Blog: देवाचे पाणी, सरकारची मनमानी

गोवा स्वतंत्र झाला त्यावेळी पणजी सोडून इतर कुठे नळाचा पाणीपुरवठा नव्हता. गावात, शहरात बऱ्याच विहिरी होत्या. फोड्यात शंभराच्यावर विहिरी होत्या, त्यावर पाण्याचे सर्व व्यवहार चालायचे.
Blog
BlogDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा स्वतंत्र झाला त्यावेळी पणजी सोडून इतर कुठे नळाचा पाणीपुरवठा नव्हता. गावात, शहरात बऱ्याच विहिरी होत्या. फोड्यात शंभराच्यावर विहिरी होत्या, त्यावर पाण्याचे सर्व व्यवहार चालायचे. नळ आल्यावर उपसा नसल्याने विहिरींचे पाणी बिघडले. बऱ्याचजणांनी विहिरी बुजवून टाकल्या. गेल्या साठ वर्षांपर्यंत फोंड्याचा बारमाही ओढा ‘कण्णेव्हाळ’ यातील पाणी आंघोळ करण्याइतपत शुद्ध होते. पांढरपेशांची मुलेसुद्धा उन्हाळ्यात ओढ्याच्या डोहात पोहत होती. त्यानंतर एक- दोन दशकात पाण्याची स्थिती झपाट्याने खालावू लागली.

नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला मी दैनिक ‘गोमन्तका’त त्यावर एक लेख लिहिला; ‘एक जीवनधारा मरणासन्न’. निर्मल विश्व संस्थेने आरोग्य खात्याला पत्र लिहून पाण्याची तपासणी करण्याची विनंती केली. महिन्याभरात तपासणी अहवाल आला. फोंड्यात प्रवेश करण्याआधीचे ओढ्याचे पाणी जवळजवळ शुद्ध. बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) ५-६च्या दरम्यान, तर शहराच्या मध्याला दीडशेच्या वर! हे भयानक होते.

Blog
Gomantak Editorial: शहांची दक्षिण स्वारी!

शहरातील ५-६ बारमाही झऱ्यांचा अभ्यास केला. झऱ्यांतून बाहेर येणारे पाणी शुद्ध होते, पण तेथील आसपासचा परिसर गलिच्छ. लोकांकडून मदत मिळवून एका डबके बनलेल्या झऱ्याचा कायापालट केला. त्याला ’हनुमानतीर्थ’ नाव दिले. ‘स्प्रिंगस् ऑफ फोडा’ नावाने १६ मिनिटांचा व्हिडिओ तयार केला. या सर्व उपक्रमांतून गावातील जलस्रोतांकडे लोकांचे, पत्रकारांचे लक्ष वेधले होते. मधूनमधून वृत्तपत्रातून जलस्रोतांच्या दुरवस्थेविषयी काही ना काही यायचे.

झरे ऊर्जितावस्थेत आणता येतात याविषयी आत्मविश्वास निर्माण झाला होता. पण ओढ्याचा प्रश्न मोठा होता. त्यावर बरेच मंथन केल्यानंतर लक्षात आले की ओढ्याचा शहराला काही उपयोग नाही अशा अवस्थेत तो पडून आहे. उपयोग नसलेल्या वस्तूचा दुरुपयोग किंवा दुर्वापर हा ठरलेला. म्हणून शहराला त्याचा काय उपयोग होऊ शकेल ज्यायोगे शहर त्याचे जतन होईल, याविषयी निरनिराळ्या संकल्पनांवर विचार केला. या विषयावर ओढ्याच्या काठांचा वापर चालणे, धावणे, जॉगिंग, सायकल चालविणे, रोलर स्कॅटिंग असे ‘ऍक्टिव्ह रीक्रिएशन’चे प्रकार, जलक्रीडा, पादचारी मार्ग अशा प्रकारे वापर करण्यासाठी एका बागेचे स्वरूप येईल. असा फोंड्याचा हरितमार्ग बनावा (ग्रीन वेज ऑफ फोंडा).

२००४च्या जागतिक पर्यावरण दिनाच्या (५ जून) औचित्याने या विषयावर फोंड्याला परिसंवाद आयोजित केला. त्यात संबंधित विषयांवरील तज्ज्ञ मंडळी, नगरनियोजन खाते, पीडीए, फोंडा नगरपालिका यांतील अधिकारी, आर्किटेक्ट, इंजिनिअर्स, एनआयओचे ज्येष्ठ वैज्ञानिक अशी मंडळी उपस्थित होती. जलस्रोतांना सन्माननीय नागरी भूमिका बहाल करून त्यांच्या जतनासाठी समाजाला उद्युक्त करण्याची ही योजना सर्वांनी उचलून धरली. लागलीच ११ जूनला एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन काउन्सिल या राज्याच्या स्थानावरील सभेत (गव्हर्नर अध्यक्ष, मुख्यमंत्री उपाध्यक्ष, काही मंत्री, आमदार, खातेप्रमुख दोनतीन पर्यावरणप्रेमी नागरिक हे सदस्य) नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण हा विषय चर्चेस आला.

