Blog: कामसू हात, स्वाभिमानी मान आणि प्रेमळ मन

नोकरी करणाऱ्या बायकांना लंचटाइम असतो, स्वतःची स्पेस असते. पण गृहिणीला तीही मुभा नसते. या एवढ्या सगळ्यातून फणसाच्या दिवसांत इडली, सांदण, भाजलेल्या काजू, साटे, असे आम्हा चिल्ल्यापिल्ल्यांचे लाडही चालायचे.
Summer Days Memories
Summer Days MemoriesDainik Gomantak

आसावरी कुलकर्णी

आठवणी गोड असतात कडूही असतात. कडू आठवणी जिरवून टाकायच्या कडुनिंबाच्या पाडव्याच्या रसासारख्या. गोड आठवणी चघळत राहायच्या लिमलेटच्या गोळीसारख्या, तासन् तास. फणसाची साटे, किंवा फणसपोळी, साधा सोपा वाळवणाचा प्रकार. खरे तर, रसाळ फणसाचे गरे, वाटून घ्यायचे आणि पसरायचे, अख्खा पाऊसभर तुम्हांला फणसाची चव चाखायला मिळते. मला आठवतात स्पष्ट ते दिवस, फणस आंब्याचे, बोंडूचे. आई, आजी, मावश्या, मामी पावसाळ्याची बेगमी करण्याचे काम, कुळागरातल्या दांड्यात राबराबून रोजच्या कामाबरोबरच उरकून टाकायच्या.

एखाद दिवस घोटे, एखादे दिवस गारफ, एखाद दिवस फणस, आम्हा मुलांसाठी सुट्टीची धमाल, चंगळ असायची. पण मोठ्या बायकांसाठी कामाचा ढीग. कोकम फोडून सोले, आगळ करणे, घोटाचे साट करणे, फणसाची साले, पापड घालणे, पिकलेल्या फणसाची साटे घालणे, कुरडया, सांडगे, पापड लोणची करणे, मसाला कांडून आणणे, हे सगळे करून तयार ठेवले म्हणजे आख्या चतुर्मासाची तयारी.

Summer Days Memories
Jazz Music Day: शास्त्रीय-पाश्चिमात्य संगीताची सांगड

हे सगळे करता करता लवंग्या मिरच्या काढून त्या सुकवणे, खोबरे असेल तर ते सुकवून तेल काढायला देणे, शेनवत (केळीची सुकलेली पाने) काढून द्रोण करणे, वाती करणे, काय आणि काय! एवढ्या सगळ्यातून मग काजीत जाऊन काजू गोळा करणे संध्याकाळी येऊन सगळ्यांना चहा देणे, झरीवर जाऊन आंघोळ करून येणे, अर्थातच येताना दोन घागरी पाणी घेऊन येणे...हुश्श!

नोकरी करणाऱ्या बायकांना लंचटाइम असतो, स्वतःची स्पेस असते. पण गृहिणीला तीही मुभा नसते. या एवढ्या सगळ्यातून फणसाच्या दिवसांत इडली, सांदण, भाजलेल्या काजू, साटे, असे आम्हा चिल्ल्यापिल्ल्यांचे लाडही चालायचे. रोज घुसळलेल्या ताज्या ताकातले लोणी, एखादी एक्स्ट्रा आंब्याची फोड, अननसाचा शेक, हे बोनस मिळायचे. दहाच्या एस्टीवर गावात पाऊल ठेवले, काजऱ्याकडे उतरले, की स्वर्गात गेल्यासारखे वाटायचे, ओढा ओलांडून चढती चढायची , आणि दाखल व्हायचे त्या स्वच्छ विस्तीर्ण सारवलेल्या अंगणात. वरती माडांची चुडते घातलेला मांडव, मेडींना टेकून वाळवणाचे पदार्थ, ग्रीष्मातल्या उन्हातला तो वास तृप्त करायचा.

‘कोण, राणी का आयलीसे?’(कोण, राणी आली आहे का?), अशी आपुलकीची विचारपूस होत असे. फार आगत स्वागत नसायचे, कारण ते घरच असायचे आपले. मग इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर, आज्जी फसलेल्या टोमॅटोची वडी स्वयंपाक घरात माझ्या हातावर ठेवायची, ‘कुणीच खाल्लीन नाय, मे करे गेल्यां आणि फसली.

माझी राणी आयलेवर खानारसे म्हणी थेयली’(कुणीच खाल्ली नाही. मी करू गेले अन् फसगत झाली. राणी आल्यावर खाईल म्हणून ठेवली). मीही आनंदाने, ‘छान झाली आहे!’, असे म्हणून खात असे. तेव्हाचा जो दोन डोळ्यातला आनंद दिसायचा, तो इतक्या वर्षांनी माझ्या हातचे कोरे कच्चे, चुकून बिघडलेला पदार्थ खाऊन, ‘छान आहे!’, असे लेकराने म्हटल्यावर मी अनुभवते. मग फणसपोळी, आंबापोळी चाखणे, ओले पापड खाणे, काय खाऊ आणि कसे खाऊ यातच सुट्टी संपायची.

आज्जी साटे कुंब्याच्या पानावर घालायची, सांडगे मोठ्या अळूच्या पानावर, पापड केळीच्या पानावर, ते अर्धवट सुकलेले उन्हात कोमट झालेले पदार्थ कधी खाल्लेत का? त्या सुकलेल्या पानांची चव उतरते पदार्थात. काप्या गऱ्याबरोबर आणि फणसपोळीबरोबर सुका नारळ खाण्याची पद्धत होती.

का, असे आम्ही कधी विचारले नाही. आम्ही आपले फक्त मजा करायचो. फणसाची साटे त्यानंतर दरवर्षी खातेच, पण त्याला कधी आज्जीची चवच येत नाही. आधीच्या बायकांना मी कधी रिकामे बघितलेच नाही. सतत काम, सतत राबणे, सतत दुःख डोक्याशी बांधून काम करणे. सोवळेओवळे पाळत घराचे देऊळ करणे....

मागे लॉकडाउनच्या काळामध्ये थोडे हे जुने बाईपण साजरे केले. निदान हे कुंब्यावरचे साट आणि आमसुले बनवली, स्वतः पुरती. ते सुकलेले साट खाताना झर्कन आठवले सगळे. आजीचे कामसू हात, स्वाभिमानी मान, डोक्यावरच्या आठ्या, किंचित हसणे, आणि कधीच व्यक्त न केलेले प्रेम..

गृहिणी असतेच आत्मनिर्भर, तिला फक्त वाटा मिळायला हव्यात, बांध तुटायला हवेत. मग बाईचे हे सकारात्मक, सृजनात्मक रूप निखरून येते. पाणी वाहत राहते चहूबाजूला आणि फुलतात मळे गच्च प्रेमाचे, आनंदाचे...

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com