्यामध्ये माणसाचे प्रेयस व श्रेयस न सुटणे हे एक मोठे कारण आहे. ‘मी आहे म्हणून तुम्हांला काही कळत नाही.

मी गेल्यावर कळेल’, असे एक वयोवृद्ध गृहस्थ संसारात स्थिरस्थावर झालेल्या आपल्या मुलाला दररोज ऐकवत. याचा त्या बिचाऱ्याला इतका त्रास व्हायचा की, एक दिवस वैतागून तो म्हणाला, ‘जाऊन पाहा, मग कळेल’.

आपण आपल्या मुलांच्या संसारात किती लक्ष घालावे याला काही मर्यादा असतात. लग्न करून दिलेल्या मुलीच्या संसारात तिच्या आईने फार लुडबूड करू नये. नको इतके लक्ष घातल्यास आपण आपल्या मुलांना संसार चालवण्यास सक्षम केले नाही, असाच त्याचा अर्थ होतो.

मागितला तर आशीर्वाद आणि विचारला तर सल्ला द्यावा. बाकी आपला सगळा वेळ आत्मचिंतन, समाजोपयोगी कार्य यात घालवावा.

वानप्रस्थ म्हणजे सगळे काही मुलांच्या ताब्यात देऊन वनात जाऊन राहणे, असा असला तरी आता तसे करण्यासाठी वने तरी कुठे शिल्लक आहेत, असा प्रश्‍न पडावा इतकी आपण जंगलतोड करून ठेवली आहे.

Old Age
Goa Dairy: श्‍वेतक्रांतीला लागलेला काळिमा

वानप्रस्थाचा विचार आपल्या मनातही येत नाही कारण जरी आपले वय झाले असले तरी मुले स्थिरस्थावर झालेली नसतात. आपले करिअरमध्ये स्थिर होण्याचे, लग्न करण्याचे व मूल होण्याचे वय यातील समतोल बिघडला आहे.

त्यामुळे, पन्नाशी ओलांडली तरी आपले मूल १४-१५ वर्षांचे असते. ज्यांच्या हाती सर्व देऊन बाहेर पडायचे त्यांचीच जबाबदारी आपल्यावर असते. मग वानप्रस्थ घडावा कसा? त्यामुळे, संसार मुलांच्या हाती सोपवून वनात जाणे याऐवजी घरातच राहून निवृत्त मनाने नातवंडांवर संस्कार करण्याचे कार्य आपण करू शकतो.

खरे तर आज त्याची सर्वांत जास्त आवश्यकता आहे. काका, मामा सोडल्यास मुलांना नातलग माहीत नसतात. नाती सांभाळणे, आपुलकी जपणे हेही घडत नाही. त्यामुळे, मुलांना पाळणाघरात ठेवण्याऐवजी आजी आजोबांकडे ठेवणे कधीही चांगले.

वयोवृद्ध व बाल्य या दोघांचीही ती मानसिक आवश्यकता आहे. पण, आपण तेच दरवाजे बंद केले आहेत. अनेक घरांत नातवंडांचा वापर मुलांवर सूड उगवण्यासाठी केला जातो. निवृत्त मनाने नातवंडांचा सांभाळ करणे, त्यांच्यावर संस्कार करणे त्यासाठीच महत्त्वाचे आहे.

Old Age
Gomantak Editorial: बर्मिंगहॅमची भंबेरी!

वयोपरत्वे आपण नोकरीतून निवृत्त होतो, पण मनाने निवृत्त होणे जमत नाही. काहीतरी करत राहण्याची सवय लागलेली असते. आपल्याशिवाय काही होणार नाही, ही भावना अद्याप प्रबळ असते. ‘आपल्याआधीही जग होते व नंतरही असेल’, असे आपण निराशेने म्हणतो; जाणिवेने नाही.

त्यामुळे, कायम चडफड, चिडचिड होत राहते. नोकरीतून निवृत्त झालेल्यांपैकी अनेकांना आपल्यामागून कंपनीचे बरे चालले आहे, हे ऐकून वाईट वाटते. ‘तुम्ही रिटायर झालात आणि कंपनीची वाट लागली. पूर्वीची कंपनी राहिली नाही आता’, हे वाक्य ऐकल्यावर मन सुखावते.

कंपनी, तिथली व्यवस्था आपण एवढी सक्षम केली आहे की, आपल्यानंतरही कंपनी निर्धोकपणे चालेल हा विश्‍वास नको असतो; हवे असते ते श्रेय, मग ते नकारात्मक का असेना.

प्रेयस आणि श्रेयस यापासून जोपर्यंत सुटका होणार नाही, तोपर्यंत वानप्रस्थ घडणार नाही. वानप्रस्थ हे आयुष्यातले एक असे वळण आहे, जिथे थांबून का धावतोय, कुठे थांबायचे, याचा विचार करायचा असतो.

Old Age
Banastarim Bridge Accident: खाकी वर्दीनंतर आता गोव्याच्या प्रतिष्ठेलाही काळिमा

लहानपणापासून आपण इतके धावत असतो व त्या धावण्याची इतकी सवय झालेली असते की, कशासाठी धावतोय हेही विसरून जातो. ज्यांच्यासाठी आपण धावाधाव करतोय, त्यांना देण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे का, याचाही विचार आपण धावताना करत नाही.

इतकेच कशाला आपल्यासाठी आपल्याजवळ वेळ नसतो. कुठे थांबायचे हे माहीत नसेल तर धावण्याला काहीच अर्थ उरत नाही. शेवटी ‘मी’, ‘माझे’ यात आपण इतके गुंतत जातो की, त्यातून बाहेर निघताना फक्त सोलपटणेच नशिबी येते.

वानप्रस्थ हे असे वळण आहे जिथे थांबून, विसावा घेऊन, पूर्ण विचार करून निर्णय घ्यायचा आहे. इथून आपल्याला पुन्हा ‘मी’, ‘माझे’ करत गृहस्थाश्रमात मागे जायची मुभा आहे.

आपण विरक्त, निवृत्त झालो आहोत याची खात्री झाली असल्यास त्याच वळणावरून पुढे सन्यासाश्रमाकडे जाता येते, जिथून परत वानप्रस्थ किंवा गृहस्थाश्रमाकडे येता येत नाही. आपण वनात नाही गेलो, तरीही थोडासा विसावा घेत वानप्रस्थाचा विचार अवश्य करावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com