गोव्यात आयोजित करण्यात येत असलेल्या प्रत्येक जी20 बैठकीच्या अखेरीस, जी20 च्या निमित्ताने गोव्यात आलेला प्रतिनिधींना गोव्याची खास आठवण म्हणून गोवा राज्याचा मानबिंदू ठरलेल्या, खास ओळख व अभिमान असलेल्या वस्तू आपल्यासमवेत घेऊन जात आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना असलेल्या गोव्याच्या प्रतिबद्धतेची साक्ष या वस्तू देतात. टाकाऊ साहित्याचे प्रमाण कमी राखत विकसित केलेल्या निवडक वस्तूंचा समावेश यात करण्यात आला आहे.
‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ या जी20 बैठकांच्या संकल्पनेस पूरक अशी ही स्मरणभेट आहे. ‘गोव्याचा सांस्कृतिक वारसा, गोव्याची ओळख दर्शविणाऱ्या तसेच स्थानिक कलाकारांनी आपल्या कला-कौशल्यातून घडवलेल्या वस्तूंचा समावेश करून, जी२०मध्ये त्यांचा सहभाग नोंदवण्याची संधी स्थानिक कलाकार व कारागिरांना देण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात आला आहे.’ अशी भावना जी20 गोवाचे नोडल अधिकारी संजीत रॉड्रिग्ज यांनी व्यक्त केली.
गोव्यात आलेले जी20 चे भारतीय शेर्पा अमिताभ कांत या संदर्भात गोवा सरकारचे कौतुक करताना म्हणाले, ‘गोव्यातील दिग्गज कलाकारांनी विकसित केलेल्या व गोव्याला खास बनवणाऱ्या या भेटवस्तू दीर्घकाळ स्मरणीय ठरणार आहेत.’
अझुलेजो टाइल्स इनलेसह पुनःप्रक्रिया केलेले लाकडी ट्रे:
‘अझुलेजो’ म्हणजेच हाताने रंगवलेल्या सिरॅमिक टाइल्स. पोर्तुगीजांनी ही कला गोव्यात आणली. आज पारंपरिक आणि आधुनिक तंत्राने स्थानिक कलाकारांनी बनवलेली निळ्या रंगातील या लाकडी ट्रेसाठी पुनःप्रक्रिया केलेले लाकूड अझुलेजो टाइल समवेत वापरून हे सुंदर ट्रे विकसित केले आहेत. प्रत्येक भेटवस्तू या ट्रेमध्ये ठेवून दिली जाते.
कुणबी टोटे पिशवी आणि भरतकाम केलेले स्टोल:
सेंद्रिय ताग आणि कापूसधागा वापरून बनवलेली ही टोटे बॅग कुणबी जमातीच्या पारंपरिक लाल धागाकामावर प्रकाश टाकते. ही पिशवी पूर्णपणे प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी झिपरऐजी नारळाच्या कवटीचे बटण वापरले जाते. हे कुणबी स्टोल गोव्यातील स्थानिक कुणबी कारागिरीचा उत्तम नमुना आहे. या कपड्यांवर वापरलेले रंग औषधी गुणधर्म असलेल्या नैसर्गिक उत्पादनांपासून बनवलेले आहेत.
गोमंतकीय घराच्या खिडकीची प्रतिकृती:
गोव्यातील घरांच्या खिडकी म्हणजे शतकानुशतके विकसित होत असलेल्या गोमंतकीय वास्तूरचनाकलेचा उत्तम नमुना. या खिडक्यांमध्ये रूपेरी शिंपल्यांचे छोटे छोटे आयताकृती तुकडे लाकडी पट्ट्यांमध्ये बसवलेले असतात. यामुळे घरामध्ये हवा खेळती राहते आणि सूर्यप्रकाशही उपलब्ध होतो. या प्रतिकृतींच्या निर्मितीसाठी पुनःप्रक्रिया केलेले लाकडून आणि इतर साहित्य वापरले आहे.
पारंपरिक समई:
गोव्यात पितळी धातूकामामध्ये आजही पारंपरिक तंत्र वापरले जाते. झाडासारखा आकार असलेला, त्यावर फुलांचा आकृतिबंध असलेला हा दिवा (समई) कलाकुसरीने सजलेल्या कारागिरीचा उत्तम आहे. म्हापसा येथील स्थानिक कारागीर निहाल शिरगावकर यांनी बनवलेल्या या पितळी समयांची रचना ही गोव्यातील मंदिरांमध्ये असलेल्या पुरातन समयांची प्रतिकृती आहे.
कमळाकृती टेराकोटा अगरबत्ती स्टँड:
कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे. गोव्यातील तलावांमध्ये कमळाची फुले मोठ्या प्रमाणात वाढतात. स्थानिक माती कलाकार सिमोनी रेगो यांनी टेराकोटापासून कमलाकृती अगरबत्ती स्टँडची निर्मिती केली आहे
बीच योगा चटई:
सुरक्षित आणि पुनःवापर योग्य प्लॅस्टिकचा वापर करून ही बीच योगा चटई बनवण्यात आली आहे. एका चटईमध्ये 200 प्लास्टिक कचरा पिशव्या आणि रॅपर यांचा वापर झाला आहे. भारतीय हातमाग प्रक्रियेचा यात अवलंब करण्यात आला आहे.
सेंद्रिय सुगंधी मेणबत्ती:
सेंद्रिय मेण, कमीतकमी कचरा उत्पन्न करणारी, हाताने बनवलेली ही सुगंधी मेणबत्ती आहे. पश्चिमघाटात आढळणाऱ्या जंगली सुगंधी फुलांचा गंध या मेणबत्तींना दिला गेला आहे. टाकाऊ बिअरच्या बाटल्यांपासून बनवलेल्या काचेच्या कंटेनरमध्ये या मेणबत्त्या ठेवण्यात आल्या आहेत.
गोमंतकीय काजूबिया:
काजूबिया गोव्याचा अविभाज्य घटक आहेत. भेटवस्तूमध्ये 250 ग्रॅम वजनाच्या सेंद्रिय, भाजलेल्या काजूबियांचा समावेश करण्यात आला आहे. पोर्तुगीजांच्या माध्यमातून गोव्यात आलेल्या काजूचा इतिहास तसेच नारायण झांट्ये यांच्याद्वारे 1928 साली सर्वप्रथम अमेरिकेला पहिल्यांदा काजू निर्यात झाल्याबाबतची माहिती या पॅकमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
गोवन फेणी:
जीआय प्रमाणित गोवन काजू फेणी ही पर्ल तसेच शिंपल्यांच्या बाटल्या तसेच तागाच्या पिशव्यांमध्ये पॅकबंद करण्यात आली आहे. या बाटलीस कुणबी कापड साडीप्रमाणे लपटलेले आहे.
या भेटवस्तू म्हणजे केवळ वस्तूंचा संग्रह नाही तर गोव्याचा समृध्द सांस्कृतिक वारसा आणि गोमंतकीय जीवनशैलीत असलेल्या शाश्वत, निसर्गप्रिय पद्धतींचे ते दर्शन आहे. त्याशिवाय बैठकीदरम्यान वापरण्यात येणारे पेन्सिल, पेन व वही हे लेखन साहित्य पूर्णतः जैविक आणि पर्यावरणप्रिय साहित्यापासून हे बनवण्यात आले आहे. खादी महामंडळाच्या टाकाऊ कागद व धाग्यांचा वापर करून खास जी20 गोवा बैठकांसाठी गोमंतकीय कारागिरांनी या वह्यांची निर्मिती केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.