मी सांगितले की जलस्रोतांचे प्रदूषण मुख्यतः शहरी भागात होते. म्हणून शहरात बारमाही गोड्या पाण्याचे काठ बिनविकासाचा हिरवा पट्टा आखून जलस्रोत सुरक्षित राखावा. सर्वांनी हे मान्य केले. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मनोहर पर्रीकर, तसेच संबंधित टाऊन प्लॅनिंगचे प्रमुख, नागरी प्रशासनाचे प्रमुख उपस्थित होते. पण त्यांनी आपल्या कार्यपद्धतीने ही सूचना कार्यान्वित करण्यासाठी काहीही केले नाही. पर्यावरण खात्याने प्रमुख नगरनियोजकाला पत्र लिहून या ठरावाच्या बजावणीची कार्यवाही करण्याची सूचना केली. पण फक्त फोंड्याच्या बाह्य विकास आराखड्यात हा हरित पट्टा आखण्यात आला. पण तेथेही तो पट्टा हटविण्याचा एका राजकारण्याचा सतत प्रयत्न असतो.

आरोग्य खात्यांच्या तपासणीनुसार फोंडयाच्या ओढ्यात बसस्टँड जवळच सर्वांत जास्त प्रदूषण होते. त्यात तेथील दुकानदार, विक्रेते व लोकही येताजाता कचरा टाकतात (शिवाय फोंड्यातील एकमेव सार्वजनिक शौचालयाला नगरपालिकेने ओढ्याच्या काठीच स्थानापन्न केले आहे!) त्या कचऱ्याविषयी नगरपालिका काहीही प्रतिबंध करण्यास तयार नाही हे पाहून निर्मलविश्व संस्थेने एका नवीन नागरिक संघटनेच्या सहभागाने तेथील पुलाचे सौंदर्यीकरण व अडीच मीटर उंचीची जाळी बनविली. तशीच बसस्टँडच्या व दुसऱ्या बाजूनेही ओढ्याच्या काठावर अशी पाऊणशे मीटर जाळी बसवून हे सर्व नगरपालिकेकडे देखभाल व संरक्षणासाठी सुपूर्द केले. नगरपालिकेने त्याचे काडीचेही व्यवस्थापन न केल्याने उद्देश सफल झाला नाही.

वारखंड वॉर्डातील ‘हनुमानतीर्थ’ हा लोकांचा प्रकल्पही सरकारी अनास्थेचा बळी ठरला. त्याच्या जवळून हायवेचा बगलमार्ग आखताना त्या झऱ्याची काडीचीही दखल घेतली नाही. रस्त्याच्या उंच भरावात तो झरा, तेथील कुंड, तलाव, पेव्हींग, उतरण्याच्या पायऱ्या असा २५ बाय १५ मीटरचा भाग भरावात गाडून टाकला! बऱ्याच लटपटीनंतर रस्त्याच्या भरावाला संरक्षण भिंत बांधून भराव काढून टाकला आणि हनुमानतीर्थ साधारणसे पूर्ववत झाले. पुनः तेथे बायपासवर फ्लायओव्हर बांधताना त्याचे बगलमार्ग त्या तीर्थावरूनच जात होते.

त्यात माती लोटणाऱ्या बुलडोझरममोर उभा राहून आम्हाला तो अडवावा लागला. तरीही बरेच नुकसान झालेच. झऱ्याचे वाहून जाणारे पाणी भरावाने उडल्यामुळे तीर्थाचे डबके बनले. मोठ्या लटपटीनंतर त्याला पाट बांधून पाण्याला वाट करून देण्यात आली. पण झऱ्याचा परिसर विपन्नावस्थेतच आहे. जलसंसाधन खात्याने त्याची सुधारणा करण्यासाठी टेंडर काढून कॉन्ट्रॅक्टर नेमला. तीन वर्षे झाली कॉन्ट्रॅक्टर काहीही करीत नाही, खातेही स्वस्थ आहे. एक, एक करीत फोंड्यातील सर्व झरे लोकसहभागातून विकसित करण्याचा इरादा होता. पण हनुमान तीर्थाच्या सरकारी अनुभवाने उमेदच गळून पडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com